आदिवासींच्या संस्कृतीवर युवांनी केले विचारमंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:08 IST2021-03-04T05:08:09+5:302021-03-04T05:08:09+5:30
धुळे - देशाचा ६० टक्के भाग हा तरूणांनी व्यापलेला आहे. या तरूणांना योग्य मार्गदर्शन आणि दिशा मिळाली तर ...

आदिवासींच्या संस्कृतीवर युवांनी केले विचारमंथन
धुळे - देशाचा ६० टक्के भाग हा तरूणांनी व्यापलेला आहे. या तरूणांना योग्य मार्गदर्शन आणि दिशा मिळाली तर ते स्वतःबरोबरच देशाचे उज्ज्वल भविष्य घडवू शकतात. शिक्षणाबरोबरच तरूणांमध्ये सामाजिक भान रूजवून त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम यंग फाउंडेशनच्या टीमतर्फे केले जात आहे ही अतिशय अभिमानास्पद बाब असल्याचे प्रतिपादन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी केले.
शिरपूर तालुक्यातील गुऱ्हाळपाणी येथे आयोजित युवा संवाद शिबिराच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी शिरपूरचे सहायक वनसंरक्षक अमित जाधव, माजी सरपंच केशरबाई पावरा, पोलीस पाटील वांद्रा पावरा,ग्रामपंचायत सदस्य राजेंद्रसिंग पावरा,यंग फाउंडेशनचे संदीप देवरे,रवींद्र बोरसे,सुवर्णा बोरसे उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आंब्याच्या रोपाला पाणी घालून करण्यात आले.
शिरपूर तालुक्यातील गुऱ्हाळपाणी येथे गेल्या दोन दिवसांपासून ‘स्वभान ते समाजभान’ या विषयावर दोन दिवसीय युवा संवाद शिबिर आयोजित करण्यात आले होते.आदिवासी भागातील लोकजीवन,आदिवासींची संस्कृती,तेथील प्रश्न अशा वेगवेगळ्या विषयावर माहिती मिळावी यासाठी यंग फाउंडेशनतर्फे युवा संवाद शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात धुळ्यासह,जळगाव,औरंगाबाद ,मुंबई,नाशिक आदी पाच जिल्ह्यातील युवक सहभागी झाले होते. शिबिरात गुऱ्हाळपाणी गावातील आदिवासी बांधवांशी संवाद ,परिचय सत्र,थुवानपाणी पाड्याला भेट,कुवर बाबा डोंगरावर चढाई आदी उपक्रम राबवून रविवारी दुपारी शिबिराचा समारोप झाला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी रवींद्र बोरसे,जागृती बोरसे,प्रकाश पाटील,चेतन उपाध्याय,रोहित येवले,चैताली अमृतकर,चेतना अमृतकर,मनिष पाटील यांनी परिश्रम घेतले.