शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

‘ब्रॅंडेड’ नैवेद्याची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 07:03 IST

‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’, हे राज्याचे बहुधा नवे घोषवाक्य झाले आहे. उलट अर्थाने त्याची प्रचिती पदोपदी येतेच आहे. परवा अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर ट्रस्टने ठरावच केला.

‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’, हे राज्याचे बहुधा नवे घोषवाक्य झाले आहे. उलट अर्थाने त्याची प्रचिती पदोपदी येतेच आहे. परवा अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर ट्रस्टने ठरावच केला. ‘यापुढे शनिच्या शिळेवर केवळ ब्रँडेड खाद्यतेल अर्पण करावे. देवळाच्या आसपासच्या सर्व व्यावसायिकांनी अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरणाची मान्यता असेल असे ब्रँडेड खाद्यतेलच विक्रीसाठी ठेवावे. सुटे तेल अर्पण करू नये, कारण त्यातून शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होण्याचा धोका आहे’, असा तो ठराव आहे. सुट्ट्या तेलाने रक्तवाहिन्यांतील ‘ब्लॉकेज’ वाढतात, म्हणून हल्ली लोक ब्रँडेड तेल वापरतात. शनि ट्रस्टचा निर्णय पाहता देवाच्या स्वयंभू शिळेतही आता साध्या तेलापासून संरक्षण करण्याची शक्ती उरली नाही, असेच म्हणावे लागेल. भेसळीला जनताच नव्हे तर देवही घाबरले आहेत, हे राज्याच्या अन्न, औषध भेसळ प्रतिबंधक विभागाने व मंत्र्यांनीही ध्यानात घ्यावे. शिवाय हल्ली जमाना ब्रँडचा आहे. ‘जे जे साधे ते फालतू’ अशी मानसिकता कॉर्पोरेट जगाने पेरली आहे. तेव्हा देवांनी तरी ब्रँडेड नैवेद्याची आशा का बाळगू नये? वास्तविकत: सर्वच अन्नात भेसळ आहे. दुधातही भेसळ आहे. त्यामुळे यापुढे दूध तपासूनच त्यापासून पेढे बनवायला जायला हवेत.

  ब्रँडेड पेढाच देवाला चढवावा. कारण, भेसळीच्या पेढ्याने देवाचे पोट बिघडले तर देवाला कुठल्या दवाखान्यात दाखल करणार? देवांचे पोट बरे करणारा अभ्यासक्रम ‘एमबीबीएस’मध्ये अजून शिकविला जात नाही. त्यामुळे विश्वस्त मंडळांनी अगोदरच काळजी घेतलेली बरी. देवाच्या अंगावरील कपडेही साधे नकोतच. ते अंगाला टोचले, खाज सुटली तर काय करणार? काही पाने, फुलेही ॲलर्जी निर्माण करू शकतात. तीही तपासली जायला हवीत. ‘ब्रँडेड नैवेद्य व पान-फूल मिळेल’, अशाच पाट्या मंदिरांच्या भोवती यापुढे दिसायला हव्यात. कार्पोरेट कंपन्यांनी या नव्या उद्योगात उतरायला हरकत नाही. कारण, महाराष्ट्राने ठरविले आहेच ‘आता थांबायचे नाही’. गत महिन्यात मुंबईत सिद्धिविनायक मंदिराच्या विश्वस्तांनी निर्णय घेतला की, तोकडे कपडे घालून मंदिरात आल्यास प्रवेश मिळणार नाही. धर्मात मोठ्या विसंगती असतात. मंदिरातील पुजाऱ्यांनी पूर्ण कपडे न घालता देवाची पूजा केलेली चालते. महिलांसमोर उघडे पुजारी बसणे हे  बीभत्स  नाही. पण, महिलांनी तोकडे कपडे घातले तर ते बीभत्स. नागा साधू कुंभमेळ्यात चाललात. नागा महिला साध्वीही कुंभमेळ्यात दिसल्या.

 भाविकांनी मात्र तोकडे कपडे घालायचे नाहीत. हा पक्षपात देवाच्या दारात सनातनीच म्हणायचा. देवळे तशा नाना तऱ्हा आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातच एका देवाला केवळ ब्रँडी लागते. हे केवळ हिंदू धर्मात आहे, असे नव्हे. केवळ हिंदू धर्माचीच बदनामी नको. अशा कुप्रथा, अंधश्रद्धा सर्व धर्मांत आहेत. मुस्लीम धर्मात काही दर्ग्यांना केवळ मांसाहारी नैवेद्य लागतो. त्यातून प्राण्यांची कत्तल होते. तेथेही महिलांवर बंधने आहेतच. देवांतही शाकाहारी देव, मांसाहारी देव असा फरक आहे. काही देवांच्या जत्रेत केवळ नाचगाणी चालतात. तशा प्रथा आहेत. माणसांत जे विलासाचे छंद आहेत ते देवांतही जडलेले दिसतात. प्रबोधनकार ठाकरे म्हणतात ‘जो माणसांचा थाट तोच देवांचा. ज्या माणसांच्या चैनीच्या गोष्टी त्याच देवांच्या. माणसे रात्री निजतात. देवसुद्धा शेजारती होताच पलंगी पहुडतात’.  जसा भक्त तसा देव. देव कोण असतील अन् त्यांना काय हवे या सर्व अटी, शर्ती माणसांनीच ठरविल्या.

 महात्मा फुलेंनी त्यावर तर प्रहार केला. देवांच्या नावे चाललेले शोषण थांबवा असे ते म्हणाले. संत तुकारामांनी व संतांनीही त्याअगोदरच महाराष्ट्राला हेच सांगितले. शनिच्या शीळेवर तेल ओतण्यापेक्षा ते तेल गरीब जनतेच्या अन्नात का नको? हा विचार महाराष्ट्र धर्म मांडतो. संतांनी हेच सांगितले आहे, पण ते आठवायला आणि आचारणात आणायला वेळ कोणाला आहे? ईश्वराला अंधश्रद्धतेतून बाहेर काढणे म्हणजे धर्म बुडविणे नव्हे. धर्म हवा तसे विज्ञानही हवे हे देवळांच्या दलालांनी व विश्वस्तांनी कधीतरी ध्यानात घ्यायला हवे. लोकांना जेवढे अंधश्रद्धाळू बनवाल तेवढी धर्मावर टीका होत राहील.