ओव्हरटेक करताना डंपरची धडक, दुचाकीजवळ थांबलेले तिघे जखमी
By देवेंद्र पाठक | Updated: February 18, 2024 20:08 IST2024-02-18T20:08:49+5:302024-02-18T20:08:56+5:30
शिरपूर तालुक्यातील वाडी येथील घटना, तिघांना दुखापत

ओव्हरटेक करताना डंपरची धडक, दुचाकीजवळ थांबलेले तिघे जखमी
धुळे : भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरची उभ्या असलेल्या दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील तिघा तरुणांना गंभीर दुखापत झाली. ही घटना शिरपूर तालुक्यातील वाडी शिवारात गुरुवारी दुपारी घडली. जखमी तिघा तरुणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात फरार डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शिरपूर तालुक्यातील वाडी ते बोराडी रोडवरील वाडी गावाच्या पुढे प्रकाश पुंडलिक पाटील यांच्या शेतासमोरील पत्र्याच्या शेडसमोरील भागात रस्त्याच्या साईड पट्टीच्या बाजूला विना क्रमांकाची दुचाकी उभी करुन तीन तरुण गप्पा मारत उभे होते. त्याचवेळेस एमएच १८ एए ८९५८ क्रमांकाच्या भरधाव वेगाने येणारा आणि पुढच्या वाहनाना ओव्हरटेक करत असलेल्या डंपरने उभ्या असलेल्या तरुणांना जोरदार धडक दिली. यात विकास रतीलाल भील (वय १९), जयेश आनंदा भील (वय १७) आणि परशुराम किसन भील (वय १७) (तिघे रा. वाडी ता. शिरपूर) यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी जखमी विकास भील याचा काका रतिलाल दारासिंग भील (वय ३५, रा. वाडी बुद्रुक ता. शिरपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन फरार झालेल्या डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रमोद ईशी करीत आहेत.