लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू केली असली तरी शेतकऱ्यांना शेतीमाल विक्री करता यावा म्हणून दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवारपासुन पुन्हा सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी आठशे क्विंटल गव्हाची विक्रमी आवक झाली.गेले तीन दिवस बाजार समिती बंद होती. त्यामुळे नंदुरबार चौफुली ते बस स्टॅन्ड गेटपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ कोरोना विषाणूची भीती असली तरी बळीराजा शेतीमाल विक्रीसाठी आला होता़ बंदीच्या काळात उदरनिर्वाहासाठी पैसा महत्वाचा असल्याने गर्दी होती.बाजार समिती चेअरमन नारायण पाटील यांनी स्वत: हजर राहून लिलाव, मोजमाप, आर्थिक व्यवहार या गोष्टींवर लक्ष ठेवले़ सचिव पंडित पाटील, विजय पाटील व कर्मचारी मदत करीत होते.मंगळवारी बाजार समितीत सुमारे ८०० क्विंटल गव्हाची आवक झाली. गव्हाला १५०० ते २१०० आणि सरासरी १८०० रुपये भाव मिळाला़ मक्याची २०० क्विंटल आवक झाली. त्याला १३०१ ते १३५० रुपये भाव मिळाला. तर सरासरी भाव १३२५ रुपये होता. लिलाव झाल्यानंतर मोजणी लगेच होते. शेतीमालास शक्यतोवर रोखिने, काही वेळेस धनादेशाने पैसे वटविले जात आहेत. त्या मुळेही गर्दी झाल्याचे सांगण्यात आले. शेतीमालास चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे़
दोंडाईचात गव्हाला १८०० भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 13:13 IST