शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला का होतोय विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 14:19 IST2020-11-24T14:17:52+5:302020-11-24T14:19:34+5:30
वार्तापत्र, सुनील बैसाणे सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला. त्यानुसार शिक्षण विभागाने गेल्या आठवड्यापासून याबाबत जोरदार ...

dhule
वार्तापत्र, सुनील बैसाणे
सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला. त्यानुसार शिक्षण विभागाने गेल्या आठवड्यापासून याबाबत जोरदार तयारी सुरू केली होती. शिक्षकांची कोरोना चाचणी देखील युध्द पातळीवर सुरू केली. सोमवारपासून शाळा सुरू करावयाच्या असल्याने शिक्षण विभाग रविवारी सायंकाळपर्यंत कामात व्यस्त होता. सोमवारपासून शाळा सुरू होत असल्याच्या बातम्याही शिक्षण विभागाने दिल्या होत्या. परंतु हा महत्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकारी घेतील याबाबत हा विभाग अनभिज्ञ असल्याचे दिसले. कारण शाळा सुरू करण्याच्या बाबतीत घाईघाईत निर्णय घेणे योग्य नसल्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी रविवारी सांयकाळी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. जगातील काही देशांमध्ये आणि भारतात देखील काही राज्यांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्याच्या बातम्या येत असताना विद्यार्थी आणि शिक्षकांचा जीव धोक्यात घालणे योग्य नसल्याची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. शिक्षण महत्वाचे असल्याने शाळा सुरू झाल्या पाहिजेत; परंतु त्यासाठी सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना शाळांमध्ये आहेत का, विद्यार्थी वाहतुकीची परिस्थिती काय आहे, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी विद्यार्थींकडून करुन घेणे शाळा प्रशासनाला शक्य होईल का आदी प्रश्न जिल्हा प्रशासनाला सतावत आहेत.
त्यामुळे गावपातळीवरील कोरोनाच्या परिस्थितीचा आणि सुरक्षा उपाययोजनांचा बारकाईने अभ्यास करुन एकाच वेळी सर्व शाळा सुरू न करता टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट मत आहे. शाळा पातळीवर थर्मल गन, ऑक्सिमीटर, सॅनिटायझर पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे किंवा नाही याचा अभ्यास करुन सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी शिक्षण विभागाला दिले. तसेच कोरोनाचा एकही रुग्ण नसलेल्या गावांची यादी तयार करण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा सुरू करु नये अशी पालकांची भूमिका आहे. शिवाय काही शिक्षक संघटनांनी देखील याला विरोध केला आहे. तपासणीत सहा शिक्षक पॉझिटिव्ह आले आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थींच्या सुरक्षेला प्राधान्य देत पालकांना विश्वासात घेतल्याशिवाय शाळा सुरू करणार नाही, या जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेचे स्वागतच होत आहे.