चीन अन् अमेरिकेच्या युद्ध्यात सर्वांत जास्त भारत भाजून निघेल; पाहा यामागील काही कारण....!

By विजय दर्डा | Published: August 8, 2022 07:28 AM2022-08-08T07:28:59+5:302022-08-08T07:29:11+5:30

तैवानचे निमित्त करून चीन जगाला धमकावण्याचा प्रयत्न करतो आहे; पण परिस्थिती चिघळली तर त्यातून कुणीच वाचणार नाही!

After the US House of Representatives Speaker Nancy Pelosi's visit to Taiwan, China has flared up. | चीन अन् अमेरिकेच्या युद्ध्यात सर्वांत जास्त भारत भाजून निघेल; पाहा यामागील काही कारण....!

चीन अन् अमेरिकेच्या युद्ध्यात सर्वांत जास्त भारत भाजून निघेल; पाहा यामागील काही कारण....!

googlenewsNext

- विजय दर्डा 

अमेरिकी प्रतिनिधी सभागृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीनंतर चीनचा भडका उडाला आहे. यामुळे अमेरिकेबरोबर युद्धाची ठिणगी उडेल का? - तसे वाटत नाही. आपल्या देशी भाषेत सांगायचे तर मारामारी चालू राहील, युद्ध पेटेल असे नाही. जग व्यापारावर चालते. ना चीन हिंमत करील, ना अमेरिकेला युद्ध हवे आहे; पण दुर्दैवाने ती वेळ आलीच, तर त्या आगीत जग तर होरपळेलच, पण हिंदुस्तान सर्वांत जास्त भाजून निघेल.

मुळात तैवानवर चीनचा डोळा का? - तर दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी चीनमधील कम्युनिस्ट पक्ष तिथल्याच सत्तारूढ नॅशनल पार्टीशी (कुओमिन्तांग ) लढत होता. १९४९ मध्ये माओ त्से तुंग यांच्या नेतृत्वाखालील चिनी कम्युनिस्टांनी चीनच्या मुख्य भागावर कब्जा मिळवला. कुओमिन्तांग समर्थक पळून नैऋत्य द्वीप तैवानमध्ये शरण गेले. तेव्हापासून चीन तैवानला आपला हिस्सा मानतो आहे. तिबेट गिळल्यावर चीनची हिम्मत आणखी वाढली. इवल्याशा तैवानने लोकशाही आणि तंत्रज्ञान-विकासाच्या आधाराने आपली समृद्ध ओळख निर्माण केली. चीनमध्ये मात्र हुकूमशाही आहे. तो देश जमिनीचा प्रत्येक तुकडा गिळायला निघाला आहे.

चीनच्या ताकदीमुळे जेमतेम डझनभर देशांनीच तैवानला मान्यता दिली. अमेरिका आणि भारतासारख्या देशांनी तैवानला मान्यता दिलेली नाही; परंतु पडद्याआडून संबंध मात्र जरूर ठेवले. तैवानच्या सुरक्षिततेसाठी अमेरिकेने एक प्रस्तावही मंजूर केला आहे. चीनचा विरोध असतानाही अमेरिका तैवानला शस्त्रास्त्रे विकते आहे. हाँगकाँग हातात आल्यावर तैवानवर ताबा मिळवण्याची चीनची इच्छा वाढत गेली. 
सैनिकी दृष्टीने पाहिले तर तैवानची ताकद नगण्य आहे. चीनकडे साधारणत: वीस लाखांवर सैनिक आहेत, तर तैवानजवळ जेमतेम एक लाख त्रेसष्ट हजार. दोघांच्या सैनिकी शक्तीची तुलनाच होऊ शकत नाही.

गेल्या वर्षी चीनची लढाऊ विमाने तैवानच्या आकाशात घिरट्या घालून धमक्या देऊन गेली. परंतु तैवानची भौगोलिक स्थिती इतकी संवेदनशील आहे की अमेरिका, भारत किंवा जपान त्या देशाला चीनच्या घशात जाऊ देणार नाही. ‘क्वाड’ची स्थापना त्यासाठीच झाली आहे. सैनिकी दृष्टिकोनातून दक्षिण चीनचा समुद्र अमेरिका, भारत आणि जपानसारख्या देशांसाठी महत्त्वाचा आहे. चीनने तैवानवर हल्ल्याचे दु:साहस केले तर अमेरिका त्यात उतरण्याची पुरेपूर शक्यता आहे. जपान, ऑस्ट्रेलिया आणि युरोपातले देशही त्यात सामील होतील. १९९६ मध्ये जेव्हा तैवानच्या खाडीत तणाव उत्पन्न झाला तेव्हा अमेरिकेने लढाऊ विमानांचे दोन ताफे तैवानच्या मदतीसाठी पाठवले होते. 

