स्त्री जन्माचे स्वागत, शिक्षिकांचा केला सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 11:58 IST2020-03-09T11:57:58+5:302020-03-09T11:58:38+5:30

जागतिक महिला दिन साजरा : विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थांनी केले आयोजन, महिला पोलिसांना केला सन्मान

Welcome to the birth of a woman, respect for teachers | स्त्री जन्माचे स्वागत, शिक्षिकांचा केला सत्कार

dhule


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटनांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात स्त्री जन्माचे स्वागत करण्यात आले. शिक्षिकांचा सत्कार तर महिला पोलिस कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. एकंदरीत सर्वांनीच महिला दिनानिमित्त कृतज्ञता व्यक्त केली.
आदर्श शिक्षिकांचा सत्कार
महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना व पुरोगामी महिला मंच धुळे जिल्हा शाखेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आदर्श शिक्षिका, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मंजुळा गावीत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन डायटच्या प्राचार्या डॉ.विद्या पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी मनिष पवार उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून अभिनेत्री प्रिया तुळजापुरकर उपस्थित होत्या. यावेळी डॉ.संपदा कुलकर्णी यांनी स्त्रियांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. नमिता पाटील यांचे व्याख्यान झाले. यावेळी आमदार मंजुळा गावीत, डॉ.विद्या पाटील, मनिष पवार, अभिनेत्री प्रिया तुळजापूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिता चौधरी यांनी केले. प्रास्ताविक महिला जिल्हाध्यक्ष दिपा मोरे यांनी केले. पुरस्कार्र्थींची घोषणा महिला कार्याध्यक्षा सुरेखा बोरसे यांनी केली.
त्यात ज्ञानज्योती पुरस्कार जयश्री वसंत बोरसे (निकुंभे), वैशाली कैलास शिंदे (शिंदखेडा), कल्पना भाईदास निकम (अर्थे), कुसुम आेंकार चौधरी (विखरण देवाचे), स्मिता शिवाजी पाटील (मुकटी), साधना गिरधर खैरनार (सैय्यदनगर, साक्री), उषा दयाराम पाटील (बल्हाणे), शिक्षण गौरव पुरस्कार- शिक्षण विस्तार अधिारी रत्नप्रभा दंडगव्हाळ (कुसुंबा), देवयानी वाघ, केंद्रप्रमुख विद्या शालीकराव पाटील (वाडी), निर्मला दंगल कदम (नेर), विद्या अमृत पवार (वाघाडी), छाया भिमराव खैरनार (मेहेरगाव), बेबी बन्सीलाल अहिरे (नागझिरी, साक्री) यांचा समावेश आहे.
यावेळी संघटनेचे राज्य प्रमुख संघटक भुपेश वाघ, राज्य कोषाध्यक्ष रुखमा पाटील, जिल्हाध्यक्ष उमराव बोरसे, दिपा मोरे, प्रतिभा वाघ, सुरेखा बोरसे, रंजना राठोड, प्रशांत महाले, रविंद्र देवरे, प्रभाकर चौधरी आदी उपस्थित होते. आभार प्रदर्शन संघटक मिरा परोडवाड यांनी मानले.
जिजाऊ ब्रिगेडतर्फे
रक्त तपासणी शिबिर
जिजाऊ ब्रिगेड व थायरोकेअर कलेक्शन सेंटरतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांची थॉयराईड फंक्शन तपासणी शाकंभरी हॉस्पिटल येथे करण्यात आली. ३६८ महिलांची तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ.घुमरे, जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्षा डॉ.पूजा भामरे, जिल्हाध्यक्ष नूतन पाटील, डॉ.सुलभा कुवर, चंद्रकला पाटील, डॉ.उषा साळुंके, सीमा वाघ, यशश्री वाघ, संजय खैरनार, थायरो केअर सेंटरचे प्रमुख डॉ.संजय सिंग, पुनम सिंग, आणि रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
जैन सोशल ग्रुप प्लॅटिनम
धुळे- जैन सोशल ग्रुप प्लॅटिनमतर्फे विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा गौरव केला. यावेळी धुळे शहर पोलीस स्टेशनच्या पीएसआय विजया पवार यांच्यासह चार महिला कॉन्स्टेबलचा गौरव करण्यात आला. तसेच महिला वाहतूक पोलीस, एस. टी. महिला वाहक, पाला बाजार येथील विक्रेत्या, बारापथ्थर चौकातील पेट्रोलपंपवर कार्यरत महिला, हॉस्पिटलमधील नर्स व अपंग महिला टेलरचा गौरव करण्यात आला.याप्रसंगी जैन सोशल ग्रुप प्लॅटिनमच्या कोशाली सुराणा, अरुणा भन्साली, सोनल बरडीया, चंदना कुचेरिया, राखी पोखरणा, संगीता मुथा, ज्योती जैन, सुनीता मुथा, वैशाली बोरा उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी अध्यक्ष राजेंद्र सिसोदिया, कल्पना सिसोदिया, दिलीप कुचेरिया, चारूल सुराणा यांचे सहकार्य लाभले.
वर्शीत महिलांना साड्यांचे वाटप
येथे जागतिक महिला दिन व चाँदशावाजी बाबा दर्ग्याच्या ऊर्सनिमित्त गरजू १८५ महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. व्यारा जि.सुरत येथील दीपक भावसार व मंडळाने हा कार्यक्रम घेतला. रात्री कव्वालीचा कार्यक्रम झाला. सूत्रसंचलन यशवंत निकवाडे यांनी केले.
नेर येथे दिव्यांग महिलेचा सन्मान
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गावातील दिव्यांग महिला आशाबाई नारायण बाविस्कर यांचा सरपंच शंकरराव खलाणे यांनी शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि साडी देऊन सत्कार केला.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य नामदेव बोरसे, देविदास माळी, सामाजिक कार्यकर्ते वसंत बोरसे, संजय बोरसे, भिमराव माळी, नितीन माळी, प्रशांत खलाणे, राकेश जाधव, उमाकांत खलाणे, भटु अहिरे, दिनेश अहिरे, सतीश भागवत, जितेंद्र देवरे, राकेश अहिरे, हेमंत बाविस्कर, दिपक खलाणे, महेंद्र बाविस्कर व महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आशाबाई बाविस्कर या जन्मत: दिव्यांग असूनही त्या शिवणकाम करून उदरनिर्वाह करतात.
पिंपळनेरला महिलांचा सत्कार
शीतल अकॅडमीतर्फे विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी सुनंदा सोमनाथ कोठावदे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्या सुधामती विजय गांगुर्डे उपस्थित होत्या. याप्रसंगी योगिता नेरकर, पल्लवी बोरसे, दिपाली दळवेलकर, शुभांगी कोतकर, वैशाली पगारे आदी उपस्थित होत्या. यावेळी महिला सक्षमीकरण या विषयावर शिक्षिका दिपाली दळवेलकर व डॉ.शुभांगी कोतकर यांनी विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणिता कोठावदे व अस्मिता पोतदार यांनी केले. आभार शीतल अकॅडमीचे संस्थापक संचालक वाल्मिक पाटील यांनी केले.
सह्याद्री बहुउद्देशीय संस्था
पिंपळनेर- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील राजे छत्रपती स्कूलमध्ये सह्याद्री शैक्षणिक सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेमार्फत महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार मंजुळा गावित यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रसुती संजीवनी समजल्या जाणाºया समाजसेविका वजीरा खाला, राजे छत्रपती मार्शल आर्टस इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका सोनाली पाटील, पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल पल्लवी पाटील आदी महिलांचा सन्मान करण्यात आला.
पोलीस कॉन्स्टेबल पल्लवी पाटील म्हणाल्या, संसाराचा गाडा ओढत समाजात विशेष काही करून दाखविण्याचे धैर्य महिलांमध्ये आहे आणि यासाठी ती काम करत असते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष युनूस तांबोळी, सचिव सईद शेख, झाकीर शेख, साकीब सय्यद, आसिब शेख, संभाजी अहिरराव, हाजी जावेद, दिलीप चौरे, बाबा शेख, अय्युब शहा, मनोज शिरसाठ, दयानंद महाले आदी उपस्थित होते.

