अभयारण्यातील झोपडीतील जि.प. शाळांचा प्रश्न कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 13:05 IST2020-02-23T13:05:26+5:302020-02-23T13:05:59+5:30
पालकांनी मांडली व्यथा । गांभीर्याने लक्ष देत नसल्याची कैफीयत

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : तालुक्यातील अभयारण्यात येणाऱ्या २० शाळांना अजूनही बांधकामाची परवानगी मिळत नसल्यामुळे त्या शाळेतील विद्यार्थी गेल्या १२-१३ वर्षापासून इमारत नसल्यामुळे झोपडीवजा घरात शिक्षण घेतात़ यासंदर्भात अनेक वेळा प्रस्ताव पाठवूनही कोणीही याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.
शिरपूर तालुक्यातील सातपुड्याच्या रांगेत व अभयअरण्य क्षेत्रात असलेल्या पिरपाणी, काईडोकीपाडा, पिपल्यापाणी, खुटमळी, टिटवापाणी, चिंचपाणी, सातपाणी, सोज्यापाडा, मालपूरपाडा, प्रधानदेवी, शेकड्यापाडा, न्यु सातपाणी, कोवपाटपाडा, भूपेशनगर, रूपसिंगपाडा, सुभानपाडा, मेंढाबल्ली, गुहाडापाडा, खडरागडपाडा, उगबुड्यापाडा असे २० पाड्यावरील जिल्हा परिषदेच्या शाळा अभयअरण्य व पक्षीय अभयअरण्य क्षेत्रात येत असल्यामुळे या शाळांना बांधकामाची परवानगी शासन देत नाही़ त्यामुळे या शाळा आजमितीस झोपडावजा घरात वा उघड्यावर भरत आहेत़
तत्कालीन जि़प़चे सीईओ व विद्यमान जिल्हाधिकारी गंगारधरण डी यांनी देखील या शाळांना भेट देवून तेथील माहिती प्रत्यक्ष जाणून घेतली आहे़ तरी देखील या शाळांना अद्यापपर्यंत बांधकामाची परवानगी मिळाली नाही अथवा पर्यायी व्यवस्था झालेली नाही़
त्या पाड्यांवर जाण्यासाठी रस्ते नाही, खडखळ रस्त्यातून वाट काढत जावे लागते़ चारही बाजूनी जंगल असलेल्या डोंगराच्या कुशीत वसलेल्या आदिवासी ग्रामस्थांच्या अडचणी वाढल्या आहेत़ अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे या पाड्यांवर जाण्यासाठी रस्ते नाही, वीज नाही, पाण्याचा प्रश्न कायम आहे़
दहा बाय दहाच्या खोलीत पहिली ते चौथीची मुले, गुरेढोरांचा कुबट वास, ऊन पावसाची परिस्थिती, त्यातच मुलांना गोणपाटाची स्वच्छता गृहे तग धरून आहेत़ पाण्याची पुरेसी सोय नाही़ खिचडी शिजविण्याची जागा नाही़
प्रत्येक शाळेत भौतिक सुविधा पुरविण्याच्या जाहीराती पाहून धन्य वाटते, परंतु असे वास्तव चित्र शिरपूर तालुक्यात आहे हे देखील कळाल्यावर मात्र शासन किती निष्ठूर आहे याची जाणीव होते़