भाष्य - चीनची अस्वस्थता

By Admin | Updated: May 3, 2017 00:14 IST2017-05-03T00:14:07+5:302017-05-03T00:14:07+5:30

दुसऱ्यासाठी खड्डा खोदला की आपणच त्यात कोसळतो, असे म्हणतात. आपला शेजारील देश चीन हे याचे चांगले उदाहरण आहे. दहशतवादाबद्दल

Annotation - China's discomfort | भाष्य - चीनची अस्वस्थता

भाष्य - चीनची अस्वस्थता

दुसऱ्यासाठी खड्डा खोदला की आपणच त्यात कोसळतो, असे म्हणतात. आपला शेजारील देश चीन हे याचे चांगले उदाहरण आहे. दहशतवादाबद्दल नेहमीच दुटप्पी धोरण अवलंबणारा, पाकिस्तानी दहशतवादाला संरक्षण देणारा आणि वेळप्रसंगी अप्रत्यक्ष समर्थन देणारा चीन सध्या स्वत:च दहशतवादी हिंसाचाराच्या आगीत होरपळतो आहे. दहशतवादाच्या या भस्मासुराने त्याला एवढे अस्वस्थ केले आहे की, तेथील अशांत शिंजियांग प्रांतात मुलांची सद्दाम, जिहाद, इमाम अशी डझनावर नावे ठेवण्यावरच त्याने बंदी घातली. एवढेच नाही तर या समुदायातील आणखी काही प्रचलित धार्मिक शब्दांवरही निर्बंध लादले. ह्युमन राइट्स वॉच नावाच्या एका मानवाधिकार संघटनेच्या हवाल्याने यासंदर्भातील वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. चीन शासनाच्या या निर्णयाने प्रतिबंधित नावे असलेल्या लोकांना शैक्षणिक व सरकारी लाभांपासून वंचित राहावे लागेल, अशी भीती या संघटनेने व्यक्त केली आहे आणि ती रास्तही आहे. काही ठरावीक नावांचा दहशतवादाशी संबंध जोडणे आणि ती धारण करणाऱ्या लोकांना शासकीय सुविधांपासून वंचित ठेवणे केवळ चुकीचेच नव्हे तर अन्यायकारकही आहे. परंतु दहशतवादाने धास्तावलेल्या आणि भांबावलेल्या चीनला हे कसे कळणार? या प्रांतातील वाढत्या अतिरेकी कारवाया रोखण्याकरिता तेथील सरकारने अशा अनेक कठोर उपाययोजनांचा सपाटाच लावला आहे. ही मुस्कटदाबी दहशतवादावर नियंत्रण आणण्यास किती फायद्याची ठरते, ते भविष्यात समोर येईलच. परंतु या अनुभवातून धडा घेत आता तरी चीनने भारताविरोधातील आपली कुटिल नीती त्यागून दहशतवादाविरोधातील लढ्यात स्वच्छ आणि प्रामाणिक मनाने सामील
झाले पाहिजे. भारताने जेव्हा जेव्हा पाकिस्तानवर दहशतवादी कारवायांचा आरोप केला किंवा जागतिक व्यासपीठावर त्या देशाविरुद्ध कारवाईची मागणी केली तेव्हा तेव्हा चीन त्याच्या पाठीशी उभा राहिला. अगदी अलीकडचेच उदाहरण द्यायचे झाल्यास पाकी दहशतवादी मसूद अजहरचे घेता येईल. मुळात दहशतवाद ही एक जागतिक समस्या असून, साऱ्या जगाने एकजुटीने त्याचे उच्चाटन करणे गरजेचे आहे. चीनने आता तरी हे समजून घेत दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात सहभागी झाले पाहिजे.

Web Title: Annotation - China's discomfort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.