विद्यार्थ्यांनी भरवला आठवडेबाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 12:53 IST2020-02-01T12:50:32+5:302020-02-01T12:53:19+5:30
कोकणगाव जि.प. शाळा : परसबागेतून पिकविलेल्या विविध भाजीपाला, फळ विक्रीचे लावले स्टॉल

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळनेर : साक्री तालुक्यातील कोकणगाव जिल्हा परिषदेच्या आवारातील परसबागेत फुलविण्यात आलेल्या भाजीपाल्याचा आठवडे बाजार विद्यार्थ्यांनी भरविला होता. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवहारिक ज्ञान मिळावे या उद्देशाने हा आठवडे बाजार व बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या बाल आनंद मेळाव्याचे व परसबागेतून निर्मित बाजाराचे उद्घाटन साक्रीचे गटशिक्षणाधिकारी राजेंद्र पगारे यांच्या हस्ते झाले.या मेळाव्याचे वैशिष्ठ्य म्हणजे हमारी शक्ती प्लास्टिक मुक्ती, प्लास्टिक कागद हटवू या वसुंधरेला वाचवू या, प्लास्टिक म्हणजे अनर्थ मोठा, प्लास्टिकमुळे तोटाच तोटा अशा घोषवाक्यांद्वारे प्रबोधन करण्यात आले.
कोकणगाव शाळेचे मुख्याध्यापक व उपक्रमशील शिक्षक श्रीकांत दिलीप अहिरे यांच्या संकल्पनेतून या बालआनंद मेळाव्याचे व परसबागेतून बाजाराचे आयोजन करण्यात आले.
मेळाव्यात खाऊगल्ली, मनोरंजक खेळ, परसबागेतील पिकविण्यात आलेला भाजीपाला, फळे विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. त्याचप्रमाणे कार्यानुभव साहित्य, शैक्षणिक साहित्य, रांगोळी प्रदर्शन, हस्तकला इत्यादी स्टॉल लावण्यात आले होते. मेळाव्यात एकूण १७ स्टॉल लावण्यात आले होते. यात तीन शाळांच्या ३७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. आठवडे बाजारातून विद्यार्थ्यांचे व्यवहार ज्ञान विकसीत व्हावे असा यामागील उद्देश होता.यावेळी साक्री तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आर.व्ही.पगारे म्हणाले, शिक्षण म्हणजे केवळ ज्ञानाचा व्यवहार नसून व्यवहाराचे ज्ञान आहे. पुस्तके ज्ञानासोबत विद्यार्थ्यांना जीवन शिक्षण देणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळाच मुलांचा सर्वांगीण विकास करत आहेत. फक्त परीक्षा केंद्री अभ्यास न करता ज्ञानरचनावादानुरुप मुलांना कृतीशील बनवणाºया उपक्रमशील शिक्षकांमुळे आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थी उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.गुणवत्तापूर्ण अध्यापनासोबत व्यवसाय शिक्षण देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माध्यमिक गटशिक्षणाधिकारी पगारे यांनी केले. जि.प.कोकणगाव शाळेने राबवलेल्या विद्यार्थी हितावह उपक्रमाचा आदर्श घेण्यासारखा आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपळनेर बिटच्या शिक्षण विस्ताराधिकारी देवयानी वाघ उपस्थित होत्या. शिक्षण विस्ताराधिकारी व्ही.व्ही. पवार, सी.एस. अहिरे, रोहिणी नांद्रे आदी उपस्थित होते. तसेच बल्हाणे केंद्राचे केंद्रप्रमुख एस.जे. चव्हाण इतर केंद्रांचे केंद्रप्रमुख शिरीष कुवर, वा.रा. सोनवणे, डाएटचे अधिव्याख्याता विरेंद्र सूर्यवंशी, राहुल ठाकरे, बल्हाणे केंद्रातील ज्येष्ठ शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी पगारे व शिक्षणविस्ताराधिकरी वाघ यांच्या हस्ते शाळेत वृक्षरोपण करण्यात आले. मुख्यध्यापक दिलीप काशिद व श्रीकांत अहिरे यांनी शाळेला दोन पाणी जार सप्रेम भेट दिले. सदर कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन मुख्याध्यापक अहिरे, सहकारी शिक्षक चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन संभाजी गणेश आंधळे यांनी केले तर कोकणगाव शाळेचे शिक्षक अशोक वामन चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.