टोनी ब्लेअर यांचा पश्चात्ताप की पश्चातबुद्धी
By Admin | Updated: October 30, 2015 21:28 IST2015-10-30T21:28:51+5:302015-10-30T21:28:51+5:30
‘कॉल अ डॉग मॅड अँड किल हिम’ असे म्हणतात. इराकवर अमेरिकेने केलेल्या हल्याची गत अशीच असल्याची ओरड जवळपास गेली दहा वर्षे केली जात होती व ही टीका योग्य होती

टोनी ब्लेअर यांचा पश्चात्ताप की पश्चातबुद्धी
प्रा. दिलीप फडके
‘कॉल अ डॉग मॅड अँड किल हिम’ असे म्हणतात. इराकवर अमेरिकेने केलेल्या हल्याची गत अशीच असल्याची ओरड जवळपास गेली दहा वर्षे केली जात होती व ही टीका योग्य होती असे ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी अलीकडेच केलेल्या वक्तव्यावरून सिध्द झाले आहे. इराकवर हल्ला आणि सद्दामचा पाडाव यासाठी करण्यात आलेली लष्करी कारवाई ही एक चूक असून आज जगासमोर उभे राहिलेले इसिसचे महाभयंकर संकट केवळ त्यातूनच उभे राहिले आहे अशी कबुली त्यांनी दिली आहे. जगाच्या प्रतिपालनाचा ठेका स्वत:कडे आहे असे समजणारे देश किती लबाडीने आणि बेजबाबदारपणे निर्णय घेतात याचा एक भयंकर नमुना त्यामुळे जगासमोर आला आहे. आपल्याकडे कोणत्याही प्रकारची महासंहारक अस्त्रे नाहीत हे सद्दाम जगाला सांगत होता. पण त्याचा खातमा करण्यासाठी जॉर्ज बुश आणि टोनी ब्लेअर यांनी कांगावखोरपणाने महाविनाशक अस्त्रांचा बागुलबुवा उभा केला. युनोच्या सुरक्षा परिषदेसमोर कोलीन पॉवेल यांनी अनेक खोट्यानाट्या गोष्टी सांगितल्या आणि सद्दाम नावाचा एक महाराक्षस इराकमध्ये आहे आणि तो साऱ्या जगाचा नाश करून टाकणार आहे असे वातावरण निर्माण करून इराकवर हल्ला केला. लपून बसलेला सद्दाम सापडला आणि नंतर फासावरही चढवला गेला. बारा वर्षांपूर्वी घडवलेल्या या कपटनाट्याच्या संदर्भात रीतसर चौकशी करण्यासाठी इंग्लंडच्या सरकारने २००९ मध्ये चिलकॉट समिती नेमली होती. या समितीचा अहवाल आता कधीही प्रकाशित होऊ शकतो. अशावेळी ब्लेअर यांनी असे वक्तव्य करावे हे लक्षणीय आहे.
इंटरनेटवरच्या प्रावदाच्या इंग्रजी संस्करणात तसेच ग्लोबल रिसर्चकच्या ब्लॉगवर फॅसिलिटी आॅर्थरनॉट या पत्रकाराचा एक लेख वाचायला मिळतो. इराकच्या संदर्भात आपला गुन्हा सिध्द होण्याच्या भीतीने ब्लेअर कसे अस्वस्थ झाले आहेत हे यात सांगितले आहे. ब्लेअर यांची पाठराखण करून चिलकॉट समितीसमोर सत्य दडवून ठेवण्यात ज्यानी मदत केली त्या सर जेरीमी हेवूड यांच्या पापाचा पंचनामाच लेखकाने सादर केला आहे. इराक युद्धात इंग्लंडला आजच्या दराने ३७ दशलक्ष पौंडाच्या खर्चात लोटले गेले व संसदेची दिशाभूल करून दहा लाख इराकी सैनिकांना मारणे, आठ लाखांच्या वर लहान मुलांना अनाथ करून आणि दहा लाख स्त्रियांना विधवा, जखमी आणि अपंग बनवणारे युध्द लादल्याबद्दल ब्लेअर यांना युध्दगुन्हेगार म्हणून घोषित करावे आणि त्यांच्यावर विशेष खटला चालवावा अशी मागणी मजूर पक्षाच्या जेरेमी कॉर्बयन यांनी केल्याची माहितीही आॅर्थरनॉट यांच्या लेखातून समोर येते. अशीच मागणी पाच वर्षांपूर्वी इंग्लंडच्या सोशालिस्ट पार्टीने जाहीरपणे केली होती. ब्लेअर यांचे वक्तव्य म्हणजे इसिसच्या निर्मितीला कारणीभूत ठरणारे युध्द आपण लादल्याच्या कबुलीचे पहिले पाऊल आहे, असे वॉशिंग्टन पोस्टने आपल्या संपादकीयात म्हटले आहे. पोस्ट पुढे म्हणतो की इराकच्या युद्धाचे भीषण परिणाम जग आज पाहते आहे. त्या अपयशी ‘वॉर आॅन टेरर’मुळेच आज तालिबान्यांना चांगले दहशतवादी ठरवून त्यांचे अफगाणस्तिानात पुरागमन होण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. सिरीयापासून नायजेरिया सोमालिया इतक्या विस्तीर्ण प्रदेशात चालू झालेले इसिसचे थैमान आणि त्याच्या दुष्परिणामांपासून इराकचे युध्द सुरु करणाऱ्यांना पळून जाता येणार नाही. ब्लेअर यांनी कबुली दिली, इतरांचे काय हा प्रश्न अल बवाबा या मध्यपूर्वेतल्या ब्लॉगपत्राने विचारला आहे.एरिक अल्बर्ट यांचा एक वृत्तांत ल मॉन्दमध्ये प्रकाशित झाला आहे. ब्लेअर यांच्या अर्धवट माफीनाम्यामुळे युद्धात ज्यांची हानी झाली त्यांची भरपाई होणार नाही हे स्पष्ट केले आहे. झकारिया यांनी घेतलेल्या ब्लेअर यांच्या मुलाखतीचे वृत्त सीएनएन वरही वाचायला मिळते. त्यात ब्लेअर यांनी आपल्या दोन चुका मान्य केल्या आहेत असे दिसते. वेपन्स आॅफ मास डिस्ट्रक्शनचा बागुलबुवा उभा करताना आपल्याला मिळालेली माहिती चुकीची होती आणि त्या चुकीच्या माहितीवर विसंबून इराकमध्ये आपण कारवाई केली तसेच सद्दामला खतम केल्यानंतर काय घडू शकते याबद्दलचा आपला अंदाज चुकला हे सांगतानाच सद्दामला उडवण्यात आपली काहीही चूक झालेली नाही हे सांगण्याचा शहाजोगपणा ते करीत आहेत.
आता चिलकॉट समितीचा अहवाल जाहीर होण्याची वेळ जवळ येत असताना व ब्लेअर यांच्या कबुलीनाम्यानंतर बुश-ब्लेअर यांना युद्धखोर म्हणून दंडित करण्याच्या मागणीचा जोर वाढायला लागला आहे. गेली बारा-चौदा वर्षे ब्लेअर हे खोटारडे आहेत असा त्यांच्यावर आरोप केला जातो आहे. डिस्नेच्या बालकथांमध्ये पिनॅकिओ नावाचे एक पात्र आहे. ते खोटारडेपणा करते. पिनॅकिओ जितके खोटे बोलतो तितके त्याचे नाक लांबलांब होत जाते अशी त्याची कथा आहे. ब्लेअर यांना आजच्या काळातला पिनॅकिओ ठरवून त्यांची खोटारडेपणाबद्दल खिल्ली उडवणारे एक व्यंगचित्र सोशॅलिस्ट पार्टीच्या संकेतस्थळावर बघायला मिळते. आजची ब्लेअर यांची अवस्था त्यात समर्थपणाने दाखवलेली आहे.