होळ येथे विविध कार्यक्रम
शिंदखेडा- होळ येथील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळा नं १ आणि जि.प. शाळा नं. २ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
अध्यक्षस्थानी जि.प.सदस्या संजीवनी सिसोदे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून पं.स. सदस्या चित्रकला रविंद्र भिल, उपसरपंच भटू पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमास गावातील आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. शाळेतील मुलींनी इंदिरा गांधी, अहिल्यादेवी होळकर, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, अंतराळवीर कल्पना चावला, सायना नेहवाल, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, वकील, डॉक्टर, मिस युनिवर्स, आदर्श गृहिणी, गायिका लता मंगेशकर, मीडिया निवेदक अशा विविध वेशभूषा करुन स्पर्धेत सहभाग नोंदविला. यावेळी जि.प. सदस्या सिसोदे यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर बक्षीस वितरण झाले. कार्यक्रमासाठी जि.प.शाळा नं.१ चे मुख्याध्यापक राजू पाटील, प्रशांत मोरे, कल्पना दशपुते, सतीश भुजबळ, प्रतिभा पाटील, जि.प. शाळा नं.२ चे मुख्याध्यापक सुनील खैरनार, उपशिक्षक विकास पाटील यांनी परिश्रम घेतले.
निजामपूर पोलीस स्टेशन
निजामपूर- येथील आदर्श विद्या मंदिरातील विद्यार्थिनींनी निजामपूर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस ठाण्याच्या कामकाजाची माहिती घेतली. यावेळी पीएसआय जीजोट व महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. हे.कॉ. जी.पी. बागुल यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षिका नम्रता बागले, योगिता भट, दामिनी पंडित, लीना भदाणे, भारती अहिरे, शेंडे आदी उपस्थित होत्या.
लुपिन फाऊंडेशनचा हातनूर येथे उपक्रम
शिंदखेडा- लुपिन फाऊंडेशन धुळेअंतर्गत बीसीआय प्रकल्पाच्या माध्यमातून हातनुर येथे महिला दिवस साजरा झाला. याप्रसंगी जिल्हा प्रकल्प समन्वयक सुनिल सैंदाणे, जिल्हा प्रकल्प अधिकारी निता पाटील उपस्थित होते. हातनुरचे सरपंच, उपसरपंच दीपक जगताप, पोलीस पाटील, बचतगटाच्या महिला उपस्थित होते. यावेळी महिलांचा सत्कार करण्यात आला. व्यवस्थापक चेतन बोरसे यांनी प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र गिरासे यांनी केले. यावेळी विनोद पवार, गजानन पाटील, प्रमोद वाल्हे, राहुल पाटील, भूषण पाटील, प्रितम पाटील उपस्थित होते.

Web Title: Welcome to the birth of a woman, respect for teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे