धुळ्यात तरुणाचा चाकूने भोसकून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 13:36 IST2020-08-10T13:35:25+5:302020-08-10T13:36:07+5:30
मुल्ला कॉलनी : पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल

धुळ्यात तरुणाचा चाकूने भोसकून खून
धुळे : फिजिकल डिस्टन्सिंग न ठेवल्याच्या कारणावरुन तरुणाचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना चाळीसगाव रोडवरील मुल्ला कॉलनीत रविवारी रात्री उशिरा घडली़ घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली़ यावेळी तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात सोमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला़
शहरातील चाळीसगाव रोडवरील साबीर शेठ कॉम्प्लेक्सजवळ मुल्ला कॉलनी येथे रविवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास बैठक होती़ ही बैठक का घेतली आणि फिजिकल डिस्टन्सिंग का ठेवले नाही या कारणावरुन शाब्दिक चकमक उडाली़ वाद विकोपाला गेल्याने वाशित अब्दुला अतिकुर्हेमान खान याला हाताबुक्याने मारहाण करण्यात आली़ एकाने त्याच्या पोटाच्या मागील बाजूस चाकूने वार केल्याने त्यात त्याला गंभीर दुखापत झाली़ तातडीने त्याला वैद्यकीय उपचारासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता़ या घटनेमुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती़
याप्रकरणी मयत मुलाचे वडील अब्दुला अतिकुर्हेमान खान यांनी चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन गाठत आपबिती कथन केली आणि सोमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास फिर्याद दिली़ त्यानुसार, अब्दुल रज्जाक लियाकत खान, इमरान खान अब्दुल रज्जाक खान, पल्लू अब्दुल रज्जाक खान, इकराम रज्जाक खान, इजार उर्फ राजा रज्जाक खान (रा़ मुल्ला कॉलनी, चाळीसगाव रोड, धुळे) यांच्या विरोधात संशयावरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विलास ठाकरे घटनेचा तपास करीत आहेत़