धुळे : पावसामुळे दुकानाच्या आडोशाला थांबलेल्या तरुणाला दोन जणांनी दगड आणि हाताबुक्यांनी मारहाण करीत त्याच्याकडील रोख रकमेसह मोबाईल हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली़ हा प्रकार बिलाडी फाट्यावर ३१ जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला़ देवपूर पोलीस ठाण्यात १ आॅगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला़देवपुरातील बिलाडी रोडवरील एकता नगर प्लॉट नंबर १० मध्ये राहणारे सतीश कालिदास काळे (४२) हे देवपुरातील रसराज हॉटेलकडून बिलाडी फाट्याकडे पायी जात होते़ पाऊस सुरु झाल्याने त्यांनी योग - ७ या डीजे दुकानाच्या अडोशाचा आधार घेतला़ ते याच ठिकाणी थांबलेले असताना दोन तरुण दुचाकीने त्याठिकाणी आले़ त्यांनी या भागातील परिसराचा सुगावा घेतला आणि दुकानाच्या आडोशाला थांबलेल्या तरुणाजवळ दुचाकी नेली़ आजु-बाजूला कोणीही नसल्याची संधी साधून सतीश काळे यांना शिवीगाळ करीत दगड आणि हाताबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली़ त्यांच्यावर दहशत माजविण्याचा प्रयत्नही केला़ मारहाण करीत असताना सतीश यांच्या खिशाची झडती घेण्यात आली़ त्यांच्याकडे असलेल्या पाकिटातील ८ हजार १०० रुपये बळजबरीने हिसकावून घेतले़ एवढ्यावरच न थांबता ४ हजार रुपये किंमतीचा मोबाईल देखील हिसकावून घेतला़ ही घटना ३१ जुलै रोजी सायंकाळी सव्वा सात ते पावणे आठ वाजेच्य सुमारास घडली़अंधाराचा फायदा घेत या दोघांनी घटनास्थळावरुन पोबारा केला़ घटनेनंतर घाबरलेल्या सतीश यांनी आरडाओरड केली़ पण, अंधारामुळे त्याठिकाणी कोणीही नसल्यामुळे त्यांच्या मदतीला कोणीही येऊ शकले नाही़ यानंतर सतीश काळे यांनी देवपूर पोलीस ठाणे गाठत आपबिती कथन केली आणि फिर्याद दाखल केली़ याप्रकरणी भादंवि कलम ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला़
धुळ्यात तरूणाला मारहाण करीत लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 21:53 IST