ट्रकमध्ये मजुरांची कोंबून वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 13:01 IST2020-04-08T13:01:00+5:302020-04-08T13:01:31+5:30
मालपूर : ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
मालपूर : कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन असला तरी परराज्यातून तसेच मुंबई, पुणे या क्षेत्रातून प्रवासी झुंडीच्या झुंडीने शिंदखेडा तालुक्यातील मालपुर गावात दाखल होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
देशात संचारबंदी व जिल्हा बंदी असूनही मोठ्या प्रमाणात एकाच ट्रकमध्ये नागरिकांचे लोंढे प्रवास करुन परराज्यातून गावात दाखल होत आहे. यामुळे चिंतेचे वातावरण आहे. गेल्या आठवडयात ऊसतोड मजुरांची गाडी गुजरात राज्यातून गावात दाखल झाली. मात्र, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे या सर्वांना वाहनासह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन प्राथमिक तपासणी करण्यात आली.
मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास येथील ऊसतोड मजुर गुजरात राज्यातील मांडवी शहरातून येथे दाखल झाले. हे मजूर मढी शुगर फॅक्टरी येथे कामासाठी गेले होते. त्यांना प्रथम त्यांच्या मुकादमाने त्याच्या गावी आणले व तेथून ट्रकमध्ये अक्षरश: कोंबून मालपुर येथे सोडून दिले.
सध्या शासन, प्रशासन वेळोवेळी सुचना देत आहे कि जेथे आहेत तेथेच थांबावे. मात्र काम संपल्यामुळे मुकादमाने कुठलीही फिकीर न करता मजुरांना आणून सोडून दिल्यामुळे आता मालपूरकरामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबई, पुणे येथून देखील काही नागरिकांचा येण्याचा ओघ अजूनही सुरू आहे.
या सर्वांची येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करुन माहिती संकलीत केली जात असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र पाटील यांनी सांगितले.
या सर्वांच्या हातावर होम क्वॉरंटाईनचा शिक्का मारला आहे. व घरातच रहाण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे.