अतुल कुलकर्णी
भोंदूबावा, तुझ्यासारख्या भोंदूंना पोलिस अटक करतात. तुमचे कारनामे समोर आल्याने आमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. तुला भोंदू बाबा म्हणायचे की बनवेगिरी करणारा म्हणायचे? आकडेमोड करून इतकी वर्षे तू लोकांचे भविष्य सांगत होतास. कधी स्वतःचे भविष्य मांडून बघितले होतेस का? आपल्या आयुष्यात असेही दिवस येणार आहेत, देशभर आपली बदनामी होणार आहे, जिथे फुलं वेचली तिथे गोवऱ्या वेचण्याची वेळ येणार आहे... हे तुझ्या आकडेवारीने कधी सांगितले नाही का? भविष्य सांगणाऱ्याने त्याचा व्यापार मांडला की, ती विद्या त्याला साथ देत नाही, असे गावाकडचे जुने-जाणते लोक सांगतात. पैसे घेऊन ज्योतिष विद्या सांगितली की, ती त्याच्यावरच उलटते, असेही गावाकडे म्हणतात. मधून तुझ्यासारख्यांनी तर कथित विद्येचा बाजारच मांडला. लोक तुम्हाला हेलिकॉप्टर देतात. म्हणाल ते आणून देतात. मात्र, खेड्यापाड्यात अडलेल्या बाईला साधी अॅम्बुलन्स मिळत नाही.
भोंदूनो, तुमच्याकडे येणाऱ्या नेत्यांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना, चेल्या-चपाट्यांना गाडगेबाबा कोण हे माहिती नसावे. महाराष्ट्रात संत गाडगेबाबांसारखा एक माणूस होऊन गेला, हेदेखील तुमच्या पायावर स्वतःचे गहाण टाकलेले डोके ठेवणाऱ्या नेत्यांना माहिती नसेल. माहिती असते तर ते तुमच्याकडे आलेच नसते. ज्यांनी कोणी तुमच्या पायावर डोके ठेवले असेल, त्यांच्या माहितीसाठी गाडगेबाबांचे म्हणणे मुद्दाम देत आहे. ते असे-
"देवळात देव नाही... देऊळ बांधलं मानसानं... त्याच्यात देव बसोला मानसानं... तुकोबा म्हंतात, तीर्थी धोंडा पानी, देव रोकडा सज्जनी... तीर्थात देव नाही... तीर्थात पंडे लुटतात... तांब्याभर पान्याचे पंधरा रुपये... बाप मेला की तो म्हनते चाटी करा... नाशिकले जाऊन विधी करा... त्याले दक्षना द्या... वापहो, पुनर्जन्मावर माहा विश्वास नाही... एकखेप मानूस मेला म्हंजे तो काही केल्या वापस येत नाही... पुढचा जन्म कोनं पाह्यला ? तुकोबा म्हंतात, जन्म नाही रे हा आणिक, तुका म्हने माझी भाक । जित्याजागत्या म्हताऱ्या मानसाले सोडून देता अन् मेल्यावर पितराले जेऊ घालता? हा कोनता न्याय ?"
ज्यांनी कोणी तुमच्याकडे येऊन अघोरी विद्येच्या नावाखाली वाटेल त्या पूजा केल्या असतील, आणखी काय केले असेल, त्यांना पुढचा जन्म कशाचा मिळणार कोणास ठाऊक... कुणीतरी सांगून ठेवलंय, अधून मधून कीती पुजला देव तरी, देव अजुन पावला नाही... कुठं राहतो कुणास ठाऊक, अजुनपर्यंत घावला नाही... मंदिरासमोर लुटली इज्जत, हा बघत बसला पोरीला, रक्षण करतो म्हणाला, अन् स्वतःच गेला चोरीला, हातात असुन धारदार शस्त्र, कधी चोरामागे धावला नाही.. कुठं राहतो कुणांस ठाऊक, अजुनपर्यंत घावला नाही...
तुझ्यासारख्यांना तुरुंगात वेळ मिळेल, तेव्हा स्वतःची कुंडली मांडून बघ. आडवी, तिडवी, बेरीज वजाबाकी करून बघ. तुझ्यासारख्यांना गाडगेबाबा त्यांच्या पद्धतीने उत्तर देतील... गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला सांभाळ ही तुझी लेकरें पुण्य समजती पापाला... ही धोंड्याला म्हणती देवता भगत धुंडती तया जोगता स्वतःच देती त्यास योग्यता देव म्हणूनी कुणी न भजावे फुका शेंदरी दगडाला गोपाला गोपाला गोपाला गोपाला... कुणी न रहावे खुळे अडाणी शिक्षण घ्यावे व्हावे ज्ञानी ह्यासाठी ही झिजते वाणी मी जातीचा धोबी देवा धुवीन कपडा मळलेला गोपाला गोपाला गोपाला गोपाला.... हेच मागणे तुला श्रीहरी घाम गाळी त्या मिळो भाकरी कुठेच कोणी नको भिकारी कुणी कुणाचा नको रिणकरी कुणी न विटो नर जन्माला गोपाला गोपाला गोपाला गोपाला... बिलकुल तुझा नसलेला, बाबूराव.
Web Summary : The article criticizes fake gurus, questioning their inability to predict their own misfortunes. It contrasts their lavish lifestyles with the struggles of ordinary people and references Saint Gadge Maharaj's teachings against blind faith and idol worship. It advocates for education, hard work, and social justice.
Web Summary : लेख ढोंगी गुरुओं की आलोचना करता है, उनकी अपनी दुर्भाग्यों का अनुमान लगाने में असमर्थता पर सवाल उठाता है। यह उनके भव्य जीवनशैली की तुलना आम लोगों के संघर्षों से करता है और संत गाडगे महाराज की अंधविश्वास और मूर्ति पूजा के खिलाफ शिक्षाओं का उल्लेख करता है। यह शिक्षा, कड़ी मेहनत और सामाजिक न्याय की वकालत करता है।