एकेकाळच्या बिहारी ‘महानायका’चे पुनरागमन?

By Admin | Updated: October 29, 2015 21:46 IST2015-10-29T21:46:33+5:302015-10-29T21:46:33+5:30

हिंदी सिनेसृष्टीतील राजेश खन्ना हा पहिला महानायक. त्याच्या बाबतीत एक अत्यंत भावस्पर्शी गोष्ट सांगितली जाते. तिचा खरे-खोटेपणा संशयास्पद असला

Akali Bihari 'Mahayanaaka' coming back? | एकेकाळच्या बिहारी ‘महानायका’चे पुनरागमन?

एकेकाळच्या बिहारी ‘महानायका’चे पुनरागमन?

राजदीप सरदेसाई, (ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक)
हिंदी सिनेसृष्टीतील राजेश खन्ना हा पहिला महानायक. त्याच्या बाबतीत एक अत्यंत भावस्पर्शी गोष्ट सांगितली जाते. तिचा खरे-खोटेपणा संशयास्पद असला तरी महानायकालाही कशा मर्यादा येतात याची त्यातून प्रचिती येते. कारकिर्दीच्या ऐन भरात असताना रोज त्याचा दरबार भरत असे. त्याचे चाहते त्याच्या चित्रपटातील संवाद त्याच्याच तोंडून ऐकण्यासाठी गर्दी करीत. ज्या हॉलमध्ये दरबार भरे, तिथे खच्चून गर्दी आणि मद्याची रेलचेल असे. काहीच वर्षात तो हॉल रिकामा दिसू लागला, तेव्हां राजेशने एका जवळच्याला विचारले, ‘सगळे लोक कुठे गेले’? तो नम्रपणे म्हणाला, ‘अमिताभ बच्चन नावाचा आणखी एक नायक उदयास आला आहे’. या उत्तराने राजेश खन्ना दिवास्वप्नातून खाडकन बाहेर आला.
अगदी अलीकडच्या एका भेटीत मला राजेश खन्नाची हीच छबी लालूप्रसाद यादव यांच्यात दिसली. सत्तरच्या दशकात हिन्दी सिनेमात जशीे राजेश खन्नाची चलती होती, तशीच नव्वदच्या दशकात लालूंची बिहारच्या राजकारणात होती. ते जणू महानायक होते. १९९५ची निवडणूक जेव्हा त्यांनी जिंकली होती (जिच्यात लालूंच्या मते ते विरुद्ध सारे असा सामना होता) त्यावेळी विजयोत्सव रात्रभर सुरु होता. गर्दीतील एका ज्येष्ठाला मी तिथे येणाचे कारण विचारले, तेव्हां तो म्हणाला, ‘लालूजीने हमे स्वर दिया है, नही तो कौन हमे अलाऊ करता सीएम के बंगले मे’. ती व्यक्ती मुसाहर या महादलित समाजातली होती आणि हा समाज उच्चवर्णियांकडून बहिष्कृत होता.
२००५पासून सलग चार निवडणुकातील पराभवामुळे लालूंची ओळख पराभूत व्यक्ती म्हणून झाली आहे. एकदा एका मीडिया कार्यक्र मासाठी ते आले होते. पहिली ४५ मिनिटे त्यांनी त्यांच्यातील हजरजबाबीपणामुळे आणि विनोदी शैलीने श्रोत्यांना बांधून ठेवले. त्यांची ही शैली अजूनही कायम आहे. परंतु जसजशी संध्याकाळ पुढे सरकू लागली तसतसा त्यांच्या विनोदांमध्ये आणि वक्तव्यांमध्ये तोच तोपणा येऊ लागला. श्रोते कंटाळले. राजदचा एक समर्थक माझ्या शेजारी बसला होता. तोहीे जांभई देत घड्याळाकडे बघत होता. लालंूची जादू ओसरल्याचे ते लक्षण होते. जशी एकेकाळी राजेश खन्नाची जादू होती तसेच काहीसे लालूंच्या बाबतीत झाले आहे.
असे सारे असतानाही पंधरवड्यापासून जे संकेत येत आहेत ते लालूंच्या पुनरागमनाकडे संकेत करीत आहेत. रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून नुकत्याच केलेल्या वक्तव्याने दीर्घकाळापासून सुप्त अवस्थेत असलेल्या या नेत्याला उर्जीत अवस्था प्राप्त करून दिली आहे. बिहारच्या सध्याच्या निवडणुकीचे स्वरूप जंगलराज विरुद्ध विकास असे होते, पण त्याला आता अचानक पुढारलेल्या जाती आणि मागासलेल्या जाती यांच्यातील संघर्ष असे रूप प्राप्त झाले आहे. हा संघर्ष नेमका लालूंच्या पथ्यावर पडणारा आहे. त्यापायी त्यांचा पूर्वेतिहास लपला जातो आहे. ९० च्या दशकात लालूंनी सलग तीन निवडणुका जिंकत तिथल्या सत्तेवरील उच्चवर्णियांची पकड ढिली केली होती. याच सुमारास दिल्लीत तिसरी आघाडी सत्तेवर आली आणि लालू स्वत:ला ‘किंगमेकर’ समजू लागले. एका मुलाखतीत ते मला म्हणाले होत, ‘एक दिवस मी राजा असेन आणि पाटलीपुत्र हे सत्तेचे केंद्र असेल’. मला त्यांचे एक वाक्य अजूनही चांगले आठवते, ‘ जब तक रहेगा समोसे मे आलू, तब तक रहेगा बिहार मे लालू’!
