काट्याच्या लढतीत विजय कोणाचा होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:32 IST2021-01-18T04:32:51+5:302021-01-18T04:32:51+5:30
तालुक्यात ३४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती; मात्र माघारीअंती घोडसगांव, पिंपळे, वाठोडा, असली, हिंगोणीपाडा व भावेर अशा ६ ग्रामपंचायतींसह १११ ...

काट्याच्या लढतीत विजय कोणाचा होणार?
तालुक्यात ३४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती; मात्र माघारीअंती घोडसगांव, पिंपळे, वाठोडा, असली, हिंगोणीपाडा व भावेर अशा ६ ग्रामपंचायतींसह १११ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत़ त्यामुळे उर्वरित २८ ग्रामपंचायतींपैकी दहिवद, होळ, भाटपुरा व मांडळ येथे काट्याची लढत पाहायला मिळाली.
दहिवद येथे १७ जागांसाठी निवडणूक लागली होती़ सत्ताधारी गटाचे विद्यमान सरपंच चंद्रकांत मधुकर चव्हाण-पाटील ऊर्फ बाळूदादा हे गावातीलच एका शैक्षणिक संस्थेत कर्मचारी आहेत़ त्याच संस्थेतील चेअरमन लक्ष्मीकांत बापूराव चव्हाण-पाटील यांच्या विरोधात त्यांनी सन २०१५ च्या निवडणुकीत रणशिंग फुंकले होते़, त्यावेळी चंद्रकांत चव्हाण यांच्या गटाने १७ पैकी १४ तर विरोधकांना फक्त ३ च जागा पटकाविता आल्या होत्या़ यंदाच्या निवडणुकीत ते दोघे स्वत:सह सौभाग्यवतींना रिंगणात उतरून आमने-सामने पॅनल उभे केले़
सरपंच पदावर डोळा ठेवून दोघे पॅनल प्रमुखांसह त्यांच्या सौभाग्यवती सुध्दा रिंगणात उतरल्या आहेत़ माघारीअंती १७ पैकी २ जागा बिनविरोध झाल्यामुळे उर्वरित १५ जागांसाठी ३४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते़ बिनविरोध झालेले रणदिवे हे अपक्ष असून तर संभाजी पाटील हे लक्ष्मीकांत पाटील गटाचे असल्याचे सांगण्यात येते़ विशेषत: दोघे पॅनलप्रमुखासह त्यांच्या सौभाग्यवती देखील रिंगणात उतरल्यामुळे एकाच घरातील डबल उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने लढलेत़ सुतकी भाऊबंदकी असताना केवळ वर्चस्वाकरिता पॅनल रिंगणात उतरले होते़ विशेषत: निवडून आला तरी चव्हाणाचेच पॅनल असणार आहे, पडला तरी चव्हाणाचेच पॅनल राहणार आहे़ याठिकाणी मतदान खेचण्यासाठी पैशांचा महापूर वाहिला़ काट्याच्या लढती असल्यामुळे कुणाचा विजय होतो हे सांगणे कठीण असल्यामुळे निकालानंतरच चित्र स्पष्ट होईल़
होळ येथे ११ जागांसाठी निवडणूक होत असून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत़ जि.प.सदस्य प्रा़ संजय पाटील व व्यापारी कुटुंबातील तरुण तन्वीर शिंपी यांनी समोरासमोर पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उभे करून चुरस निर्माण केली होती़ मात्र गावाजवळील अजंदे गावाचे सरपंच चंद्रकांत पाटीलसह अन्य परिसरातील गावपुढाऱ्यांनी शिंपी यांच्या पॅनलला समर्थन दिल्यामुळे निवडणूक चुरशीची निर्माण केली़ त्यामुळे याठिकाणी कुणाचा विजय होतो हे सांगणे देखील कठीण झाले आहे़
मांडळ येथे ७ जागांसाठी सरळ लढत होत असून १४ उमेदवार रिंगणात होते़ सत्ताधारी गटाचे विद्यमान सरपंच सुनील भटू सोनवणे यांच्या विरोधात माजी उपसरपंच योगेंद्र हिलाल सोनवणे यांनी पॅनल रिंगणात उतरून ते सुध्दा आमने-सामने उतरले आहेत़
भाटपुरा येथे ११ जागांसाठी २५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते़ सत्ताधारी गटाचे सरपंच शैलेश चौधरी विरोधात जे़ टी़ पाटील यांनी पॅनल देऊन चुरस निर्माण केली आहे़