अखिलेशच सर्वमान्य
By Admin | Updated: November 6, 2016 23:46 IST2016-11-06T23:46:02+5:302016-11-06T23:46:02+5:30
उत्तर प्रदेशातील सत्ताधारी समाजवादी पार्टीतील (सपा) आणि खरे तर या पक्षाची सारी सूत्रे ज्या यादव घराण्याकडे आहेत

अखिलेशच सर्वमान्य
उत्तर प्रदेशातील सत्ताधारी समाजवादी पार्टीतील (सपा) आणि खरे तर या पक्षाची सारी सूत्रे ज्या यादव घराण्याकडे आहेत, त्या घराण्यातील कलह काहीसा थंडावलेला दिसत असला तरी सपा ज्या अन्य पक्षांशी किंवा जे अन्य पक्ष सपाशी निवडणूक समझोता करू इच्छितात, त्यांच्या मनातील साऱ्या शंका दूर झालेल्या नसाव्यात आणि म्हणूनच संघर्ष संपुष्टात आल्याचे हे पक्ष मान्य करायला तयार नाहीत असे दिसते. निवडणुकीच्या हंगामात एखाद्या अत्याधुनिक आणि आलिशान मोटारीला रथासारखे सजवून राज्यभर रथयात्रा काढण्याची जी टूम भाजपाने देशात सुरू केली, तिचे अनुकरण आता सारेच पक्ष करू लागले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीदेखील असाच एक रथ सजवून घेतला (यात्रा सुरू होण्यापूर्वीच त्याची चाके फसली, हे अलाहिदा) आणि त्यांच्या यात्रारंभाला त्यांचे पिता व सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह तर हजर होतेच पण ज्यांच्यात आणि अखिलेश यांच्यात विस्तव आडवा जात नाही, ते अखिलेशचे चुलते शिवपाल यादव हेदेखील हजर होते. आमच्यात आता काहीही भेद नाही, हेच जणू त्यांना यातून सूचित करायचे होते. पण त्यावर आणि विशेषत: थोरल्या पातीमधील यादवांवर अन्य पक्षांचा विश्वास नसावा. त्यामुळेच अखिलेश हाच जर सपाचा त्या राज्यातील खरा चेहरा असेल तरच त्या पक्षाशी चर्चा आणि समझोता होऊ शकतो, अशी भूमिका काँग्रेस, संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय लोकदल यांनी घेतली आहे. ही कदाचित अखिलेश यांच्या कारभाराला आणि नेतृत्वाला दिली जाणारी पावतीदेखील असू शकते. त्यामुळे तेच अन्य पक्षांच्या लेखी सर्वमान्य नेते ठरतात. अर्थात मुलायम यांना हे कितपत रुचत असेल हा एक प्रश्नच आहे. परंतु एक बरीक खरे की आज सत्तेत असूनही पुन्हा आपण स्वबळावर सत्तेत येऊ शकू असा विश्वास सपाला वाटत नसल्याने तो पक्ष भागीदार शोधण्याच्या मागे आहे. काँग्रेस पक्षाशी तशी चर्चादेखील सुरू आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय लोकदलाचे अजितसिंह यांच्याशीही चर्चा झाली असून ते काय किंवा काँग्रेस काय यांनी अखिलेश आघाडीवर असतील तरच समझोता होऊ शकेल असे स्पष्ट केले आहे. खरे तर बिहार विधानसभेच्या निवडणुकीत पूर्वीच्या जनता परिवारातील साऱ्यांनी एकत्र येऊन महागठबंधन तयार केले होते, तसेच ते उत्तर प्रदेशातही आकारास यावे अशी इच्छा अनेकांनी बोलून दाखविली आहे. पण त्यासाठी मायावतींची बसपा आणि यादवांची सपा यांच्यात समझोता झाला तरच ते खरे महागठबंधन होईल असे बिहारचे मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी म्हटले आहे. तसे कदापि होऊ शकत नाही, हे का त्यांना ठाऊक नाही? पण बिहारचे गठबंधन सुरुवातीला जेव्हा आकारास आले तेव्हा त्यात सहभागी झालेले मुलायम नंतर युती सोडून निघून गेले होते. तो राग नक्कीच नितीश यांच्या मनात असणार. म्हणूनच त्यांनी अशी सूचना केली आहे. खरे तर त्या राज्यात स्वबळावर आपण सत्ता प्राप्त करू शकू असा दावा सारेच राजकीय पक्ष करीत असले तरी तशी खात्री त्यापैकी एकाच्याही मनात नाही. पण त्यातल्या त्यात भाजपाला तिथे डोके वर काढू द्यायचे नाही याबाबत बिगर भाजपा पक्षांमध्ये बऱ्यापैकी एकवाक्यता आहे. पण तसे करायचे तर तडजोडी अपरिहार्य ठरतात. परंतु त्या करण्यास कोणाचीच तयारी दिसत नाही. अर्थात यातून एक निष्कर्ष कदाचित असा काढता येऊ शकेल की, यादव घराण्याला तरी अखिलेश यांच्याविषयी भरवसा वाटत नसला तरी अन्य पक्षांना मात्र तो जरूर वाटतो आहे.