वास्तव सिनेमात की सिनेमा वास्तवात
By Admin | Updated: April 24, 2015 23:53 IST2015-04-24T23:53:06+5:302015-04-24T23:53:06+5:30
सिनेमाचे आणि खासकरून हिन्दीतील मारधाड छाप सिनेमाचे कठोर टीकाकार नेहमी म्हणत असतात की, काय रे, तुमचे आजकालचे सिनेमे, सगळी

वास्तव सिनेमात की सिनेमा वास्तवात
सिनेमाचे आणि खासकरून हिन्दीतील मारधाड छाप सिनेमाचे कठोर टीकाकार नेहमी म्हणत असतात की, काय रे, तुमचे आजकालचे सिनेमे, सगळी पिढी बरबाद करून राहिलेत. त्यावर सिनेमावाल्यांचे उत्तर नेमके त्याच्या उलट. ते म्हणतात, जे वास्तवात घडत असतं, तेच तर आम्ही सिनेमात दाखवतो. काही वर्षांपूर्वी मुंबईतील एका जवाहिऱ्याच्या पेढीवर अत्यंत धाडसी आणि चतुर दरोडा पडला. त्याचा आजतागायत छडा लागलेला नाही. त्या दरोड्याचीच कथा एका सिनेमाच्या माध्यमातून मांडली गेली आणि सिनेमा भयानक लोकप्रिय झाला. त्यामुळे या दोन्ही युक्तिवादांमध्ये तसं अर्धसत्य का होईना नक्कीच लपलेलं असतं. सिनेमातील किंवा अमुक मालिकेतील प्रसंग पाहून आम्ही चोरी किंवा अपहरणाचा डाव रचला, अशी कबुली देणारे बालगुन्हेगार अलीकडे बऱ्याचदा आढळून येतात. पण सिनेमा वा मालिकेचा प्रभाव केवळ अशा बालगुन्हेगारांवर वा थोराड गुन्हेगारांवरच पडत असतो, असेही नाही. मध्यंतरी जयपूरच्या एका न्यायाधीशानीदेखील आपण सिनेमाच्या कसे प्रभावाखाली आलो आहोत, हे दाखवून दिले होते. त्यांच्या कोर्टात एका साक्षीदाराने चुकीची वा खोटी साक्ष दिली. इंग्रजीत याला परज्युरी म्हणतात. विदेशात हा मोठा गुन्हा मानला जातो. पण भारतात मात्र त्याला अद्याप तितके गंभीरपणे घेतले जात नाही. त्यामुळे जयपूरच्या न्यायाधीशानी काय करावं? त्यांनी खोटी साक्ष देणाऱ्या व्यक्तीला भर न्यायालयातच ‘मुर्गा बन’ अशी शिक्षा सुनावली. फास्ट ट्रॅक न्याय यालाच म्हणत असावेत ! मात्र ही शिक्षा न्यायाधीश महाराजांना शंभर टक्के सुचली ती एका हिन्दी सिनेमातून. तो सिनेमा ‘जॉली एलएलबी’. म्हटलं तर या सिनेमाची कथा तशी काल्पनिक. राजधानी दिल्लीत घडलेल्या एका गुन्हेगारी अपघाताचे बीज घेऊन कथेचा काल्पनिक फुलोरा फुलवलेला. पण कल्पितापेक्षा वास्तव कधीकधी नव्हे तर अनेकदा कसे अधिक भयानक वा गंभीर असते, याची जाणीव आता याच सिनेमातील कथा आणि वास्तवातील सलमान खान या नटाने मुंबईत केलेला अपघात या दोहोंच्या माध्यमातून होऊ लागली आहे. सिनेमातील एका धनिकबाळाने रात्रीच्या वेळी भरधाव गाडी पळवताना पदपथावर झोपलेल्या काही लोकाना गाडीखाली चिरडलेले असते. तोच प्रकार सलमान खानच्या गाडीने केला. त्याला आता वर्षे झाली तेरा ! पण खटल्याचा निकाल अजून यायचाच आहे व तो येत्या सहा तारखेस येईल असे जाहीर झाले आहे. सिनेमात जे ‘तारीख