तानसेन संगीत महोत्सवाची १०० वर्षे: अभिजात परंपरेचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2024 09:35 IST2024-12-18T09:34:34+5:302024-12-18T09:35:01+5:30
भारतातील सर्वांत जुन्या, अतिशय नामांकित तानसेन संगीत महोत्सवाचा जलसा सध्या ग्वाल्हेरमध्ये सुरू आहे. मियाँ तानसेन यांच्या आठवणीत भिजलेल्या स्वर-उत्सवाविषयी…

तानसेन संगीत महोत्सवाची १०० वर्षे: अभिजात परंपरेचा सन्मान
अभिलाष खांडेकर, रोव्हिंग एडिटर, ‘लोकमत’
मावळते २०२४ हे वर्ष भारतात अनेक कारणांनी लक्षात राहील. अभिजात संगीताची समृद्ध परंपरा हे त्यातील एक म्हणावे लागेल.. देशाला मधुर संगीताची विशेषत: अभिजात रागदारी संगीताची मोठी परंपरा लाभली. आज आपण जे संगीत ऐकतो त्याची बांधणी इतिहासपूर्व काळात झाली असे काही तज्ज्ञांचे मत आहे. भारतात संगीताला ५००० वर्षांची परंपरा तर नक्कीच आहे. अभिजात संगीताचे आजही कोट्यवधी चाहते असून, ते केवळ इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे हे संगीत ऐकत नाहीत तर छोट्यामोठ्या संगीत मैफलींना ठिकठिकाणी गर्दी करतात. भारतीय उपखंडात संगीताचे वेगवेगळे प्रकार असून, ज्याला हिंदुस्थानी अभिजात संगीत म्हणतात ते उत्तर भारतीय शैलीचे संगीत आणि त्याचप्रमाणे दक्षिण भारतीय संगीत या त्याच्या दोन शैली शतकानुशतके चालत आल्या.
मिया तानसेन यांना आज अभिवादन करावयाचे आहे. भारतातील सर्वांत जुना तानसेन संगीत महोत्सव सध्या ग्वाल्हेरमध्ये सुरू आहे. यंदाचे वर्ष शतकमहोत्सवी असल्याने मध्य प्रदेश सरकारने तो संगीतप्रेमींसाठी कायम लक्षात राहील असा करायचे ठरविले होते. अनेक थोर मोठे गायक, चित्रकार, दृश्यकलांचे सादरकर्ते, ग्वाल्हेर महोत्सवात हजर झाले आहेत.
ग्वाल्हेर हे शिंदे राजघराण्यासाठी ओळखले जाते. या घराण्याच्या आश्रयानेच तानसेन महोत्सव १९२४ साली सुरू झाला. हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही धर्मांतील गायक या महोत्सवात हजेरी लावून संगीत सम्राटाला अभिवादन करतात. ‘जयाजी प्रताप’ या ग्वाल्हेर राजघराण्याच्या गृहपत्रिकेत १८ फेब्रुवारी १९२४ च्या अंकात महोत्सवाचा तपशील देण्यात आला आहे. महोत्सवात कला सादर करण्यास संगीतकारांना मानधन दिले जात नाही. तरीही ते दरवर्षी येथे येतात. संगीताची परंपरा यातून जोपासली जाते. अनेक गायकांना प्रोत्साहन मिळते. तानसेन यांच्याशी अनेक गायकांचे नाव जोडले जाते. त्यांच्या जीवनातील विविध प्रसंग साकार करणारी एक मैफल मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक खात्याने आयोजित केली आहे.
१५ व्या शतकाच्या उत्तरार्धात गौड ब्राह्मण कुटुंबात ग्वाल्हेरपासून जवळच्या बेता येथे तानसेन जन्माला आले असे मानले जाते. ग्वाल्हेरमध्ये १५८९ साली त्यांचे निधन झाले. पूर्वी ग्वाल्हेरमध्ये राजा मानसिंग तोमर यांचे शासन होते. स्वामी हरिदास यांनी तरुण तानसेनला धृपद संगीताची दीक्षा दिली. धृपद गायकीच्या या महान कलावंताच्या स्मृत्यर्थ मुंबईत बऱ्याच वर्षांपासून हरिदास संगीत संमेलन भरवले जाते.
तानसेन संगीत समारोह यंदा शंभर वर्षे पूर्ण करत असला तरी जालंधरमध्ये भरवले जाणारे हरवल्लभ संगीत संमेलन सर्वांत जुने मानले जाते. १८७५ पासून हे संमेलन भरत आले. याशिवाय ७० वर्षांपूर्वी पुण्यात पंडित भीमसेन जोशी यांनी सुरू केलेला सवाई गंधर्व संगीत महोत्सव आजही गर्दी खेचतो. या सगळ्यात तानसेन महोत्सव वेगळा असून, जवळपास प्रत्येक संगीतकाराने गेल्या शतकभरात या ठिकाणी हजेरी लावली आहे. या महोत्सवात कला सादर करणे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. मुगल राज्यकर्ते विशेषतः सम्राट अकबर (१५४२ ते १६०५) हे कलांचे आश्रयदाते होते. मात्र, प्राचीन दस्तऐवजात भारतात ही कला वेद काळापासून होती असे नोंदवलेले आढळते. भारतीय साहित्यात अनेक ठिकाणी संगीताच्या कार्यक्रमाचा उल्लेख सापडतो. वाद्ये त्याचप्रमाणे कलाकार यांचेही संदर्भ येतात.
मियाँ तानसेन यांचे मूळ नाव रामतनू पांडे. ते भारतीय अभिजात संगीताचे निष्ठावान सेवक होते. धृपद गायकीला त्यांनी नवा जन्म दिला असे मानले जाते. हिंदुस्थानी अभिजात संगीताच्या लोकप्रिय प्रकारातील धृपद हा तसा कठीण गायन प्रकार होय. स्वामी हरिदास यांनी सुरू केलेली धृपद गायकी तानसेन यांनी पुढे नेली. प्रारंभी रेवाच्या राजांनी तानसेन यांना स्वामीजींकडे नेले. पुढे अकबराने त्यांना आश्रय दिला. इतकेच नव्हे तर मियाँ तानसेन अशी पदवी देऊन दरबारातील नवरत्नात त्यांचा समावेश केला. विविध क्षेत्रातील शीर्षस्थ मान्यवरांचा या नवरत्नात समावेश होता. अकबराला ते सल्लाही देत. त्यातील एक रत्न म्हणजे बिरबल.
त्याचप्रमाणे राजा तोडरमल यांचाही उल्लेख होतो. सहा रागांचे पुनरुज्जीवन करण्याचे श्रेय संगीत क्षेत्रातील जाणकार तानसेन यांना देतात. वसंतभैरव, श्री, पंचम, नटनारायण आणि मेघ हे ते सहा राग होत. सहावा मेघमल्हार या रागाशी तानसेन यांचे नाव विशेषत्वाने जोडले जाते. तानसेन हा राग आळवत तेव्हा पाऊस कोसळू लागायचा अशी आख्यायिका आहे.