क्रिया आणि प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2016 06:07 IST2016-07-19T06:07:13+5:302016-07-19T06:07:13+5:30
क्रिया तशी प्रतिक्रिया. आपली जशी क्रिया तशी समोरच्या व्यक्तीची प्रतिक्रिया.

क्रिया आणि प्रतिक्रिया
क्रिया तशी प्रतिक्रिया. आपली जशी क्रिया तशी समोरच्या व्यक्तीची प्रतिक्रिया. किंवा समोरच्याची जशी क्रिया तशी आपली प्रतिक्रिया. क्रिया-प्रतिक्रिया हा सृष्टीचा-निसर्गाचा अपरिहार्य असा नियमच आहे. आपण लोकांशी जसे वागतो, अगदी तसेच हुबेहूब आरशातल्या प्रतिबिंंबाप्रमाणे लोकसुद्धा आपल्याशी वागतात. तुम्ही लोकांचा अपमान केल्यास लोकही तुमचा अपमान करतील आणि तुम्ही सन्मान केला तर ते सुद्धा सन्मान करतील. तुम्ही लोकांना शिव्या घातल्या तर लोकसुद्धा तुम्हाला शिव्याच घालतील आणि लोकांची स्तुती केल्यास लोकही तुमची स्तुती केल्यावाचून राहणार नाहीत.
जसा ध्वनी तसा प्रतिध्वनी उमटतो. किंवा इकडे ‘कड कट्ट कड’ झाले की पलीकडेसुद्धा ‘कड कट्ट कड’ झालेच पाहिजे., असा ध्वनिशास्त्राचा, मानसशास्त्राचा अपरिहार्य नियम, सिद्धान्त किंवा परिणाम आहे! तुमच्या मनात जशा सद्भावना किंवा दुर्भावना ज्या ज्या व्यक्तीबद्दल असतील, अगदी तशाच सद्भावना किंवा दुर्भावना तुुमच्याबद्दल त्या त्या व्यक्तीच्याही मनात अपरिहार्यपणे निर्माण झाल्यावाचून राहाणार नाहीत! जो इतरांची टिंगल-टवाळी करतो किंवा कुचेष्टेने हसतो विशेषत: आंधळ्यापांगळ्यांची किंवा मुक्याबहिऱ्यांची, दिनदुबळ्या गरिबांची टिंगल-टवाळी करतो, त्यांच्या दुबळेपणावर, दोषावर किंवा त्यांच्या व्यगांवर विकट हास्य करतो अशा माणुसकीहीन व्यक्तीवरही हीच वेळ सर्वसाक्षी परमेश्वर लवकरच आणतो हे पक्के ध्यानात ठेवावे. म्हणून स्वत:ला अप्रिय किंवा हानीकारक वाटेल असे विचार, आचार आपणही दुसऱ्याबाबत कदापिही ठेवू नयेत व तसे मनातसुद्धा आणू नयेत.
दुसऱ्याने जरी आपल्याबाबत वाईट, अप्रिय किंवा हानीकारक विचार केला तरीसुद्धा आपण त्याच्याबाबत चांगलाच विचार करावा, कारण हेच खरे सुखी होण्याचे व आयुष्याचा, जीवनाचा चांगला उपयोग करण्याचे एकमेव रहस्य आहे. म्हणूनच नेहमी चांगला विचार करावा, चांगलाच आचार ठेवावा. चांगलेच बोला अन् चांगले होण्यासाठी प्रयत्नशील राहावे.
-प्रा.डॉ. सुभाष पवार