वीजेचा धक्का लागून वायरमनचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 22:47 IST2020-06-28T22:46:39+5:302020-06-28T22:47:01+5:30
अजनाळे शिवारातील घटना : रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला नोंद नाही

वीजेचा धक्का लागून वायरमनचा जागीच मृत्यू
कुसुंबा :विजेच्या खांबावर काम करीत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरु झाल्याने वायरमनचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना धुळे तालुक्यातील अजनाळे शिवारात रविवारी सकाळी घडली़ या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात आली़
शंकरसिंग गिरासे (३८) असे त्या मयत वायरमनचे नाव आहे़ धुळे तालुक्यातील अजनाळे, पाळद आणि बल्लाणे या तीन गावांतील विजेचा पुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती़ त्यामुळे त्यांचे दैनंदिन काम सुरु होते़ सकाळी अकरा ते साडेअकरा वाजेच्या सुमारास ते विजेच्या खांबावर चढून आपले काम करीत असताना अचानक विजेचा प्रवाह सुरु झाला आणि क्षणार्धात त्यांना काही कळायच्या आत वीजेचा झटका बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला़ त्यानंतर ते खांबावरच लटकलेले होते़ घटनेवेळी त्यांच्यासोबत खांबाजवळ एक सहकारी देखील असल्याची माहिती मिळत आहे़ ही घटना समजताच खांबाजवळ गर्दी जमा झाली होती़ त्यांना खांबावरुन खाली उतरविल्यानंतर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून शंकरसिंग गिरासे यांना मृत घोषित करण्यात आला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदन गृहाजवळ आणल्यानंतर गर्दी जमा झाली होती़ याठिकाणी आलेल्या अधिकाऱ्यांना नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घेराव घातला होता़
गिरासे यांचे मूळ गाव धुळे तालुक्यातील कुंडाणे आहे़ ते गेल्या दहा ते बारा वर्षापासून कुसुंबा येथील भगवती कॉलनीमध्ये वास्तव्यास होते़ त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे़ त्यांचे वडीलही वीज वितरण कंपनीत कार्यरत होते़ त्यांच्या निधनामुळे त्यांची अनुकंपा तत्वावर नोकरी लागली होती़ वीज कंपनीमध्ये ते गेल्या बारा वर्षापासून कार्यरत होते़ रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला नोंद झाली नव्हती.