शस्त्रक्रिया टाळून वाचविला तरुणाचा जिव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 22:25 IST2020-06-30T22:24:43+5:302020-06-30T22:25:18+5:30
हिरे वैद्यकीय महाविद्यालय : कोरोनासह इतरही रुग्णांवर प्रभावी उपचार

dhule
धुळे : अपघातात जखमी झालेल्या एका तरुण कामगारावर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असताना हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टराना शस्त्रक्रिया न करता या तरुणाचा जिव वाचविण्यात यश आले आहे़ कोरोना बाधित रुग्णांसह इतरही रुग्णांवर प्रभावीपणे उपचार सुरू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करीत डॉक्टरांचा सत्कार केला़
येथील रामशरण पांडे (३०) या तरुण कामगाराला जेसीबी यंत्रावर काम करताना १८ मे रोजी अपघात झाला होता़ या दुर्घटनेत त्याचा हात मोडला आणि छातीला तसेच पोटाला मुका मार लागला होता़ दोन खाजगी डॉक्टरांकडे त्याच्यावर उपचार करण्यात आले़ परंतु नंतर उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने सोनाग्राफी करण्यात आली़ अपघातात पोटाला मुका मार लागल्याने त्याच्या लिव्हरला मोठी चिर पडल्याची धक्कादायक बाब समोर आली़ लिव्हरमधून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता़ मार इतका गंभीर होता की लिव्हरला पडलेली चिर पोटातील महाशिरेपर्यंत गेली होती़
मोठ्या दवाखान्यात उपचार करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला़ परंतु आर्थिक परिस्थिती नसल्याने खाजगी दवाखान्यात उपचार घेणे शक्य नव्हते़ त्यामुळे डॉ़ सुधाकर गुजराथी यांनी हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ़ परवेझ मुजावर यांच्याशी चर्चा करुन महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात या तरुणाला दाखल केले़ रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले़ परंतु मार खोलवर असल्याने पोटाची शस्त्रक्रिया करणे धोकेदायक ठरु शकते़ म्हणून शस्त्रक्रिया टाळून उपचार करण्याचा निर्णय डॉक्टरांनी आणि त्यात त्यांना यशही आले़ हिरे मेडीकलच्या डॉक्टरांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या बळावर योग्य उपचार करुन रामशरणचा जिव वाचवला़
हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी केलेल्या या उपचाराचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी कौतुक केले असून अधीष्ठाता डॉ़ पल्लवी सापळे, शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे डॉ़ परवेझ मुजावर, डॉ़ प्रशांत देवरे, डॉ़ सुधाकर गुजराथी यांच्यासह संपूर्ण टीमचा जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार केला़ कोरोनासह इतरही रुग्णांवर प्रभावी उपचार होत असल्याची दखल प्रशासनाने घेतली़