संचित
By Admin | Updated: March 8, 2015 23:48 IST2015-03-08T23:48:36+5:302015-03-08T23:48:36+5:30
संचित’, ‘प्रारब्ध’ व ‘क्रियमान’ ही माणसानं केलेल्या कर्मांची तीन तोंडं आहेत. त्यामुळे आयुष्यभर आपल्या वाट्याला येणा-या सुख-दु:खाला आपणच जबाबदार असतो

संचित
डॉ. कुमुद गोसावी
‘संचित’, ‘प्रारब्ध’ व ‘क्रियमान’ ही माणसानं केलेल्या कर्मांची तीन तोंडं आहेत. त्यामुळे आयुष्यभर आपल्या वाट्याला येणा-या सुख-दु:खाला आपणच जबाबदार असतो. देव किंवा दैव जबाबदार नसतं, हे ध्यानी घेतलं तरच आपलं ‘संचित’ उत्तम राहील, असं कर्म हातून घडतं! ‘कर्माचं फळ कर्मातच असतं!’ हा निसर्ग नियम आहे.
श्री दत्तावतारी श्रीपाद श्रीवल्लभांकडं आलेल्या एका याचकाला त्याच्या व्यथेचं कारण सांगून त्याच्या पूर्वसंचिताचा निर्देश करताना त्यांनी म्हटलं, ‘‘अरे विप्रा! पूर्वजन्मी तू अनेकांना आपल्या अत्यंत कठोर वाणीनं दुखावलंस? त्या कर्मसंचिताचं फलित म्हणजे तुझी ही अतिशय वेदना देणारी या जन्मीची पोटदुखीची व्याधी! यातून मुक्त होण्याचा एकच मार्ग म्हणजे नामस्मरण होय! भगवंताच्या नामस्मरणानं वायूमंडळ शुद्ध होतं. चारही वाणींना परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी यांना नामजपानं शुद्ध राखता येतं.
जीवनात सुख-दु:खाचे प्रसंग सर्वांवर येतात. अशा प्रसंगी देवदेवस्की, अंगारे, धुपारे यासाठी बुवाबाजीकडे धावण्याऐवजी नामस्मरण करीत स्थिरचित्तानं त्या प्रसंगांना धैर्यानं तोंड देणं आवश्यक. जीवन प्रवास सुखकर होण्यासाठी
अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता ।
चरणी जगन्नाथा चित्त ठेले ।।
मग असं शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांसारखं सांगता येतं. संचित-प्रारब्धानुसार आयुष्यात वाट्याला आलेले भोग भोगण्यासाठीही माणसाला मनोबल, आत्मबल आवश्यक असतं.
अलीकडे संशोधनानं असं सिद्ध झालं आहे की, ज्यांना रविवारी हार्टअटॅक आला असेल, त्यांची जगण्याची शक्यता फार कमी असते. रविवार ‘सूर्य’ आणि ‘हार्टअटॅक’चा काय संबंध आहे. याविषयी संशोधन चालू आहे. मात्र या संदर्भात ‘सूर्योपासना’ उपयुक्त असल्याचं स्पष्ट होतं.
पाश्चात्त्य संशोधकांनी या विषयावर सखोल संशोधन केलं आहे. डॉक्टर एम. मोनिया त्यांच्या ‘एन्शन्ट हिस्टरी अॅण्ड मेडिसीन’मध्ये लिहितात की, रोगांना पळवून लावण्याचा साधा व सरळ उपाय आहे यज्ञ! यज्ञानं अनेक प्रकारचे रोगकारक जीवजंतू (किटाणू) आणि बॅक्टेरिया यांचा नाश होतो! फ्रान्सचे एक वैज्ञानिक डॉ. फाक्रिनने यज्ञात तूप आणि साखरेची आहुती देऊन रोगजंतूंचा नाश होतो, हे सिद्ध करून दाखवले आहे. तेव्हा प्रश्न आपल्या ज्ञान-विज्ञानविषयक भूमिकेचा आहे.
केवळ संचितांकडे बोट दाखवून ‘माझं नशीबच फुटकं’ असं म्हणण्यात काय अर्थ आहे? असा प्रश्न स्वामी सवितानंद यांनी आपल्या ‘स्तोत्र-मंत्रांचे विज्ञान’ या पुस्तकातून केला आहे, तोही अतिशय बोलका आहे.