इंजिनीअर तरुणीची तापीत उडी घेऊन आत्महत्या, शिरपूर पोलिसात नोंद, घटनेचे कारण अस्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2023 17:51 IST2023-08-18T17:50:46+5:302023-08-18T17:51:00+5:30
शिरपूर शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनेमागील कारण अस्पष्ट आहे.

इंजिनीअर तरुणीची तापीत उडी घेऊन आत्महत्या, शिरपूर पोलिसात नोंद, घटनेचे कारण अस्पष्ट
- राजेंद्र शर्मा
शिरपूर : सिव्हिल इंजिनीअरींगचे शिक्षण पूर्ण झालेल्या २४ वर्षीय तरुणीने तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी घडली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत मच्छीमारांच्या मदतीने तरुणीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. शिरपूर शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनेमागील कारण अस्पष्ट आहे.
गुरुवारी सकाळच्या सुमारास एका तरुणीने सावळदे तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. शिरपूर शहर पोलिस स्टेशनचे पोर्णिमा पाटील, अनिता पावरा यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल होत तरुणीचा सावळदे गावाजवळील निम्स कॉलेज हद्दीत मच्छीमारांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला होता. मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी सोशल मीडियावर फोटोसहीत ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर दुपारी तिची ओळख पटली. तरुणीचे नाव नंदिनी रवींद्र खैरनार (वय २४, रा. सोनगीर, हल्ली मुक्काम साईदर्शन कॉलनी, धुळे) असे असून नंदिनी खैरनार ही सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण झाले आहे.
नंदिनी खैरनार या नाशिक येथे शिक्षण घेत होत्या. नाशिक येथून धुळे येथील घरी आली होती. गुरुवारी सकाळी मैत्रिणीकडे जाऊन येते, असे सांगून नंदिनी घराबाहेर निघाली. मात्र, ती परत घरी परतली नाही. तिचा शोध सुरू असताना ती कुठेही मिळून आली नाही. अखेर सोशल मीडियावर नंदिनी हिची माहिती मिळाल्याचे वडील रवींद्र खैरनार यांनी पोलिसांना सांगितले. नंदिनी हिच्या पश्चात आई- वडील व लहान भाऊ असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. शिरपूर पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.