फुटबॉलच्या धुंदीनंतर...
By Admin | Updated: July 16, 2014 08:56 IST2014-07-16T08:56:16+5:302014-07-16T08:56:16+5:30
भारताचा अजिबात सहभाग नसलेल्या विश्वचषक फुटबॉल क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. यात भारताचा अजिबात सहभाग नसला तरी, त्यात भारतीयांचा मात्र सहभाग होता, तो फुटबॉलप्रेमी समूह म्हणून.
फुटबॉलच्या धुंदीनंतर...
भारताचा अजिबात सहभाग नसलेल्या विश्वचषक फुटबॉल क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. यात भारताचा अजिबात सहभाग नसला तरी, त्यात भारतीयांचा मात्र सहभाग होता, तो फुटबॉलप्रेमी समूह म्हणून. भारतात फुटबॉल खेळला जातो, पण त्याला जागतिक दर्जा प्राप्त झालेला नाही. भारतात तसे प्रयत्न होत असल्याचेही दिसत नाही. आपण आशियाई क्रीडा स्पर्धा भरवल्यात, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भरवल्यात, आपल्या देशात आॅलिम्पिक व्हावे, असेही अनेकांना वाटते; पण या सर्व स्पर्धांमध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळांमध्ये भारताचे स्थान यथातथाच राहिले आहे. या देशात एकमेव खेळ मन लावून खेळला जातो, तो म्हणजे क्रिकेट. त्याचेही आता व्यापारीकरण झाल्यामुळे त्यात खेळ कमी आणि तमाशा अधिक, असा प्रकार झाला आहे. या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे जे भूत भारतीयांवर स्वार झाले होते, ते पाहता हा खेळ भारतात रुजायला हरकत नाही, पण त्यासाठी जे प्रयत्न व्हायला पाहिजेत, ते होताना दिसत नाहीत. भारतातही फुटबॉल सामने होत असतात, पण ते केव्हा आणि कुठे होतात आणि त्यात कोण खेळते, हे कधीच कुणाला कळत नाही. काही राष्ट्रीय पातळीवरच्या भारतीय फुटबॉल स्पर्धा तर अशा खेळल्या जातात, की जणू त्या जिल्हा पातळीवरच्याच स्पर्धा आहेत. विश्वचषक फुटबॉल सामने तिकडे ब्राझीलमध्ये चालू असतानाच, कोलकात्याजवळ १६ वर्षे वयाखालील खेळाडूंच्या आशियाई फुटबॉल स्पर्धा खेळल्या जात होत्या व त्यात भारतीय संघ चांगली कामगिरी करीत होता, एवढेच नाही तर या भारतीय संघाचा कप्तान एक मराठी मुलगा होता, हे कितीजणांना माहीत होते? प्रसार माध्यमांना तर याची खबरबातही नव्हती आणि एक दूरदर्शनची क्रीडा वाहिनी सोडली, तर भाराभर असलेल्या खासगी क्रीडा वाहिन्यांच्या खिजगणतीतही हे सामने नव्हते. आपण आपल्या देशात चाललेल्या क्रीडास्पर्धांबाबत एवढे उदासीन राहिलो, तर आंतरराष्ट्रीय स्पर्धांत आपण कसे पोहोचणार? भारतीयांचे क्रीडाप्रेम हे फक्त सेलेब्रिटी खेळापुरते राहिले आहे. त्यामुळेच एकेकाळी महिला फुटबॉल संघात खेळणाऱ्या मुलीला पानाची टपरी टाकून उदरनिर्वाह चालवावा लागतो. फुटबॉल हा खेळ खेळण्यासाठी जबर अशा शारीरिक क्षमतेची आवश्यकता असते. वेगवान धावणे आणि चपळता याला या खेळात पर्याय नाही. भारतीय खेळाडू या दोन्हीत कमी पडतात. त्यामुळे भारतीयांचा खेळ पाहताना ती धुंदी प्रेक्षकांना चढत नाही, जी अर्जेंटिना, ब्राझील, जर्मनी आदी देशांच्या संघांचा खेळ पाहताना चढते. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळाला एक अफाट वेग असतो, चपळाईने चेंडू प्रतिस्पर्ध्याच्या मैदानात नेणे आणि प्रतिस्पर्धी खेळाडूंना चपळाईने चकवित चेंडू त्याच्या गोलमध्ये ढकलणे, यासाठी कौशल्य आणि शक्तीचा अपूर्व असा मेळ घालावा लागतो. हे फक्त सतत सराव आणि सतत खेळत राहण्यानेच जमते. भारतीयांना हे सर्व आधी पोटापाण्याचा उद्योग किंवा नोकरी, शिक्षण सांभाळून करावे लागते. कारण, भारतात फक्त क्रिकेट या खेळात पैसा आहे आणि आता तर त्यात काळापैसाही आहे. बाकीच्या खेळात अगदी त्यात सायना नेहवाल, सानिया मिर्झा वगैरे नामवंत खेळाडू असूनही फारसा पैसा नाही. उलट पदरचे पैसे घालून या खेळात खेळाडूंना प्रावीण्य मिळवावे लागते आणि शिवाय त्यात शिरलेल्या राजकारणालाही तोंड द्यावे लागते. या वेळच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धांना त्या त्या देशातील राजकारणाचाही संदर्भ होता, हे फार थोड्या भारतीय फुटबॉलप्रेमींना माहीत आहे. पण, हा संदर्भ या खेळातल्या राजकीय हस्तक्षेपाचा नव्हता, तर या खेळाच्या माध्यमातून त्या त्या देशातील राजकीय नेते आपली प्रतिमा उजळविण्याच्या प्रयत्नांत होते. ब्राझीलच्या राज्यकर्त्यांना या स्पर्धा भरवून राजकीय मायलेज मिळवायचे होते, पण ते जर्मनीच्या विजयामुळे तेथील राज्यकर्त्यांना मिळाले आहे. अर्जेंटिनाचा संघ विजयाचा दावेदार होता. सर्वांनी तोच संघ विजेता ठरणार, असे गृहीत धरले होते, पण कोणत्याच खेळांचा निकाल असा गृहीत धरता येत नसतो. खेळांचे निकाल असे आधीच ठरले असते, तर खेळांमधले औत्सुक्य कधीच संपले असते. खेळाचा पूर्ण वेळ संपला, तरी विजयाचा दावेदार असलेल्या अर्जेंटिनाला एकही गोल करता आला नाही, यातच सर्व काही आले. अधिक वेळ देऊ नही जेव्हा ते जमले नाही, तेव्हाच खेळातील जर्मनीचे वर्चस्व स्पष्ट झाले व त्याने ते एकमेव गोल करून सिद्ध केले. अर्जेंटिनातील सत्ताधारीही या विजयासाठी उत्सुक होते, पण बुडत्याचा पाय खोलात, तशी त्यांची अवस्था या पराजयाने झाली. आता ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन्ही देशांतील राजकारण आणि क्रीडा संस्था यांच्यात पडझड सुरू झाली आहे.