संचित : ‘ठिणगी’ जिवंत राहावी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 03:55 IST2020-09-15T03:54:17+5:302020-09-15T03:55:23+5:30
अनेकांच्या हृदयात ठिणगी पेटते ती याच काळात. तीच मग तुमचं भविष्य ठरवते. आयुष्यात कुणीच कायमचं सुखी किंवा कायमचं दु:खी राहू शकत नाही; पण जास्तीत जास्त काळ तुम्हाला सुखी राहायचं असेल तर ते ठरतं तुमच्यातल्या याच ठिणगीतून, स्पार्कमधून..

संचित : ‘ठिणगी’ जिवंत राहावी...
- चेतन भगत
आयुष्यातले काही दिवस असे असतात, जेव्हा तुम्ही खरोखरच खूप खुश असता, आनंदी असता. एका अनोख्या अशा मस्तीत आपण जगत असतो. त्याचवेळी भविष्यातली स्वप्नंही आपल्या मनात रेंगाळत असतात. हे दिवस असतात, कॉलेजचे दिवस. आयुष्यातील सर्वाधिक महत्त्वाचा असा हा काळ. तुम्ही कोण आहात, भविष्यात तुम्ही कोणत्या ठिकाणी असाल, कोणती उंची तुम्ही गाठाल, हे सर्व ठरतं ते याच दिवसांत.
अनेकांच्या हृदयात ठिणगी पेटते ती याच काळात. तीच मग तुमचं भविष्य ठरवते. आयुष्यात कुणीच कायमचं सुखी किंवा कायमचं दु:खी राहू शकत नाही; पण जास्तीत जास्त काळ तुम्हाला सुखी राहायचं असेल तर ते ठरतं तुमच्यातल्या याच ठिणगीतून, स्पार्कमधून..
कुठून होते या ठिणगीची सुरुवात? खरं तर आपल्या जन्मापासूनच ती आपल्यासोबत असते आणि पुढेही आयुष्यभर राहते. या ठिणगीचा तुम्ही कसा वापर करता, यावर भविष्यात तुम्ही कुठे उभं असाल हे ठरतं. जेव्हा मी तरुणांकडे पाहतो, तेव्हा त्यांच्यात मला ऊर्जा ठसठसून भरलेली दिसते. याच्या अगदी उलट म्हणजे वय झालेली लोकं. त्यांच्यात ना कुठली ऊर्जा दिसते, ना इच्छाशक्ती. याचाच अर्थ जसजसं आपलं वय वाढत जातं, तसतसं आपल्यातलं चैतन्य हरवायला लागतं. त्यासाठीच हे चैतन्य टिकवून ठेवणं महत्त्वाचं. आपल्यातली ही ऊर्जा वाचवायची आणि वाढवायची कशी? - ही ऊर्जा म्हणजे जणू दिव्याची ज्योत. ती कायम पेटती राहायला हवी असेल तर तिचं संगोपन करावं लागतं, काळजी घ्यावी लागते, वारा, वावटळापासून तिला वाचवावं लागतं. सतत इंधन पुरवत राहावं लागतं. ही ऊर्जा आणि इंधन आपल्याला मिळतं ते ध्येयामुळे. ते उत्तुंग असलं, तर म्हातारं होण्याचं तुम्हाला भय नाही. अनेकजण कालांतरानं आपली ऊर्जा फक्त पैशासाठी वापरायला लागतात; पण पैसा हेच आयुष्यात सर्वस्व नाही. तसं असतं, तर जगातल्या मोठमोठ्या, श्रीमंत लोकांना क्रियाशील राहण्याची गरजच पडली नसती.