धुळे जिल्ह्यात नावीन्यपूर्ण योजना राबविण्यासाठी मंजुरीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 04:52 PM2018-05-20T16:52:32+5:302018-05-20T16:52:32+5:30

जिल्हा परिषद : पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला; पशुपालकांना मिळणार प्रोत्साहन

Waiting for approval to implement innovation in Dhule district | धुळे जिल्ह्यात नावीन्यपूर्ण योजना राबविण्यासाठी मंजुरीची प्रतीक्षा

धुळे जिल्ह्यात नावीन्यपूर्ण योजना राबविण्यासाठी मंजुरीची प्रतीक्षा

Next
ठळक मुद्देशेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालनावर भर दिला जातो. शेतकºयांना पशुधन संगोपनासाठी प्रेरणा मिळावी; या उद्देशाने आदर्श पशुपालक पुरस्कार योजनाही यंदापासून सुरू करण्यात येणार आहे.आदर्श पशुपालन करणा-या शेतक-यांची निवड करुन त्यांचा गौरव केला जाणार आहे. ही निवडही जि.प. अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवड समितीमार्फत केली जाणार आहे. मात्र, आता या तिन्ही योजना राबविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तांची मंजुरीची गरज लागणार आयुक्तांची मंजुरी मिळाल्यानंतर या योजना जिल्ह्यात राबविण्यात येतील, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे  : जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन विभागातर्फे पशुपालक उन्नती योजना, पशुसंजीवनी अ‍ॅप व आदर्श पशुपालक पुरस्कार अशा नावीन्यपूर्ण योजना राबविण्यात येणार आहे.  या योजना राबविण्यासाठी मंजुरी मिळावी; यासाठी पशुसंवर्धन विभागाने पुणेस्थीत पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाकडे दोन महिन्यापूर्वीच प्रस्ताव पाठविला असून अद्याप त्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. मात्र, या योजनांना  जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती व विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली आहे. पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाच्या मंजुरीनंतरच जिल्ह्यात या योजना राबविण्यात येतील. 
दुग्धोत्पादनात वाढ होणार 
पशुपालक उन्नती योजना, पशुसंजीवनी अ‍ॅप व आदर्श पशुपालक पुरस्कार या माध्यमातून जिल्ह्यातील पशुपालकांना प्रोत्साहन मिळणार आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात या योजना राबविण्याचा पशुसंधर्वन विभागाचा मानस आहे. पशुपालकांना प्रोत्साहानासोबत दुग्धोत्पादनातही वाढ होण्यासाठीचे नियोजन या योजनांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. सन २०१७-२०१८ या कालावधीत पशुपालक उन्नती योजनेंतर्गत मिल्किंग मशीन वाटप, खवा मशीन व पॅकिंग मशीन पुरवठा केला जाणार आहे.
लाभार्थ्याची निवड करण्यासाठी समिती गठीत 
पशुपालक उन्नती योजनेंतर्गत मिल्किंग मशीन, खवा मशीन व पॅकिंग मशीनसाठी ८० टक्के शासकीय अनुदान दिले जाणार आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्याची निवड करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष जि.प. अध्यक्ष ेआहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती  सदस्यांमध्ये जिल्हा परिषदेत कार्यरत अधिकारी व तसेच सेवाभावी संस्थाचे प्रतिनिधी व पत्रकार असणार आहे. लाभार्थी निवडीसाठी पशुपालक हा ग्रामीण भागातील असणे गरजेचे आहे. पशुपालकांकडे किमान ५ ते १० संकरीत गायी किंवा म्हशी असणे आवश्यक आहे.  ८० टक्के अनुदान लाभार्थींना मिळणार असले, उर्वरित २० टक्के हिस्सा हा लाभार्थींना द्यावा लागणार आहे.  लाभार्थींना मिळणारे मशीन किमान तीन वर्ष वापरावे लागणार आहे. असे निकष ठरवून देण्यात आले आहे.  त्यानुसार लाभार्थींची निवड करताना समितीमार्फत गुणांकन ठरवून लाभार्थी निश्चित केले जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 


एका क्लिकवर मिळणार पशुपालकांना माहिती; तक्रारींचाही निपटारा करता येणार 
पशुसंवर्धन विभागातर्फे ‘पशुसंजीवनी अ‍ॅप’ तयार केले जाणार आहे. या अ‍ॅपमुळे पशुपालकांची गैरसोय टळणार आहे. या अ‍ॅपमुळे पशुपालकांना जिल्ह्यात असलेली पशुवैद्यकीय दवाखाने, गावनिहाय पशुधनाची संख्या, पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना लसीकरणाचे वेळापत्रक, तज्ज्ञांचा मार्गदर्शक सल्ला, पशुसंवर्धन विभागच्या सेवा व सुविधा, पशुसंवर्धन विभागाचे कार्यमोहीम वेळापत्रक, प्रशिक्षण कार्यक्रम आदी बाबी एका क्लिकवर कळणार आहेत. या अ‍ॅप्समुळे पशुपालकांना त्यांच्या तक्रारीही पशुसंवर्धन विभागापर्यंत पोहचवता येणार आहेत. या अ‍ॅप्सची रचना?, त्यात नेमके काय फिचर्स असतील, याचा आराखडा पशुसंवर्धन विभागाने तयार करून ठेवला असून हे अ‍ॅप्स तयार करण्यासाठी ठेका दिला जाणार आहे. 

Web Title: Waiting for approval to implement innovation in Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे