भरधाव ट्रकची धडक, दुचाकीवरील महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 22:17 IST2021-03-08T22:17:12+5:302021-03-08T22:17:20+5:30
या घटनेनंतर चालक ट्रक घेऊन फरार

भरधाव ट्रकची धडक, दुचाकीवरील महिला ठार
धुळे : लामकानी येथून दैनंदिन बाजार करुन परत जाणाऱ्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकचा कट लागला. यात झालेल्या अपघातात महिला जागीच ठार तर दुचाकीचालक जखमी झाल्याची घटना ६ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर चालक ट्रक घेऊन फरार झाला आहे. सोनगीर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. धुळे तालुक्यातील लामकानी येथे दैनंदिन बाजार केल्यानंतर लकमा फुलसिंग ठाकरे (३२, रा. देवूर ता. शहादा जि. नंदुरबार) या मोठ्या भील (रा. लामकानी ता. धुळे) याच्यासोबत एमएच ३९ एल ४७२६ क्रमांकाच्या दुचाकीवरुन परत घराकडे जात होत्या. धनंजय वाणी यांच्या शेताकडे जात असताना पाण्याच्या टाकीजवळ पाठीमागून येणारा जीजे ०३ सीएल ८०३८ क्रमांकाच्या ट्रकचा दुचाकीला कट लागला. यात झालेल्या अपघातात लकमा ठाकरे या ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मोठ्या भील हा रस्त्याच्या बाजूला फेकला गेल्याने त्याला दुखापत झाली. अपघाताची ही घटना ६ मार्च रोजी सायंकाळी ६ ते साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. अपघातानंतर जमा होणारी गर्दी लक्षात घेता ट्रकचालकाने ट्रकसह घटनास्थळावरुन पळ काढला. दोघा जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी लकमा ठाकरे यांना मृत घोषित केले. याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात फुलसिंग ठाकरे (५५, रा. देवूर ता. शहादा जि. नंदुरबार) यांनी ७ मार्च रोजी पहाटे साडेबारा वाजता फिर्याद दाखल केली. त्यानुसार, फरार ट्रकचालकाविरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली.