संततधार पावसाने विहिरी तुडूंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 14:04 IST2019-10-25T14:03:58+5:302019-10-25T14:04:34+5:30
कापडणे परिसर : नदी, नाले ओसंडून वाहिले, रब्बी हंगामाला सुरुवात

dhule
कापडणे : धुळे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात सलग तीन ते चार वर्षांपासून कमी पाऊस होत असल्याने कोरडा दुष्काळ पडत होता. यामुळे शेती पीक उत्पादनात मोठी घट येऊन शेतकरी कर्जबाजारी झाला होता. मात्र, यावर्षी खरीप हंगामात आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात सलग दोन ते अडीच महिने नियमित पाऊस सुरू असल्याने कापडणे गावातील विहिरी, नदी-नाले, केटीवेअर बंधारे, शेततळे पाण्याने तुडुंब भरून ओसंडून वाहत आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने रब्बी हंगामाला सुरुवात केली आहे.
कापडणे गावासह पंचक्रोशीत सलग तीन ते चार वर्षांपासून पर्जन्यवृष्टी तुरळक होत असल्याने कोरडा दुष्काळ पडत आहे. सर्वत्र विहिरी कूपनलिका उन्हाळ्यात कोरड्या ठणठणाट राहत होत्या. मात्र आता यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे येथील सर्वत्र विहिरी कूपनलिकांची पाण्याची पातळी खूपच वर आल्याने याचा फायदा सर्वत्र शेतकऱ्यांना शेती बागायत करण्यासाठी होणार आहे, तसेच संपूर्ण कापडणे ग्रामस्थांचे पाणीटंचाईचे हाल कमी होणार आहेत.
सोनवद प्रकल्पाची पाटचारी देखील तब्बल दोन महिन्यापासून वाहत असल्याने यामुळे गावातील सर्वत्र विहिरी व कूपनलिकांची पाण्याची पातळी वाढून जमिनीपासून केवळ दहा ते १२ फूट अंतरावरच विहिरींना पाणी आलेले आहे.
गाव इतिहासात पहिल्यांदाच पाणीटंचाईच्या काळात यंदाच्या उन्हाळ्यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने टँकरद्वारे गावाला दररोज पाणीपुरवठा करण्यात आला होता.
नळांना देखील ४० ते ४५ दिवसानंतर पाणी येत होते. मात्र पाणीटंचाईच्या काळात पाण्याचे मोल काय असते, ही गोष्ट सर्वांच्या स्मरणात राहून गेली आहे. आता मात्र समाधानकारक पाऊस झाल्यामुळे सर्वत्र टंचाईचा प्रश्न दूर झाला आहे.
दरम्यान, पुन्हा परिसरात दोन-तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु असल्याने जलपातळीत वाढ झालेली आहे. गावातील पाणीपुरवठा करणारी विहीर जमिनीपासून पाच फुट वरपर्यंत पाण्याने तुडूंब भरली आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.