पुन्हा थरारली नवनिर्माणाची वीट !

By Admin | Updated: August 6, 2016 04:39 IST2016-08-06T04:39:24+5:302016-08-06T04:39:24+5:30

गोदावरीला आलेल्या पुराच्या पाण्याने उद्ध्वस्त झालेला ‘गोदा पार्क’ राज ठाकरे यांच्या स्वप्नपूर्तीसाठी म्हणून पुन्हा उभारता येईलही

Again fluttering new! | पुन्हा थरारली नवनिर्माणाची वीट !

पुन्हा थरारली नवनिर्माणाची वीट !


गोदावरीला आलेल्या पुराच्या पाण्याने उद्ध्वस्त झालेला ‘गोदा पार्क’ राज ठाकरे यांच्या स्वप्नपूर्तीसाठी म्हणून पुन्हा उभारता येईलही; पण निसर्गाची परीक्षा कितीदा पाहायची, याचाही कधी, कुणी विचार करणार आहे की नाही?
निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही, कारण त्याची मर्जी फिरते तेव्हा तो शहर कोणते, तेथील संस्था कोणती, त्यातील सत्ता कुणाची वा कोणत्या पक्षाची, असे काही पहात नाही. त्यामुळे नाशकातील धुवाधार पावसात आपल्या ‘ड्रिम प्रोजेक्ट’ म्हणवल्या जाणाऱ्या ‘गोदा पार्क’ची झालेली वाताहत पाहून नवनिर्माणकार राज ठाकरेच काय, अवघे नाशिककर खिन्न होणे स्वाभाविक आहे; पण वारंवार निसर्गाची परीक्षा घेत निसर्गालाच आव्हान देण्याचे प्रकार घडून येत असल्यानेच सदर नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याची वास्तविकता या निमित्ताने तरी स्वीकारली जाणार आहे का, हा खरा प्रश्न आहे.
या आठवड्याच्या प्रारंभी नाशकात झालेल्या पावसाने आजवरचे सारे उच्चांक मोडले. चोवीस तासात म्हणजे एका दिवसात कधी नव्हे तो तब्बल २०४ मिलिमीटर पाऊस नाशकात कोसळला. संततधार, कोसळधार, मुसळधार आदि. विशेषणे थिटी पडावीत असा हा पाऊस होता. त्यामुळे साहजिकच जनजीवन विस्कळीत झाले. अनेकांना व विशेषत: गोदाकाठच्या रहिवासी व शेतकऱ्यांना त्याचा मोठाच फटका बसला. अजूनही ही परिस्थिती पूर्वपदावर येऊ शकलेली नाही, घराघरांतील व गल्लीबोळातील गाळ काढणी अद्याप सुरूच आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा तात्यासाहेब शिरवाडकर यांनी लिहून ठेवलेल्या ‘गोदामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून; माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली’, या ओळींचा प्रत्यय आणून देणाऱ्या निसर्गाच्या तांडवाने जिथे अनेकांना उद्ध्वस्त केले तिथे ‘गोदा पार्क’कडे वेगळ्या नजरेतून बघता येऊ नये हे खरेच; पण राज ठाकरेंच्या स्वप्नातील या प्रकल्पावर कोट्यवधीचा खर्च होत असून, तो दरवर्षीच पाण्यात जात असल्याने आता तरी यातून काही बोध घेतला जाणार आहे की नाही, असा सवाल उपस्थित होऊन गेला आहे. २००२मध्ये महापालिकेतील तत्कालीन शिवसेनेच्या सत्ताकाळात हाती घेतलेल्या या प्रकल्पाला आजवर गोदावरीच्या पुरामुळे वारंवार नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. यंदाच्या नुकसानीची पाहणी करताना स्वत: राज ठाकरे जेव्हा ‘गोदा पार्क’वर गेले तेव्हा तेथील वाताहत पाहून तेही खिन्न मनाने परतले. कारण, राज्यभर ज्या प्रकल्पाची त्यांनी वाजंत्री वाजविली त्याचे लोकार्पण होऊ घातले असताना त्यापूर्वीच त्याचे पुरात मोठे नुकसान झाले. त्यामुळे राज ठाकरे यांची खिन्नता हा माध्यमांच्याच काय, कुणाच्याही आनंदाचा विषय जरी होऊ शकत नसला तरी, तो पुनर्विचाराचा नक्कीच होऊ शकणारा आहे.
मुळात, पूररेषेत कामे करून निसर्गाला आव्हान देण्याची कृती ही या साऱ्या विध्वंसामागे आहे, हे या संदर्भाने लक्षात घ्यायला हवे. यापूर्वी २००८मध्ये जेव्हा अशाच महापुराने नुकसानीस सामोरे जाण्याची वेळ आली होती तेव्हा गोदेच्या काठावरील पूररेषेच्या निश्चितीला चालना मिळून गेली होती. त्यावेळीही या ‘गोदा पार्क’चे नुकसान घडून आले होते. परंतु राजहट्टामुळे त्याबाबत पुनर्विचार करण्याचे सोडून उलट महापालिकेत ‘मनसे’ची सत्ता आल्यावर नव्याने काम हाती घेतले गेले. तेव्हा या पार्कचेच नव्हे, तर पूररेषेत प्रतिबंध असतानाही बांधल्या जाणाऱ्या सर्वच कामांबाबत यासंबंधीच्या निर्बंधांचे काटेकोर पालन होण्याची गरज यानिमित्ताने पुढे आली आहे. मात्र तेच होताना दिसत नाही. पाण्याचा निचरा होणारे शहरातील नैसर्गिक स्त्रोत बुजले गेले आहेत. तसेच गोदाकाठावर झालेल्या बांधकामांमुळे नदीपात्र आकुंचले असून, पुराचे पाणी पात्राबाहेर रहिवासी वसाहतींमध्ये शिरणे अगदी स्वाभाविक ठरून गेले आहे. ‘निरी’सह पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या समाजसेवी संस्थांनी याबाबत वेळोवेळी घसा ओरडून सांगून झाले आहे. पण, लक्षात घेतो कोण? राज ठाकरे यांच्या स्वप्नातील नवनिर्माणाची वीट पुन्हा थरारली आहे, तीही या दुर्लक्षामुळेच.
- किरण अग्रवाल

Web Title: Again fluttering new!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.