शिक्षकांचेच पगार उशिरा का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:35 IST2021-05-14T04:35:35+5:302021-05-14T04:35:35+5:30
शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार १ तारखेपूर्वीच होत असतात. तसेच जिल्हा परिषद शिक्षकांचे पगारही ५ तारखेपूर्वीच करण्याचे आदेश आहेत. मात्र पगाराची ...

शिक्षकांचेच पगार उशिरा का?
शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार १ तारखेपूर्वीच होत असतात. तसेच जिल्हा परिषद शिक्षकांचे पगारही ५ तारखेपूर्वीच करण्याचे आदेश आहेत. मात्र पगाराची तारीख उलटून आठ-दहा दिवस होतात तरी पगार हातात येत नसल्याने भरमसाठ पगार असूनही शिक्षकांचे पगाराअभावी आर्थिक नियोजन कोलमडत असते.
अनेकांना घर, गाडी अथवा तत्सम कारणांसाठी कर्ज घेतलेले असते. तसेच बहुतेक शिक्षकांच्या विमा पॅालिसी असतात. मुलांच्या उच्च शिक्षणाचा खर्च असतो यासाठी पैशांची नितांत गरज असते.
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या पगारासाठी पगाराचा आराखडा तयार करून तशी मागणी करावी लागत असते. मागणी वेळेवर केली तरच अनुदान मिळत असते. मात्र बीडीएसच वेळेवर तयार होत नसल्याने, ५ तारखेला होणारा पगार १५ ते २० तारखेच्या दरम्यान होत असतो. यामुळे आर्थिक नियोजन कोलमडते आहे. काही शिक्षकांचे विविध बँकांचे हप्ते थकलेले आहेत. हप्ते थकल्याने, त्यावरील व्याज वाढते? याला जबाबदार कोण असा प्रश्न शिक्षकांतर्फे उपस्थित होऊ लागला आहे.
कोरोनाकाळात इतर विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच शिक्षकांचेही भरीव योगदान आहे. त्यांनी आतापर्यंत शासनाच्या सर्व आदेशांचे पालन केले आहे. त्यामुळे इतर विभागाचे पगार ज्याप्रमाणे ठरलेल्या तारखेलाच होतात तसेच शिक्षकांचे पगारही दर महिन्याच्या ठरलेल्या तारखेच्या दिवशीच व्हावे, अशी रास्त अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केलेली आहे.
अनियमित पगार
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना समाधानकारक पगार आहे. साधारत: दर महिन्याच्या पाच तारखेला त्यांचे पगार होत असतात. यानुसारच शिक्षक आपले नियोजन करीत असतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पगार अनियमित होत असल्याने, त्यांचेही आर्थिक नियोजन कोलमडलेले दिसते.
पगार उशिरा होत असल्याने, गृहकर्ज, विम्याचे हप्ते थकतात. जीआयएस कर्ज वेळेवर भरले नाही तर चक्रवाढ व्याज भरावे लागते. यासाठी पगार वेळेवर होणे गरजेचे आहे. यापुढे पगारला उशिरा झाल्यास शिक्षक समिती आंदोलन करेल.
- राजेंद्र पाटील,
शिक्षक,
संपूर्ण राज्यात बीडीएस बंद केल्यामुळे पगाराला उशीर होत आहे. पगार हा १ तारखेलाच झाला पाहिजे. पगार उशिरा होत असल्याने, विविध हप्ते भरण्यात अडचणी येत असतात. शिक्षकांचे पगार वेळेतच झाले पाहिजे.
- बापू पारधी,
शिक्षक
काही महिन्यांपासून शिक्षकांचा पगार अनियमित होत आहे. त्यामुळे बँकांचे हप्ते वेळेवर भरता येत नाही. पगार वेळेवर नसल्याने, घरगुती आर्थिक नियोजनही कोलमडते. कोरोनाकाळात उपचारासाठी पैशांची नितांत गरज आहे.
- भूपेश वाघ,
शिक्षक
जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार नियमित व दर महिन्याच्या ५ तारखेलाच होत असतात. शिक्षकांचे पगार उशिराने होत नाहीत.
- मनीष पवार,
शिक्षणाधिकारी, प्राथमिक, धुळे