पे तारीख’ दाखवतात ते आणि तसेच या खटल्याचेही सुरू आहे. सलमानच्या गाडीखाली एक इसम दगावला म्हणून सलमानच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचे कलम लावायचे की नाही याचा गुंता खालच्या न्यायालयापासून तो थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. अखेर त्या वरिष्ठ न्यायालयाने खालच्या न्यायालयानेच ठरवावे असा हुकुम दिला आणि तेव्हा कुठे सदोष मनुष्यवधाचे कलम लावले गेले. दुसरा आरोप सलमान नशापान करून गाडी चालवीत होता आणि नशेत त्याने गाडी फूटपाथवर चढविली. त्यावेळी सलमानच्या ‘संरक्षणासाठी’ एक पोलीस त्याच्या गाडीत होता. दरम्यान या पोलिसाचे निधन झाले. त्यानंतर सुरू झाले वकिली डावपेच. सलमान दारू पिला होता की नव्हता आणि दारू पिऊन स्वत: गाडी चालवीत होता की नव्हता व त्याचबरोबर फूटपाथवरचा जो गरीब दगावला तो सलमान चालवीत असलेली गाडी त्याच्या अंगावर गेल्याने की अपघातानंतर क्रेनच्या सहाय्याने ती गाडी उचलताना क्रेनच्या जबड्यातून सुटलेली ती गाडी त्याच्या अंगावर पडल्याने या तीन मुद्द्यांभोवती सारे डावपेच फिरत राहिले. सलमानच्या वकिलाने केलेले युक्तिवाद आणि ‘जॉली’मध्ये बमन इराणीने केलेले युक्तिवाद यात कमालीच्या बाहेर साम्य आढळून येते. सलमान दारू प्यायलेलाच नव्हता. त्याच्या शरीरातून तपासणीसाठी जास्तीचे रक्त म्हणे काढून घेतले आणि नंतर प्रयोगशाळेमध्ये या रक्तात भरपूर मद्यार्क मिसळला गेला. याचा अर्थ तो दारुबिरू काही प्यायला नव्हता! तो ती अपघातग्रस्त गाडीदेखील स्वत: चालवीत नव्हता. कारण त्याच्या चालकाने भरपूर विचाराअंती तशी कबुली दिली आणि एका प्रत्यक्ष साक्षीदाराने म्हणे त्याला चालकाच्या बाजूच्या नव्हे तर विरुद्ध बाजूच्या दरवाजातून बाहेर पडताना बघितले होते. पण हा विरुद्ध बाजूचा दरवाजा अपघातामुळे घट्ट लागलेला होता, तेव्हा तो उघडेलच कसा, हेही सिद्ध झाले. जॉलीमधला फिर्यादी पक्षाचा वकील (अर्सद वारसी) म्हणतो, काही दिवस हा खटला असाच चालू राहिला तर ‘राजपाल साब (बमन) यह भी साबीत कर देंगे कि हादसा कार से नही, हवाई जहाज से हुआ था’ सलमानच्या खटल्याच्या बाबतीत नेमके असेच सुरू आहे. या खटल्याचे गांभीर्य संपून आता त्याला टिंगल टवाळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सामाजिक माध्यमांमधून टवाळीचे अनेक संदेश फिरत आहेत. सिनेमातील न्यायाधीश (सौरव शुक्ला) अखेरीस म्हणतो, मला पहिल्याच दिवशी गुन्हेगार कोण हे माहीत होते. पण पुराव्याशिवाय मी काहीही करू शकत नाही. ते पुरावे न्यायालयासमोर येऊच नयेत म्हणून सिनेमातील पोलीस अधिकारीच धडपडत असतो. सिनेमातील ते वास्तव सलमानच्या वास्तवातही दिसून येते वा नाही हे आता लवकरच जगासमोर येऊ शकेल.