चोपड्याच्या तरुणाला तामसवाडी शिवारात लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 21:04 IST2021-03-28T21:02:29+5:302021-03-28T21:04:13+5:30

साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

The youth of Chopda was robbed in Tamaswadi Shivara | चोपड्याच्या तरुणाला तामसवाडी शिवारात लुटले

चोपड्याच्या तरुणाला तामसवाडी शिवारात लुटले

धुळे : धुळे शहराकडून साक्रीमार्गे पिंपळनेरकडे दुचाकीने जाणाऱ्या चोपडा येथील तरुणाला मागून आलेल्या तिघांनी अडवून मारहाण करीत दुचाकीसह रोख रक्कम व दागिने घेऊन पोबारा केला. शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास तामसवाडी (ता.साक्री) गावाच्या शिवारात ही घटना घडली. याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

चोपडा तालुक्यातील अडावद येथील तकीया मोहल्ला येेथे राहणारा अरबाजखान सईदखान कुरेशी (२१) हा त्याच्या दुचाकीने (क्र. एमएच १९ डीएन ४६८१) धुळ्याकडून साक्रीमार्गे पिंपळनेरकडे जात होता. तामसवाडी गावाच्या शिवारातील पीर बाबाच्या डोंगराजवळ येताच पाठीमागून एका दुचाकीवरून तीन जण आले. तुमचे काहीतरी पडले असल्याचे सांगत दुचाकी थांबविण्यास भाग पाडले. या तिघांनी त्यांची दुचाकी रस्त्यात आडवी लावून कुरेशीला मारहाण केली. शिवीगाळ करीत दमदाटी केली. जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडे असलेले १२ हजार ५४० रुपये रोख, १३ हजार ७०७ रुपये किमतीची सोन्याची ५ ग्रॅम वजनाची अंगठी आणि ५० हजार रुपये किमतीची दुचाकी हिसकावून पोबारा केला.

स्वत:चा जीव वाचवित जखमी अवस्थेत अरबाजखान कुरेशी याने साक्री पोलीस ठाणे गाठत आपबिती कथन केली. याप्रकरणी त्याने दाखल केलेल्या फिर्यादीवरुन तिघ संशयितांविरूद्ध भांदवि कलम ३९४, ३२३, ५०४, ५०६, ३४ सह मोटार वाहन कायदा कलम नुसार रविवारी पहाटे ५ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

Web Title: The youth of Chopda was robbed in Tamaswadi Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.