विहिरींनी गाठला तळ, तर दुबार पेरणी केलेली बाजरी गेली हवेतच उडून यामुळे शेतकरी संकटात, दुष्काळग्रस्त जाहीर करून द्यावा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:41 IST2021-08-13T04:41:05+5:302021-08-13T04:41:05+5:30
अर्धा पावसाळा संपला तरी मालपूर येथील नदी, नाले कोरडे ठाक असून, नाल्यावरील जलयुक्त शिवारांतर्गत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात ठणठणाट दिसून ...

विहिरींनी गाठला तळ, तर दुबार पेरणी केलेली बाजरी गेली हवेतच उडून यामुळे शेतकरी संकटात, दुष्काळग्रस्त जाहीर करून द्यावा दिलासा
अर्धा पावसाळा संपला तरी मालपूर येथील नदी, नाले कोरडे ठाक असून, नाल्यावरील जलयुक्त शिवारांतर्गत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात ठणठणाट दिसून येत आहे. यामुळे येथील विहिरी, कूपनलिकांचा जलस्रोत घटून विहिरींनी तळ गाठला आहे. यामुळे भर उन्हाळ्यात वाढीस लावलेला कापूस शेतकऱ्यांच्या डोळ्या देखत करपून गेला आहे. आता पाऊस आला तरीदेखील त्यावरील फुलफुगडी गळून मातीत मिसळणार आहे म्हणून नुकसान हे ठरलेलेच आहे. म्हणून येथील जुजबी स्वरुपातील बागायती शेतीदेखील यावर्षी संकटात सापडली आहे, तर कोरडवाहू वाणाचे तीन तेरा झाल्याचे चित्र शेतशिवारात दिसून येत आहे.
तुटपुंज्या पावसाच्या भरवशावर मालपूरसह परिसरातील शेतकऱ्यांनी कोरडवाहू कापसाची लागवड १६ जून रोजी दाखल झालेल्या पावसावर केली. मात्र लागवड झाल्यावर एकथेंबदेखील आठवडाभर पाऊस पडला नाही. परिणामी कापसाचा अंकुर जमिनीवर येण्याआधी जमिनीतच नेस्तनाबूत झाला. यामुळे रोटावेटर, वखर फिरवून येथील शेतकऱ्यांनी कमी पावसाचे व कमी दिवसांचे भुसार पिकाला पसंती देऊन बाजरीची दुबार पेरणी केली. बाजरीची पेरणी झाल्यानंतर महिनाभरापासून पावसाचा खंड पडला आहे. दरम्यानच्या काळात वारादेखील येथे तासी ३० ते ३५ किलोमीटर वेगाने वाहिल्याने या पिकाला सुरुवातीला एकच मूळ असल्याने या वाऱ्याच्या वेगाने बाजरी पीक हवेतच उडून गेल्याचे येथील विदारक चित्र दिसून येत आहे. यामुळे दुबार पेरणी केलेले पीकदेखील हातचे गेले व अर्धा पावसाळा संपल्यामुळे येथील शेतकर्यांचे मनोधैर्य खचून गेले असून, वैफल्यग्रस्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यातच अजून कोरोना पूर्णपणे संपलेला नसल्याने मदतीची अपेक्षा येथील शेतकरीवर्गाने व्यक्त केली आहे.
येथील अमरावती मध्यम प्रकल्पातील पाणीदेखील विखरण, कामपूर, खर्दे येथील तलाव भरण्यासाठी वापर झाल्याने त्यात कमालीची घट दिसून येत आहे. आहे ते पाणी आगामी पिण्याच्या पाण्यासाठी राखीव करावे
लागेल. यामुळे येथील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांजवळ कुठलाच पर्याय दिसून येत नसल्यामुळे साहजिकच आहे की भागभांडवल लावून पिके हातची वाया गेल्याने आगामी काळात कुटुंबीयांची उपजीविका कशाप्रकारे भागवायची यामुळे दुष्काळी तालुका जाहीर करून येथील शेतकर्यांना धीर द्यावा अन्यथा खान्देशाचा नजीकच्या काळात विदर्भ होऊन शेतकरी टोकाचे पाऊल उचलतील ही धोक्याची घंटा लक्षात घेऊन त्वरित शिंदखेडा तालुका दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करावा अशी येथील शेतकर्यांसह धवल दूध संकलनाचे प्रमुख माजी सरपंच हेमराज पाटील यांनी केली आहे.
120821\20210811_133657.jpg~120821\20210811_133641.jpg
मालपूर येथील विहिरींचा जलस्रोत घटल्याने गाठला तळ.~मालपूर येथील विहिरींनी गाठला तळ