सोनगीरकरांची ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2017 18:07 IST2017-07-07T18:07:55+5:302017-07-07T18:07:55+5:30
11 दिवसाआड पाणीपुरवठा; जामफळ धरणात पाण्याचा ठणठणाट

सोनगीरकरांची ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती
ऑनलाईन लोकमत
सोनगीर,दि.7 - गावाला पाणी पुरवठा करणा:या जामफळ धरण पूर्णत: कोरडठाक पडल्याने ऐन पावसाळ्यात सोनगीर गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गावाला पाणी पुरवठा करणा:या विहिरींमध्ये जेमतेम पाणीसाठय़ातून गावात 11 दिवसाआड पाणी सोडण्यात येत असून पाणी टंचाईमुळे ग्रामस्थांना भटकंती करावी लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे
सोनगीर गावातील ग्रामस्थांना फेब्रुवारी महिन्यापासून पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे. सोनगीर गावापासून चार कि.मी. अंतरावर शिंदखेडा तालुक्यात जामफळ धरण आहे. या धरणातून गावाला पाणीपुरवठा करणा:या विहिरींमध्ये पाणी सोडण्यात येते. त्यानंतर या विहिरीतून गावात पाणी सोडण्यात येते. मात्र, सद्य:स्थितीत जामफळ धरणात पाण्याचा ठणठणाट आहे. सोनगीर गावातील पाझर तलाव व इतर बंधारेही पावसाअभावी कोरडठाक पडली आहेत. त्यामुळेच गावात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
गावात तब्बल अकरा दिवसाआड पाणी पुरवठा सुरू असल्याने अनेक ग्रामस्थ खाजगी टॅँकरने पाणी मागवत आहेत. गावातील अनेक कुटुंबात सदस्यांची संख्या जास्त असल्याने घरात साठवून ठेवलेला पाणी साठा अकरा दिवस पुरविणे शक्य नसल्याने खाजगी टॅँकर मागवावे लागत आहे. कपडे धुण्यासाठीही गावातील प्रसिद्ध गोडविहिरीवर महिलांची गर्दी होत आहे. ग्रामस्थांना खाजगी टॅँकरसाठी 800 ते 1200 रुपये येत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.