यंदा कापसाचे क्षेत्रफळ वाढणार तर कांदा, मिरचीचे घटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 23:20 IST2020-06-10T23:19:46+5:302020-06-10T23:20:09+5:30
शिंदखेडा तालुका : मालपूर परिसरात शेती मशागतीच्या कामांना वेग

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
मालपूर : मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यामुळे मालपूरसह परिसरातील सुराय, चुडाणे, कलवाड,े अक्कलकोस कर्ले परसोळे आदी परिसरातील शेतकरी नवउमेदीने लागवड व पेरणी योग्य क्षेत्र तयार करण्याच्या कामात व्यस्त असुन ही कामे अंतिम टप्प्यात असल्याचे दिसून येत आहेत. यावर्षी मालपुर सह परिसरात कापुस लागवड क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तर कांदा, मिरची पिकाच्या क्षेत्रफळात घट दिसत आहे.
येथील बागायती कापुस लागवड पुर्णत्वास आली असून सध्या कोरडवाहू कापसाच्या लागवडी योग्य क्षेत्र तयार करण्याचे काम सुरू आहे. हे काम देखील अंतिम टप्प्यात आले असुन निसर्ग चक्रीवादळाचा पाऊस येथे आल्यामुळे येथील शेतकऱ्यांनी पुन्हा नविन वखरणी करुन कापुस लागवडीसाठी सर पाडत आहेत तर काही ठिकाणी त्याच सर मध्ये पुन्हा नव्याने सर पाडत आहे. यामुळे बसलेली सर पुन्हा दुरुस्त होत असुन या मेहनतीमुळे निंदणी चा खर्च वाचणार असल्याचे जाणकार शेतकरी त्यांच्या अनुभवातून सांगतात.
मिरचीसाठी दोंडाईचा बाजारपेठ प्रसिद्ध आहे. मात्र दोन वर्षांपासून या मिरची लागवडीच्या क्षेत्रात सतत घट होत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा कांदा लागवड क्षेत्र देखील घटणार आहे. या पिकासाठी भरपूर पाणी लागते. पाणी देखील आहे. मात्र सध्या या पिकाचा बाजारपेठेतील भाव लक्षात घेता याकडे येथील शेतकऱ्यांनी कांदा पिकाकडेही पाठ फिरविली आहे.
यावर्षी येथे अमरावती मध्यम प्रकल्पात मुबलक पाणी साठा असल्यामुळे कुठल्याही प्रकारची पाण्याची टंचाई दिसुन येत नाही. मागच्या आठवड्यात उजवा व डावा या दोनही कालव्याना पाणी सोडण्यात आल्यामुळे याचा मोठा दिलासा मिळाला.
मालपूरसह परिसराचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. शेतीच्या उत्पन्नावरच येथील अर्थचक्र अवलंबून आहे. म्हणून सर्व मरगळ झटकून शेतकरी शेतीच्या मशागतीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे.