भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने, तमाम भारतीयांची छाती गर्वाने फुलून निघेल अशी कामगिरी अनेकदा बजावली आहे. तरीदेखील इस्रोच्या एकूणच आवश्यकतेवर, इस्रोने हाती घेतलेल्या अवकाश संशोधन प्रकल्पांच्या गरजेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या शंकासुरांची संख्या कमी नाही. भारतासारख्या गरीब देशाला अवकाश संशोधनासारख्या चोचल्यांची गरज काय, इस्रोच्या संशोधनामुळे सर्वसामान्य माणसाच्या जीवनात कोणता फरक पडतो, असे अज्ञानातून निर्माण झालेले प्रश्न हे शंकासुर उपस्थित करत असतात. इस्रोच्या ताज्या संशोधनावर मात्र त्यांना प्रश्नचिन्ह उपस्थित करता येणार नाही; कारण पूर्णत्वास गेल्यावर हे संशोधन सर्वसामान्य माणसासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. हे संशोधन म्हणजे सौर ऊर्जेवर धावणारी कार! इस्रोच्या थिरुवनंतपुरमस्थित विक्रम साराभाई अवकाश केंद्राने संपूर्ण देशी तंत्रज्ञान व संसाधने वापरून तयार केलेल्या सौर ऊर्जाचलित कारची नुकतीच यशस्वी चाचणी घेण्यात आली. या कारच्या छतावर सौर ऊर्जा संकलित करणारे पॅनेल बसविण्यात आले आहेत. सौर ऊर्जा लिथियम-आयन बॅटरीमध्ये साठविली जाते आणि गरज भासेल तेव्हा त्या ऊर्जेद्वारा इलेक्ट्रिक मोटर फिरवून कारला गतिमान केले जाते. अद्याप हे संशोधन प्रायोगिक पातळीवरच आहे; पण इस्रोचा उज्ज्वल इतिहास बघता, लवकरच ही कार औद्योगिक उत्पादनासाठी सज्ज होईल, याबाबत कुणाच्याही मनात शंका नसावी. केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी काही दिवसांपूर्वीच, २०३० पर्यंत पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या कार हद्दपार करण्याचा आणि त्याऐवजी केवळ बॅटरीवर चालणाऱ्या कार आणण्याचा विचार बोलून दाखविला होता. बॅटरीवर चालणाऱ्या कारमधील बॅटरी चार्ज कराव्या लागतात. इस्रोच्या कारमधील बॅटरी सौर ऊर्जेवर चार्ज होतील. म्हणजे विजेचा खर्चही वाचेल. शहरातील वाहतुकीसाठी अशा कार फार उपयुक्त ठरू शकतील. शहरातल्या शहरात वापरल्या जाणाऱ्या खासगी कार फार थोडा वेळ प्रत्यक्ष धावत असतात. इतर वेळी त्या एका ठिकाणी उभ्याच असतात. त्यावेळी कारमधील बॅटरी सौर ऊर्जेवर चार्ज होतील. म्हणजेच अशा कार चालविण्यासाठी इंधनावर खर्चच करावा लागणार नाही. आज हे कुणाला अशक्यप्राय वाटू शकते; मात्र भविष्य हेच आहे, यात अजिबात शंका नाही. जग बदलणारे तंत्रज्ञान जगातील इतर देशांमध्ये विकसित होते आणि मग काही वर्षांनी आपण ते वापरू लागतो. सौर ऊर्जाचलित कारच्या बाबतीत कदाचित गंगा उलटीही वाहू शकेल. अर्थात अजून बरीच मोठी मजल गाठायची आहे. संपूर्णपणे सौर ऊर्जेवर किंवा बॅटरीवर चालणाऱ्या कार, हे स्वप्न साकार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत संरचना उभारावी लागणार आहे. तरीही उर्वरित जगासाठी असूयेचा विषय ठरलेल्या इस्रोला, या पुढाकारासाठी सलाम करायलाच हवा!
भाष्य - इस्रोला सलाम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2017 00:14 IST