राजकारणात शाश्वत असे काहीच नसते, सत्ताही नाही. १९९७ साली चारा घोटाळ्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यांना पत्नी राबडीदेवीला मुख्यमंत्रिपदावर बसवावे लागले होते. हाच तो काळ होता जेव्हा लालूंच्या राजकारणाचे खरे दर्शन घडले. ज्या लालूंकडे मागासलेल्यांचे नेतृत्व म्हणून पाहिले जायचे तेच लालू तेव्हा मागासलेल्या जातींच्या विकासाच्या नावाखाली स्वत:च्या परिवाराचा विकास करणारे नेते म्हणून समोर आले. एकेकाळी जादुई व्यक्तिमत्व असलेल्या लालूंवर मग भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि परिवार राज असे आरोप होऊ लागले.
जातीचा मुद्दा अजूनही तितकाच महत्वपूर्ण आहे. फरक इतकाच की आता मागासलेल्या जाती लालूंच्या पलीकडे जाऊन बघू लागल्या आहेत. लालूंनी मंडल आयोगासाठी खूप प्रयत्न केले असले तरी त्याचा फायदा त्यांना एकट्याला होणार नाही. त्यांच्या तुलनेत नितीशकुमार अधिक चांगले प्रशासक म्हणून ओळखले जातात. चित्रपटातीलच उपमा द्यायची तर लालू राजेश खन्ना तर नितीश अमिताभ बच्चन आहेत.
पण यंदाच्या निवडणुकीला एक वेगळे वळणही लागू शकते. कारण नितीश-लालू जोडी, नरेंद्र मोदी-अमित शहा जोडीसारखी अभेद्य नाही. नितीश यांच्याविषयी जनतेत नाराजी नाही तर लालू या महाआघाडीत फारसे प्रभावी नाहीत. पण एका बाजूने जनतेतून असाही सूर ऐकू येतो की त्यांची पसंती नितीश वजा लालूंना आहे. याचा अर्थ बिहारी यादवांना त्यांचा मूळचा सूर सापडला आहे. तथापि बिहारी जनतेत एक कथा अशीही प्रसृत केली जाते आहे की, लालू वरच्या जातीतल्या लोकांच्या सामाजिक न्यायाविरुद्धया कारस्थानाचे बळी ठरले आहेत. लालू आरक्षणाचा मुद्दादेखील हुशारीने वापरीत आहेत.
सरतेशेवटी असेही दिसते की लालू त्यांच्या पारंपरिक मुस्लिम-यादव सूत्राला पुन्हा एकत्र बांधण्यात यशस्वी झाले आहेत. मुस्लिमांना अजूनही जातीय हिंसेच्या काळात शांतता राखणाऱ्यांवर विश्वास वाटतो. लालूंच्या राजदला अजूनही सरासरी २० टक्के मते मिळतात. पण त्याहून अधिक मते मिळवण्याची त्यांची कुवत संपली आहे. बिहारी मतदारांचा तोंडावळाही बदलतो आहे. एकूण मतदानाच्या २५ टक्के मतदार १९ ते २९ वयोगटातील आहेत. ज्यांनी मंडलमय बिहार व लालू-नितीश यांची राजवट बघितला आहे, त्यांची ही मुले आहेत. त्यांना मोदींच्या स्वप्नातील विकास बघायचा आहे की त्यांचा परंपरेने चालत आलेल्या नेतृत्वावर (बिहारी विरुद्ध या जोरदार प्रचारावर) विश्वास आणि जातीपातींच्या गणितावर विश्वास आहे, यावरच बिहारच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.
ताजा कलम- १९८३ साली, म्हणजे राजेश खन्नाचे प्रसिद्धीचे दिवस संपल्याच्या खूप दिवसानंतर त्याचा अवतार चित्रपट फार गाजला होता. पण त्यामुळे राजेश खन्नाचे पुनरागमन काही होऊ शकले नव्हते. पण हे मात्र स्पष्ट झाले की जो स्वत:ची कौशल्ये ओळखतो अशा नायकाचे कायमचे नुकसान होत नसचे. हेच कदाचित लालूंच्या बाबतीत बिहारच्या महाभारतात होणार असेल.

Web Title: Akali Bihari 'Mahayanaaka' coming back?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.