स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा डॉ. बाबा आढाव सतरा वर्षांचे होते. पं. नेहरूंनी नियतीशी केलेल्या कराराचे ते साक्षीदार होते. स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेल्या या माणसाने मग अनेकदा अंधारून येतानाही पाहिले. मात्र, या प्रत्येक वळणावर स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी, लोकशाही जपण्यासाठी आणि समतेचे मूल्य अधोरेखित करण्यासाठी बाबा उभे ठाकले. अखेरच्या क्षणापर्यंत लढत राहिलेल्या बाबांनी शेवटचा श्वास घेतला, तेव्हा लाखो कष्टकऱ्यांना हुंदका अनावर झाला. डॉ. बाबा आढाव विचारवंत होतेच, पण रस्त्यावर उतरणारे लोकनेते होते. बाबांनी पायाभरणी केलेल्या चळवळींची, विधायक उपक्रमांची यादी खूपच मोठी आहे. एक गाव-एक पाणवठा, एक गाव-एक मसणवट, सामाजिक कृतज्ञता निधी, हमाल पंचायत, कष्टाची भाकर, कागद-काच-पत्रा पंचायत, रिक्षा पंचायत, धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाची चळवळ, भटक्यांची चळवळ, देवदासी मुक्ती चळवळ, मनुपुतळा हटाव चळवळ, राष्ट्रीय एकात्मता चळवळ, विषमता निर्मूलन शिबिरे, हरिनाम सप्ताहविरोधी आंदोलन, दुष्काळ निर्मूलन परिषदा, माहिती अधिकार कायदा, आळंदी-पंढरपूर वारीतील दिंड्यांमधील जातविषमता मिटवण्याचे आंदोलन, महिला विडी कामगार आंदोलन; परित्यक्ता, अपंग, असुरक्षित, अंगमेहनती, कष्टकरी, हमाल मापाडी, मातेरे गोळा करणारे, रिक्षा-टेम्पो चालक, चाळणा कामगार, बांधकाम मजूर, पथारी व्यावसायिक आदींसाठीची आंदोलने. ही यादी आणखीही वाढवता येऊ शकते. बाबा हे खऱ्या अर्थाने लोकांचे नेते होते.
महानगरपालिकेच्या राजकारणातही काही काळ ते उतरले. नंतर मात्र त्यांनी आपली वाट निवडली. बाबाच एकदा म्हणाले होते, ‘विधिमंडळाची दोन सभागृहे असतात. एक विधानसभा आणि दुसरी विधानपरिषद. तिथे जाण्यासाठी, बहुमत आणण्यासाठी, सत्ता स्थापून मंत्री होण्यासाठी सगळे राजकारण होत असते. ज्यांना हे जमत नाही ते विरोधात बसतात. यापलीकडे एक सभागृह आहे. ते आहे रस्त्यावरच्या चळवळींचे तिसरे सभागृह. जनसभा! मी त्याचा तहहयात अध्यक्ष आहे!’ त्यामुळे न थकता ते सदैव लोकांसोबत उभे ठाकले. भारताचे वैशिष्ट्य काय असेल, तर या देशाचे सगळे ‘फाउंडिंग फादर्स’ एकाच वेळी रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते होते आणि त्याचवेळी ‘ॲकॅडमिशियन’ही होते! महात्मा फुले असोत की शाहू महाराज. गांधी असोत की नेहरू. आंबेडकर असोत की मौलाना आझाद. हे सारेच तसे होते. अशा माणसांनीच जनजीवन फुलवले. सामान्य माणसाला आपल्या लढाईचा केंद्रबिंदू केले. ज्याला कोणी नाही, अशा समूहाला उराशी कवटाळले. म्हणून आजचा भारत उभा आहे. बाबा त्याच वाटेवरून चालणारे नेते होते. त्यांना परंपरेचा अवकाश समजला होता आणि त्यावर उभे राहून जो आधुनिक देश उभा करायचा, त्याचेही भान बाबांना होते. म्हणून ते म्हणाले होते, ‘शोषणाच्या लढाईत कार्ल मार्क्सच्या पुढे जावे लागणार आहे. परिवर्तनवादी चळवळीने चीनचा कम्युनिझम स्वीकारावा की, रशियाचा मार्ग स्वीकारावा या चर्चेपेक्षाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही व्यवस्थेवर दाखवलेला विश्वास मला महत्त्वाचा वाटतो आणि हाच एक पर्याय परिवर्तनवादी चळवळींपुढे आहे.’ आज चळवळीच संपल्यासारखे वातावरण भवताली आहे. मुद्दा फक्त व्यवस्थेचा आणि माध्यमांचा नाही. मुद्दा दहशतीचाही नाही. मुद्दा आहे, लोकांनी विश्वास ठेवावा, असे कोण आहे? काळ बदलला, हे याचे कारण नाही. ट्रम्प आणि पुतिन यांच्यापेक्षाही भयंकर असणारे हिटलर आणि मुसोलिनी होतेच. तेव्हाही, त्याच काळात भारताने गांधी स्वीकारला. सगळ्या दडपशाहीला तो पुरून उरला. एका गांधींनी आवाज दिला आणि लाखो बायबापड्यांनी रस्त्यावर उतरून त्यांना प्रतिसाद दिला. एका बाबासाहेबांनी आवाज दिला आणि जनसागर त्यांच्यासोबत गेला.
हे घडवण्याची क्षमता असणारे डॉ. बाबा आढाव हे अखेरचे नेते होते. कष्टकऱ्यांचे पुढारी होतेच, पण बदलावर विश्वास असणारे कलासक्त होते बाबा. त्यामुळेच कोणत्याही कार्यक्रमाला बाबा आले की सोनचाफ्याचा गंध येत असे. प्रत्येकाच्या हातावर चाफ्याची फुले देत बाबा उमलायला शिकवत. जोहरान ममदानी न्यूयॉर्कचे महापौर झाल्यावर बाबा म्हणाले, ‘कष्टकरी एकवटला तर तो सत्तांध तख्त उलथवून टाकतो’. आज सर्वाधिक गरज असतानाच, पन्नालाल सुराणा गेले. आता बाबा गेले. एक पर्व संपले. बाबा नावाचे गाव गेले. पण, हा पाणवठा अखंड असणार आहे. ‘सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर’ हा बाबांचा आवाज आसमंतात भरून राहणार आहे.
Web Summary : Dr. Baba Adhav, a freedom movement participant, championed equality and fought for the working class until his last breath. A true leader, he initiated numerous social movements, advocating for the marginalized and envisioning a modern, equitable India, leaving behind a legacy of relentless activism.
Web Summary : डॉ. बाबा आढाव, स्वतंत्रता आंदोलन के भागीदार, समानता के लिए लड़े और अंतिम सांस तक श्रमिक वर्ग के लिए संघर्ष करते रहे। एक सच्चे नेता, उन्होंने कई सामाजिक आंदोलनों की शुरुआत की, हाशिए पर रहने वालों की वकालत की और एक आधुनिक, न्यायसंगत भारत की कल्पना की, जो अथक सक्रियता की विरासत छोड़ गए।