तैवानकडे मोठे सुरक्षा कवच आहे : ‘सिलिकॉन कवच’! जगातले बहुतेक देश तैवानमध्ये तयार होणाऱ्या अत्याधुनिक सेमी कंडक्टर चिप्स वापरतात. त्यात चीनही येतो. या चिप्स तयार करण्याची गती थोडी मंदावली तरी जगभरात मोठे संकट उत्पन्न होऊ शकते. या चिप्स जगातल्या केवळ काही डझन देशांत तयार होतात; पण तैवान आणि दक्षिण कोरिया यांचे या उत्पादनात वर्चस्व आहे. 
मोबाइलपासून विमान, अंतरिक्ष विज्ञान सगळे काही या चिपवर चालते. शिवाय सध्या चीनची परिस्थिती खूप वाईट आहे. बँकिंग प्रणाली कोलमडली असून, चीनच्या काही भागांत तर लोकांना बँकेतून पैसे काढायला मनाई आहे. संतप्त जमावापासून बँका वाचवण्यासाठी रस्त्यावर रणगाडे आणून उभे करावे लागले आहेत. देशात लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

स्थिती आणखी बिघडली तर कोणत्याही क्षणी लोकांच्या विद्रोहाला सामोरे जावे लागेल. सत्ता हातात ठेवण्यासाठी  ‘तिआनमेन चौका’ची पुनरावृत्ती करण्याची वेळ यावी,  असे जिनपिंग यांना कधीही वाटणार नाही. लोकशाहीची मागणी करणाऱ्या लक्षावधी तरुणांना या चौकात चिनी रणगाड्यांनी चिरडले होते. पी. व्ही. नरसिंह राव यांच्याबरोबर मी चीनच्या प्रवासाला गेलो तेव्हा या  चौकातही गेलो होतो. चिनी लोकांना त्या घटनेबद्दल विचारले तर ते म्हणाले, ‘असे काहीच घडलेले नाही. तुम्ही म्हणता ती अमेरिकेने रचलेली कहाणी आहे.’ तैवानवर हल्ल्याची हिंमत करणे चीनसाठी सोपे असणार नाही.

रशियाही चीनला असा हल्ला करण्यापासून अडवील; परंतु अखेरीस हे जागतिक राजकारण आहे! त्याबद्दल काही भविष्यवाणी करणे सध्या अवघडच! युद्ध पेटलेच तर चीनलासुद्धा खूप मोठी किंमत चुकवावी लागेल. युक्रेनने रशियाच्या नाकात दम आणला आहे. तैवान तर त्याच्याही पुढेच असेल. मात्र, हे युद्ध सगळ्या जगाला उद्ध्वस्त करील. अमेरिका आणि चीनमध्ये युद्ध पेटलेच, तर ते जमिनीपासून अंतराळापर्यंत पसरेल. सगळ्या जगाला सावध राहण्याची गरज आहे. भारताने तर जास्तच सावध राहिले पाहिजे. कारण अमेरिका आणि चीन दोघेही भारताला त्यात ओढू पाहतील. चीन ही आधीच भारताची डोकेदुखी आहे. गेल्या जूनपासून आतापर्यंत अनेक वेळा चिनी लढाऊ विमानांनी भारतीय हवाई क्षेत्राचे उल्लंघन केले आहे.

डोकलाम आणि गलवानमध्ये आपल्याला अडचणीत आणण्याचा मोठा प्रयत्न चीनने केला. भारताचा भूभाग गिळण्याची आस लावून बसलेल्या चीनला  हे कळले पाहिजे की आजचा भारत हा १९६२ चा भारत नाही. मी अलीकडेच सीमेवर तैनात भारतीय सैनिकांच्या ताकदीची प्रचीती घेतली आहे. ते चीनला धूळ चारण्याच्या तयारीत उभे आहेत. तरीही युद्ध होऊ नये. तेच सर्वांच्या भल्याचे आहे. रशिया आणि युक्रेनमधल्या लढाईमुळे जगाचे काय नुकसान झाले ते आपण सर्वजण पाहतो आहोत. युद्ध शेवटी सगळ्यांना उद्ध्वस्त करते. सर्वांना गरीब करून सोडते... ही वेळ सावरण्याची आहे.

Web Title: After the US House of Representatives Speaker Nancy Pelosi's visit to Taiwan, China has flared up.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.