कोरोनानंतर आता झिका व्हायरसचा धोका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:24 IST2021-07-20T04:24:31+5:302021-07-20T04:24:31+5:30
धुळे - कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. पण कोरोनानंतर आता झिका व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे. झिका व्हायरसचे ...

कोरोनानंतर आता झिका व्हायरसचा धोका !
धुळे - कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. पण कोरोनानंतर आता झिका व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे. झिका व्हायरसचे रुग्ण केरळमध्ये आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या जिल्ह्यात झिका व्हायरसचा एकही रुग्ण आढलेला नाही मात्र काळजी घेणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात झिका व्हायरसचा एकही रुग्ण नाही. त्यामुळे अनावश्यक भीती बाळगण्याची गरज नाही. पण पावसाळ्यात साथीचे आजार बळावत असल्याने स्वछता ठेवणे आवश्यक आहे. तसेच आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळणे गरजेचे आहे.
झिका ' कशामुळे होतो ?
झिका हा विषाणू फ्लॅविव्हायरस या प्रजातीमधला असून हा एडीस डासांमार्फत पसरतो. याच डासांपासून डेंग्यू, चिकुनगुनिया या आजाराचा प्रसार होतो. झिका आजारावर कोणतेच विशिष्ट औषध किंवा लस उपलब्ध नाही. त्यामुळे लक्षणानुसार उपचार केले जातात.
या आहेत उपाययोजना
झिका आजारावर विशिष्ट औषध किंवा लस उपलब्ध नाही. रुग्णांच्या लक्षणांवरून उपचार केला जातो. यामध्ये रुग्णांनी पुरेशी विश्रांती घ्यावी. निर्जलीकरण टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थांचे सेवन करावे. घराच्या परिसरात डासांची पैदास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. आवश्यक औषधांची फवारणी करावी. आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा. मच्छरदानी वापरावी.
ही आहेत लक्षणे
झिका व्हायरस या आजाराची लक्षणे सर्वसाधारण डेंग्यू आजाराप्रमाणे आहेत. आजारामुळे रुग्णाला ताप येतो व अंगावर रॅशेस उमटतात. डोळे येणे, सांधे व स्नायुदुखी, थकवा, डोकेदुखी आदी सौम्य स्वरूपाची लक्षणे दिसतात. या आजाराची लक्षणे २ ते ७ दिवसांपर्यंत राहतात.
परिसर व वैयक्तिक स्वछता पाळा -
आपल्या जिल्ह्यात झिका या आजाराच्या एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. मात्र नागरिकांनी परिसर स्वछता व वैयक्तिक स्वछता पाळणे गरजेचे आहे. परिसर स्वछ ठेवला तर झिका व इतर साथीच्या आजाराची लागण होणार नाही. कोरडा दिवस पाळावा.
- डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी