क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान एकमेकांच्या समोर उभे ठाकतात, तेव्हा युद्धासारखे चित्र असते. सामना सुरू होतो, तेव्हा संचारबंदीसारखे दृश्य दिसते. टीव्हीसमोर लोक बसलेले असतात. लाखो डोळे मैदानावर खिळलेले असतात. प्रत्येक धाव आणि प्रत्येक चेंडूसोबत लोकांचा श्वास थबकतो. पाकिस्तानवर भारत विजय मिळवतो, तो क्षण तर राष्ट्रीय जल्लोषाचा असतो. सगळीकडे फटाक्यांचा आवाज येतो. पण यावेळी तसे झाले नाही. आशिया करंडक सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा धुव्वा उडवला, तरीही फटाके वाजले नाहीत. जल्लोष झाला नाही. भारत जिंकला याचा आनंद सर्वांना नक्कीच होता, पण हा सामनाच खेळला जाऊ नये, अशी भावनाही अनेकांच्या मनात होती. खेळ आणि कला याला सीमा असू नयेत, हे खरे. मात्र, यावेळची पार्श्वभूमी वेगळी होती. 'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताने पाकिस्तानचा दुटप्पीपणा जगापुढे उघड केला. अशावेळी हा सामना टाळता आला असता, अशी भावना अनेकांच्या मनात होती. या सामन्याचे प्रसारण जगभर होणार होते.
आंतरराष्ट्रीय समुदायासमोर पाकिस्तानला एकटे पाडण्यासाठी हा सामना भारताने खेळायला नको होता, असा एक प्रवाह होता. अर्थात, सीमेवर कितीही ताण असला, तरी दोन देशांतील माणसांचे परस्परांशी नाते असते. क्रिकेट हा त्यासाठी सेतू आहे. त्यामुळे अशा सामन्यांचे स्वागतच केले पाहिजे. मात्र, सरकार अथवा बीसीसीआय यांनी कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. त्यामुळे गोंधळाचे वातावरण तयार झाले. लोकांचा अंदाज घेत बीसीसीआयची पावले पडत होती. एका टप्प्यावर बीसीसीआयलादेखील तीव्र रोषाची जाणीव झाली होती. प्रतीकात्मक पद्धतीने दोन्ही संघांमधील हस्तांदोलन नाकारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. हस्तांदोलन न करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) होता. पण यामुळे नवे प्रश्न निर्माण झाले. तुम्ही त्यांच्याशी हस्तांदोलन करणार नाही, तर मग सामना का खेळला? दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या देशासोबत खेळून तुम्ही काय मिळवले? किंवा मग खेळण्याचा निर्णय घेतला असेलच, तर मग हस्तांदोलन का टाळलेत? १४ सप्टेंबर रोजी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा सहज पराभव केला खरा, पण विजयानंतर चर्चा रंगली ती हीच. सामना संपल्यानंतर खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करतात, ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रस्थापित परंपरा आहे. मात्र, यावेळी असे घडले नाही. याला 'प्रतीकात्मक निषेध' मानले गेले.
अनेकांनी या कृतीचे समर्थनही केले. जो पाकिस्तान दहशतवादाला आश्रय देतो, अशा देशाशी हस्तांदोलन न करणे हे योग्यच आहे. पण, खेळाडू हस्तांदोलन करणार नाहीत, तर मग सामना खेळायलाच हवा का? खेळाच्या माध्यमातून तरी पाकिस्तानला जागतिक स्तरावर मान्यता देणे कितपत योग्य आहे, हा प्रश्नही उपस्थित झाला. खुद्द पाकिस्तान क्रिकेट मंडळाने यावर नाराजी व्यक्त केली. तीही स्वाभाविक मानायला हवी. सामन्यानंतर मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांनी माफी मागितली. गैरसमजातून असे घडल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, त्यामुळे पाकिस्तानचे समाधान झालेले दिसत नाही. यावर सर्वदूर चर्चा झाली. काहींना हा न्याय्य निषेध वाटला, तर काहींना हा खेळाच्या परंपरेचा अवमान भासला.
अमेरिकन एपी न्यूजने या घटनेला थेट राजकारणाशी जोडले. त्यांच्या मते हस्तांदोलन न होणे हे भारत-पाकिस्तान द्विपक्षीय तणावाचे प्रतिबिंब आहे. ब्रिटनमधील रॉयटर्सने पाकिस्तानच्या कर्णधाराच्या प्रतिक्रियेचा दाखला देत हा सामना क्रिकेटपेक्षाही राजकीय रंग घेऊन झाल्याचे नमूद केले. मुळात मुद्दा असा आहे की, मैदानावर तुम्ही येता, तेव्हा फक्त खेळाडू असता. पॅरिस ऑलिंपिकमध्ये रशिया आणि युक्रेन यांचे खेळाडू एकमेकांसोबत मैदानात दिसले. या दोन देशांमध्ये थेट युद्ध सुरू असतानाही खेळाडू मात्र सोबत होते. अशा प्रकारची कैक उदाहरणे देता येणे शक्य आहे. जगाने असे अनेक सामने आजवर पाहिले आहेत. सामना व्हावा अथवा न व्हावा, याविषयीचा निर्णय राजकारणातून घेतला जाऊ शकतो. मात्र, एकदा क्रीडांगणावर उतरल्यानंतर सर्वजण फक्त खेळाडू असतात ! तिथे खिलाडूवृत्तीच दिसायला हवी. हस्तांदोलन टाळणे हे कोत्या मनोवृत्तीचे लक्षण आहे. अशी मनोवृत्ती मैदानावर शोभत नाही. आधी हात पुढे करायचा आणि मग हस्तांदोलन न करता तो मागे घ्यायचा, हा प्रकार टाळायला हवा होता. याला हात दाखवून अवलक्षण म्हणतात. मैदानावर आपले खेळाडू जिंकले, पण बीसीसीआय मात्र हरली, ती या अखिलाडूपणामुळे !