पुन्हा ‘कोमागाटा’!
By Admin | Updated: May 23, 2016 03:50 IST2016-05-23T03:50:23+5:302016-05-23T03:50:23+5:30
शाळेत इतिहास विषयाचा अभ्यास करताना कोमागाटा मारू हे नाव कानावरून गेल्याचे अनेकांना अंधुक का होईना, आठवत असेल. कोमागाटा मारू हे वाफेवर चालणारे जपानी

पुन्हा ‘कोमागाटा’!
शाळेत इतिहास विषयाचा अभ्यास करताना कोमागाटा मारू हे नाव कानावरून गेल्याचे अनेकांना अंधुक का होईना, आठवत असेल. कोमागाटा मारू हे वाफेवर चालणारे जपानी जहाज तब्बल एक शतकानंतर पुन्हा चर्चेत आले आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी कोमागाटा मारू प्रकरणासाठी, संसदेच्या कनिष्ठ सभागृहात माफी मागितली. कॅनडामध्ये स्थायिक झालेले शीख बांधव गत एक शतकापासून त्यासाठी लढा देत होते. यापूर्वी कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान स्टीफन हार्पर यांनीही या प्रकरणी एका भाषणादरम्यान क्षमायाचना केली होती; मात्र क्षमायाचना संसदेत व्हावी आणि ती ‘रेकॉर्ड’वर यावी, यासाठी शीख समुदायाने लढा सुरूच ठेवला होता. त्यांच्या त्या अविरत लढ्याला अखेर यश मिळाले. कोमागाटा मारू हे जपानी जहाज २३ मे १९१४ रोजी कॅनडातील व्हॅँकुव्हर शहराच्या किनाऱ्याला लागले होते. जहाजात पंजाबमधील ३७६ उतारू होते. त्यापैकी केवळ २४ जणांना कॅनडा सरकारने देशात दाखल होण्याची परवानगी दिली आणि उर्वरित ३५२ जणांना तब्बल दोन महिने जहाजातच अडकवून ठेवल्यानंतर भारतात परत धाडले. स्वातंत्र्य, समृद्धीची स्वप्ने मनाशी रंगवत मोठ्या हुरुपाने कॅनडाला पोहोचलेल्या त्या दुर्दैवी जिवांच्या नशिबाचे दशावतार तिथेच संपले नाहीत, तर भारतात परतल्यानंतर कोलकाता बंदरात जहाजातून खाली उतरत असताना, ब्रिटिश सैनिकांनी त्यांच्यावर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १९ जण ठार झाले होते. काही जण पलायन करण्यात यशस्वी ठरले; पण इतरांना पकडून एक तर तुरुंगात डांबण्यात आले, किंवा प्रथम महायुद्ध संपेपर्यंत नजरकैदेत ठेवण्यात आले. कॅनडा सरकारची ती कृती स्वत:च्या कायद्याला खुंटीवर टांगणारी तर होतीच; पण अत्यंत अमानवीयही होती. कोमागाटा मारूवरील प्रवाशांना देशात दाखल झालेल्या निर्वासितांचा दर्जा प्राप्त होऊ नये, यासाठी तत्कालीन कॅनडा सरकारने जहाजाला जाणीवपूर्वक किनाऱ्यापासून दूर तर लोटलेच; पण प्रवाशांना अन्न, पाणी व इतर जीवनावश्यक वस्तूही नाकारल्या होत्या. युरोपातून लाखो लोक कॅनडात स्थायिक होण्यासाठी येत असताना, तत्कालीन ब्रिटिश अधिपत्याखालील भारतातील निर्वासितांना देशात प्रवेशच द्यायचा नाही, असेच धोरण कॅनडा सरकारने त्यावेळी स्वीकारले होते. कोमागाटा मारू अध्याय हा त्या वंशविद्वेशी धोरणाचाच परिपाक होता. कॅनडाच्या इतिहासातील तो एक काळाकुट्ट डाग आहे. तब्बल एक शतक उलटून गेल्यानंतर, माफी मागून तो डाग धुण्याचा प्रयत्न पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी केला आहे. ट्रुडो यांच्या माफीनाम्यामुळे कोमागाटा मारूवरील प्रवाशांना कोणताही फरक पडू शकत नाही. ते सगळे त्या पलीकडे निघून गेले आहेत; पण काळ सूड उगवत असतो म्हणतात! ज्या शीख समुदायातील लोकांना एक शतकापूर्वी कॅनडाने प्रवेश नाकारला होता, तोच समुदाय आज कॅनडाच्या अर्थकारणाला दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका अदा करीत आहे. ट्रुडो यांच्या माफीनाम्याला तो कंगोरा आहेच; पण तरीही त्यांनी ज्या दिलदारपणाचा परिचय दिला आहे, त्याबद्दल त्यांचे कौतुक केलेच पाहिजे!