अडवाणी अडगळीत...

By Admin | Updated: August 28, 2014 02:18 IST2014-08-28T02:18:15+5:302014-08-28T02:18:15+5:30

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि त्यांच्यावर निव्वळ असूयेपायी रुष्ट असणारे

Advani is in trouble ... | अडवाणी अडगळीत...

अडवाणी अडगळीत...

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि त्यांच्यावर निव्वळ असूयेपायी रुष्ट असणारे त्याच पक्षाचे दुसरे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी या दोघांनाही निवृत्तीचे आदेश देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे नेतेपदच खालसा केले आहे. आपण अजूनही पक्षावर ताबा ठेवू शकतो आणि पक्षाला दिशादर्शन करू शकतो, असा भ्रम अडवाणींनी त्यांच्या झालेल्या अपमानानंतरही बाळगला होता. १९९१ मध्ये त्यांनी काढलेल्या रथयात्रेपासून ते भाजपाचे अग्रगण्य नेते होते. वाजपेयींसाठी त्यांनी माघार घेतली तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती त्यागाचेही एक लहानसे वलय उभे झाले होते. वाजपेयींच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री असताना आणि उपपंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे वजन जबर वाढले होते. एका वृत्तपत्राने त्यांचे वर्णन करताना ते वाजपेयी सरकारात दुसऱ्या क्रमांकावर नसून दीड या क्रमांकावर आहेत, असे म्हटले होते. २००४ च्या निवडणुकीत ते पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार बनले. २००९ ची निवडणूकही पक्षाने त्यांच्याच नेतृत्वात लढविण्याचा निर्णय घेतला. पण सोनिया गांधींच्या प्रभावापुढे त्यांचे काही चालले नाही. आपल्या दोन्ही निवडणुका त्यांनी गमावल्या. अडवाणींची चिकाटी आणि चिवटपणा असा, की त्यानंतरही २०१४ ची निवडणूक पक्ष आपल्याच नेतृत्वात लढवील अशी खात्री त्यांनी बाळगली. त्यांना आव्हान देऊ शकेल असा नेता २०१२ पर्यंत पक्षात त्यांनी उभाही होऊ दिला नव्हता. पण मग संघच त्यांच्याविरुद्ध उभा झाला. संघाने त्यांना पक्षाध्यक्षपदावरून पायउतार व्हायला सांगितले. नंतर विरोधी पक्षनेतेपद सोडायला लावले. त्या दोन्ही पदांवर त्यांचेच कधीकाळी शिष्य राहिलेल्या राजनाथसिंह व सुषमा स्वराज यांची नियुक्तीही संघाने करून टाकली. तेवढ्यावरही पंतप्रधानपदाची उमेदवारी शिल्लक राहिली व अडवाणी तिच्यावर नजर खिळवून राहिले. संघाने याही बाबतीत त्यांची निराशा केली व तिसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्रिपद मिळविणाऱ्या नरेंद्र मोदींना त्या पदाचा पट्टाभिषेक केला. अडवाणी त्यामुळे बिथरले होते. पक्षाच्या बैठकींना हजर राहणेही त्यांनी काही काळ थांबविले होते. एकेकाळी एवढ्या मोठ्या पदांवर राहिलेल्या नेत्याला ही घसरण सहन होणे शक्यही नव्हते. मात्र, त्यांची संघनिष्ठा व पक्षातील इतरांचे दडपण यामुळे ते होते तेथेच राहिले. त्यांचे दुर्दैव हे, की पक्षाने त्यांना हवे असलेले लोकसभेचे भोपाळ हे क्षेत्रही मिळू दिले नाही. आपल्या हाती काही उरले नाही आणि आपण सर्वस्वी दुसऱ्यांच्या मर्जीवर राहत असल्याची जाणीव झालेले अडवाणी मग मधूनच मोदींची तारीफ कर, तर कधी एखादे पुस्तक लिहून आपल्या कामकाजाचे समर्थन कर, अशा दयनीय गोष्टी करू लागले. मोदींना बहुमत मिळून ते पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर त्यांना व पक्षाला असलेली अडवाणींची ‘नैतिक’ म्हणतात ती गरजही संपली. मुरली मनोहर पूर्वीही असून नसल्यासारखे होते. टाकता येत नाही आणि सोबतही नेता येत नाही, अशी काही माणसे संघटनेत असतात. जोशी त्यातले होते. मोदींनी सरकारएवढेच पक्षावरही त्यांचे नियंत्रण बसविले आहे. त्याचसाठी त्यांनी ‘अनेक अपराधांत अडकलेले’ अमित शाह यांना पक्षाध्यक्षपदी आणले आहे. आता त्यांच्याकरवी त्यांनी अडवाणी व जोशी यांची अडगळ पक्षाच्या बाहेर काढली आहे. अडवाणींची अखेर अशी दु:खद आहे. जनसंघ व भाजपच्या स्थापनेपासून त्यांनी वाजपेयींसोबत राहून व प्रसंगी त्यांच्या पुढे जाऊन पक्ष वाढविला आहे. भाजपाला सत्तेचे दिवस दाखविण्याचे पहिले श्रेयही त्यांचे आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात विसंगती आहेत, त्यांच्या आत्मचरित्रात खोटेपण आहे; मात्र त्यांच्या नेतृत्वक्षमतेत कोणतीही कमतरता नाही. मतदारांनी एखाद्याला उचलून धरणे आणि एखाद्याकडे दुर्लक्ष करणे हा काळाचाही महिमा असतो. त्यामुळे अडवाणींची एक फसगत काळाने तर दुसरी पक्षाने केली, असेच म्हणणे आता भाग आहे. अडवाणी हे महत्त्वाकांक्षी नेते आहेत आणि तशा नेत्यांना अडगळीतले जिणे मानवणारे नाही. राजकारणात ज्याची उपयुक्तता संपली किंवा आपली उपयुक्तता संपल्याचे ज्याने लक्षात घेतले नाही, त्याच्या वाट्याला याहून दुसरे काही यायचेही नसते. मुरली मनोहरांना काही काळासाठी कुठल्याशा समितीचे अध्यक्षपद देऊन त्यांना राजकारणाच्या दळणवळणात पक्षाने ठेवले असले, तरी अडवाणींना मात्र ‘मार्गदर्शक’ बनवून पार दूर लोटले आहे. नेतृत्व करणाऱ्यावर मार्गदर्शक होण्याची पाळी येणे, हा दुर्दैवाचाच प्रवास आहे. यापुढचे अडवाणींचे जिणे त्यांना दुष्कर होऊ नये, ते सुसह्य व्हावे आणि त्यांच्याकडून होत असलेले देशकल्याणाचे चिंतनही निरंतर चालू राहावे ही शुभेच्छा. तीच सदिच्छा मुरली मनोहरांनाही.

Web Title: Advani is in trouble ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.