पर्यटकांना खुणावताय सातपुड्यातील धबधबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 12:58 IST2020-07-23T12:57:45+5:302020-07-23T12:58:58+5:30
कोरोनाने रोजगार हिरावला : शिरपूरचे ‘महाबळेश्वर’ हिरवाईने नटले मात्र, यंदा व्यावसायिकांची निराशा

पर्यटकांना खुणावताय सातपुड्यातील धबधबे
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : महाराष्ट्रातील पर्यटन स्थळात महाबळेश्वर, पाचगणी ही स्थळे आघाडीवर आहेत़ असे असले तरी खान्देशातील शिरपूर परिसर निसर्ग सौंदर्याच्याबाबतीत ‘महाबळेश्वर’ सारखाच आहे़ पर्यटनाच्या दृष्टिकोनातून शिरपूर परिसरात अनेक निसर्ग सौंदर्याने नटलेली स्थळे आहेत़ पर्यटनाच्या जागतिक नकाशावर शिरपूर पोहचले आहे़ शिरपूर परिसरातील निसर्ग सौंदर्य लाभलेल्या विविध स्थळांची विकास कामे हाती घेण्यात आली आहे़ मात्र, यंदा कोरोनामुळे निसर्गाच्या नवलाईने नटलेला हा धबधबा पर्यटकांअभावी सुनासुना झाला आहे़ कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पर्यटनावर बंदी असल्याने पर्यटनावर आधारित असणाऱ्या शेकडो आदिवासी सुशिक्षित बेरोजगार तरूणांचा व्यवसायही बुडाला आहे़
पावसाळा सुरू झाल्यानंतर निसर्ग कात टाकतो़ सर्व परिसर हिरवागार होतो़ सातपुड्यातील छोटे-मोठे धबधबे कोसळण्यास सुरूवात होत असते़ सातपुड्याच्या पर्वत रांगा ओल्याचिंब होतात़ परिसरातून वाहणारे ओढे नाले यात भर घालतात़ निसर्गाचा हा मनोहारी आविष्कार डोळ्यात साठविण्यासाठी आणि मनमुरादपणे आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले या परिसराकडे वळतात़ कोकण किंवा तोरणमाळ सारख्या ठिकाणी असणारे निसर्गरम्य वातावरण व हिरवळीने शालू पांघरलेल्या डोंगरांमध्ये, खळखळून वाहणारा पांढरा शुभ्र बोराडी गावाजवळील नवादेवी येथील धबधबा आहे.
शिरपूरपासून साधारण ३३ किमी अंतरावर कोडीद गाव असून तेथून ४ किमी अंतरावर अनेक वळण घेत, दुर्गम भागात नवादेवी नावाचा छोटा आदिवासी पाडा आहे. येथे नवादेवीचे अतिशय सुरेख मंदिर आहे. नवादेवी मंदिरात देवीची मुर्ती आहे. मंदीरावर नाग, त्रिशुलच्या प्रतिकृती काढल्या आहेत. पूर्वीपासून येथे आदिवासी बांधव नवस फेडण्यासाठी येतात. या मंदिराजवळच धबधबा आहे. या धबधब्याची उंची सरासरी ४० फुट आहे़ आजूबाजूला उंच डोंगर आहेत. जंगलातून वेगाने पाणी येते. खळखळून खाली पांढराशुभ्र पाणी खाली येतानाचे दृश्य अतिशय रमणीय आहे. पाण्याचा तीरकस उतार असल्यामुळे चांगला आनंद घेता येतो. कोडीद येथे पुरातन महादेव मंदीर व किल्ल्याचे अवशेष आहेत. बोराडी गावाजवळ ब्रिटिशकालीन तोफ व बंगला आहे.
धाबादेवी येथे प्राचीन मंदीर
धाबादेवी येथे सुमारे सातव्या शतकातील प्राचीन मंदिर आहे. येथे देवदेवतांच्या मुर्ती व दोन लहान धबधबे आहेत. म्हणजे पर्यटकांना एका दिवसात या सर्व पर्यटन स्थळांना भेट देता येते. या सर्व स्थळांचा विकास झाला तर लोकांचे पर्यटन होईल व या भागात लोकांना रोजगार मिळून विकासासाठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे़
शिरपूरचे ‘महाबळेश्वर’ म्हणून ओळखले जाणारे सातपुड्याच्या पायथ्याशी नागेश्वर बंगला येथील परिसर निसर्ग सौंदर्याने खुलून गेला आहे़ हिरवीगार गर्द, झाडी, हिरवा शालू पांघरलेले गर्भगिरीचे डोंगर, पर्यटन विकास केंद्र, सातपुडाचा डोंगर, नागेश्वर मंदिर या सर्वांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक कुटुंबियासोबत वन डे पिकनिक म्हणून या परिसरात गर्दी करतात़ शिरपूर शहरात विविध स्थळे पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहेत़ सातपुड्याच्या टेकडीवर निसर्गरम्य परिसरात श्री नागेश्वर देवस्थान आहे. सातपुड्यातील निसर्गरम्य परिसरात असलेल्या चोपडा मार्गावरील अजनाड बंगला गावाजवळ जागृत क्षेत्र नागेश्वर आहे़
शिरपूर शहर प्रामुख्याने धार्मिक क्षेत्रात राज्यात प्रचलित झाले ते येथील प्रति तिरूपती बालाजी मंदिरामुळे. एवढेच काय या शहरात दोन बालाजी मंदिरे व दोन रथयात्रा निघतात. हे या शहराचे खास वैशिष्ट म्हणावे लागेल. तालुक्याच्या सरहद्दीवर सातपुड्याच्या टेकडीवर मॉ बिजासनी मातेचे मंदिर असून हे मंदिर श्रध्दास्थानाबरोबरच एक निसर्गरम्य परिसरात असल्याने ते एक पर्यटनाचे केंद्र बनले आहे. याच मंदिराच्या पाठीमागे मूळ बिजासनी मंदिर दुर्बड्या येथील डोंगरावर आहे.