हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत,नवी दिल्ली
मंत्रिमंडळ सचिव डॉ. टी. व्ही. सोमनाथन यांनी काढलेल्या एका परिपत्रकामुळे दिल्लीतील नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ आली आहे. ‘तुमच्या खात्याशी संबंधित असलेल्या सर्वांच्या संपर्कात राहा, त्यात कंत्राटदार, कामगार नेते इतकेच नव्हे ज्यांची चौकशी चालू आहे अशा लोकांशीही बोला’ असे या परिपत्रकाद्वारे सर्व सचिवांना सांगण्यात आले आहे. थोडक्यात, ‘दरवाजे उघडा, पण डोळे बंद ठेवा’ असा हा प्रकार म्हणता येईल.
प्रथमदर्शनी जे दिसते त्याच्यावरून ‘कशाचेही मूल्यमापन करू नका’ हा बहुधा नवा मंत्र असावा. बाबू मंडळींनी सर्व प्रकारच्या लोकांना भेटावे; त्यातून सरकारच्या धोरणांविषयी काय गैरसमज आहेत ते कळतील, नव्या कल्पना समोर येतील असे या पत्रामागे गृहीत धरले आहे. मात्र, या प्रक्रियेत एक खोच आहे. यासाठीच्या गाठीभेटी पंचतारांकित हॉटेलात किंवा गोल्फ क्लबच्या व्हरांड्यामध्ये नव्हे, तर सरकारी कार्यालयातच होतील. शिवाय यावेळी जे बोलले जाईल त्याला कोणीतरी सहकारी साक्ष ठेवावे लागतील. स्वाभाविकपणे बाबू लोक गोंधळात पडले आहेत. आता पुढे काय? ‘हवाला रॅकेटमध्ये जे संशयित आहेत त्यांच्याबरोबर किंवा फिक्सिंग करून देणाऱ्या राण्यांबरोबर चहापान करायचे की काय?’- असा प्रश्न एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने केला. असे केल्यास प्रशासनाचे पोट बिघडेल अशी भीतीही व्यक्त करण्यात आली, आणि ती बरोबरच आहे. एखादा फोटो, एखादी माहिती फुटणे, वांध्यातली व्यक्ती भेटणे यातून करिअर धोक्यात येऊ शकते.
अर्थात, वरिष्ठांच्या संमतीशिवाय हे पत्र लिहिले गेले नसावे. एखादा बडा अधिकारी सकाळी उठतो आणि आपल्या सहकाऱ्यांना वादंगात सापडलेल्या व्यक्तींशी बोलायला सांगतो, असे तर घडणार नाही; म्हणून आजवर पोलादी चौकटीत राहणाऱ्या बाबू लोकांना एका विचित्र पेच प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. ‘लोकांची सेवा करा, पण सेवा करून घेऊ नका’ असे बजावण्यात आले आहे.
रील ते डील
भारतात सत्तेच्या दलालांना मरण नसते. ते स्वतःला नवनव्या रूपात बसवून घेतात. २५ वर्षांपूर्वीच्या नीरा राडिया आठवतात? आता इन्स्टाग्रामच्या जमान्यात संदीपा विर्क या चंडिगडस्थित इन्फ्ल्यूएन्सरवर ईडीची नजर पडली आहे. या महिलेला लक्षावधी फॉलोअर्स आहेत. सेल्फी आणि फॅशन रील्सच्या आडून या संदीपा बड्या बड्या व्यक्तींना गाठून कामे करवून देतात, असे म्हणतात. अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स समूहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संदीपा यांचा सतत संपर्क होता. दिल्लीच्या सत्तावर्तुळात कामे करवून देण्याचे आश्वासन त्या देत असत. हिबू केयर या नावाचा त्यांचा ब्रॅण्डही असून, जागतिक स्तरावरील ‘ब्यूटी स्टार्टअप’ म्हणून त्याचे वर्णन केले जाते.
या महिलेने ईडी अधिकारी असल्याचे भासवून एका चित्रपट प्रकल्पाच्या बहाण्याने ६ कोटी रुपयांना गंडा घातल्याचे पंजाब पोलिसांनी नोंदवलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ती आपले उत्पन्न अल्प असल्याचे दाखवते. परंतु, कोट्यवधीची माया तिने जमवली आहे. चौकशीच्या वेळी मोठमोठ्या ईडी अधिकाऱ्यांची नावे घेऊन आपण त्यांच्यासाठी काम करत असल्याचे तिने सांगितले. ते खरे की खोटे हे अजून कळायचे आहे; पण सत्तावर्तुळात त्यामुळे खळबळ उडाली. अनिल अंबानी आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांची सध्या चौकशी चालू आहे. त्यातून ही अटक केली गेली. हजारो कोटी रुपयांची कर्जे दुसरीकडे वापरल्याच्या प्रकरणात ही चौकशी आहे. संदीपा यांच्या अटकेमुळे त्या केवळ इन्स्टाग्राम सेलिब्रेटी नाहीत हे उघड झाले. उद्योगजगत आणि राजकीय पुढाऱ्यांची साठगाठ घडवून आणणाऱ्या एजंट्सची जमात लँडलाइनकडून आयफोनकडे वळली असून, आता इन्स्टा लाइव्हसाठी भोजनावळी होतात इतकाच याचा अर्थ आहे.बिहार काँग्रेस : घोड्याच्या आधी गाडी
बिहारमध्ये जवळपास सात वर्षांपासून काँग्रेस पक्षाची प्रदेश समितीच अस्तित्वात नाही. राज्य पातळीवर निवडणूक समिती नाही आणि जागांबाबत स्पष्टता नाही. असे असूनही उमेदवार ठरवण्यासाठी दोन छाननी समित्यांच्या बैठका झाल्या. पॅनलचे प्रमुख असलेल्या अजय माकन १३ ऑगस्टला पाटण्यात आले. इच्छुक उमेदवारांना भेटले आणि परत गेले. गेल्या आठवड्यात आणखी दोन बैठका झाल्या. अशोक चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शेवटची राज्य समिती नेमण्यात आली होती; पण ते नंतर संयुक्त जनता दलात गेले. त्यांचे उत्तराधिकारी मदन मोहन झा, अखिलेश प्रसाद सिंह आणि आता आकाश राम यांना नवी प्रदेश निवडणूक समिती तयार करता आलेली नाही. त्यामुळे अधिकृत अशी काही व्यवस्था नसताना पक्ष इच्छुक उमेदवारांची छाननी करत आहे. सामन्याच्या तारखा किंवा ठिकाण काहीच माहीत नसताना क्रिकेटचा संघ निवडला जावा तसा हा प्रकार आहे. पुन्हा एकदा चतुराईने घोड्याच्या आधी गाडी लावली आहे, असे निरीक्षक मंडळी गालातल्या गालात हसत म्हणतात इतकेच! harish.gupta@lokmat.com