प्राचीन श्री सोमेश्वर महादेव मंदिरात यात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 11:43 IST2019-11-11T11:42:22+5:302019-11-11T11:43:00+5:30

सोनगीर : आज मध्यरात्री दीपोत्सव, हरिहर भेट, लघुरुद्राभिषेक, महाआरती व महाप्रसाद

Yatra festival in ancient Shri Somashwar Mahadev temple | प्राचीन श्री सोमेश्वर महादेव मंदिरात यात्रोत्सव

dhule

सोनगीर : दोंडाईचा राज्य मार्गालगत सुमारे ५०० वर्षापेक्षा जुने ऐतिहासिक प्राचीन श्री सोमेश्वर महादेव मंदिर देवस्थान आहे. येथे कार्तिकी पौर्णिमेनिमित्त यात्राउत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी मध्यरात्री रात्री दीप उत्सव, हरिहर भेट व मंगळवार १२ रोजी यात्रोत्सव साजरा होणार आहे. तत्पूर्वी सकाळी लघुरुद्राभिषेक, पूजन, महाआरती व दुपारी महाप्रसादाचे वाटप होईल. तसेच मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे.
येथील श्री सोमेश्वर महादेव मंदिर देवस्थान प्राचीन असून अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. मंदिर मध्ययुगीन काळातील असून मंदिराची रचना घुमटावर आधारित आहे. मंदिरावर एकूण बारा घुमट आहेत. येथील महादेवाची पिंड स्वयंभू असल्याची भाविकांची भावना आहे. मंदिराबाबत मोठी श्रद्धा असल्याने येथे भाविक मोठया संख्येने येत असतात. सोमेश्वर मंदिर हे जागरूक देवस्थान म्हणून प्रसिध्द आहे.
या मंदिरात बाराही महिने विवाह केले जातात. येथे विवाह करीत असतांना तिथी किंवा मुहूर्त पाहण्याची गरज नाही, अशी मान्यता आहे. त्यामुळे या मंदिरात आजही विवाह संपन्न होतात.
तसेच विविध मान्यता असलेल्या मोठया धार्मिक पुजाअर्चा देखील येथे केल्या जातात. कार्तिकी पौर्णिमेला यात्रा उत्सव असल्याने येथी मनोरंजनाची साधने, खाद्यपदार्थाचे स्टॉल, ज्वेलरी, सौंदर्य प्रसाधनांची दुकाने, संसारोपयोगी साहित्याची दुकाने थाटायला सुरुवात झाली आहे. यात्रेत लोकनाट्याचे विशेष आकर्षण असते. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्याची दंगल होईल. यात खान्देशातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील मल्ल कुस्त्यांमध्ये सहभाग घेत असतात. दरम्यान यात्रा उत्सवात येणाºया भाविकांची संख्या पाहता कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी सोनगीर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. यासाठी वाढीव पोलीस बंदोबस्त मागविला आहे.
मंदिराला ‘क’ तीर्थक्षेत्राचा दर्जा
दरम्यान, मंदिराला २००७-०८ मध्ये ‘क’ वर्ग दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून दर्जा मिळाला आहे. यावेळी विविध विकास कामे करण्यासाठी ३० लाखाचा विकास निधी मिळाला होता. विकास कामे केली गेली. तसेच आमदार अमरीशभाई पटेल यांच्या निधीतून सभागृह बांधण्यात आले आहे. तसेच माजी मंत्री डॉ.सुभाष भामरे यांचा निधीतून पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. मात्र, विकास कामाकडे दुर्लक्षित झाल्यामुळे येथे असलेल्या शौचालय व बैठक व्यवस्थेची दुरवस्था झाली आहे. दरम्यान मंदिर परिसराला निसर्गत:च सौंदर्य लाभले आहे. यामुळे तिर्थक्षेत्राचा दर्जा वाढवून मंदिर परिसराला संरक्षण भिंत , भक्तनिवास, मंदिरामागून वाहणाºया नदीरुपी नाल्यावर बंधारा बाधून पाणी अडविणे, मंदिर परिसरात पथदिवे- हायमास्ट लावणे, गोरगरिबांच्या विवाहासाठी मंगल कार्यालय बांधणे, तसेच इतर आणखी महत्वपूर्ण विकास कामे येथे करणे गरजेचे आहे. मात्र, बारा वर्षानंतर पुन्हा मंदिरासाठी विकास निधी मिळालेला नाही. मंदिर दुर्लक्षित असल्याने विकासापासून वंचित राहिले आहे. शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देत मंदिर परिसराच्या विकासासाठी व मंदिर जीर्णोद्धारासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. मंदिर व परिसर देखरेखीसाठी याठिकाणी समिती असावी, अशी मागणी भाविकांमधून होत आहे. तसेच झालेल्या विकास कामांकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Yatra festival in ancient Shri Somashwar Mahadev temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे