वडजाईला संतप्त ग्रामस्थांचा महिला ग्रामसेविकेला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 12:47 IST2020-06-12T12:46:58+5:302020-06-12T12:47:48+5:30

धुळे तालुका : वडजाई येथे भूमीगत गटार तुंबल्याने पाणी रस्त्यावर

Wadjai angry villagers surround female gram sevike | वडजाईला संतप्त ग्रामस्थांचा महिला ग्रामसेविकेला घेराव

dhule


लोकमत न्यूज नेटवर्क
वडजाई ता.धुळे : गावातील आदिवासी वस्तीतील तुंबलेल्या भुमीगत गटारीचे रस्त्यावरुन वाहू लागले आहे. घाण पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून त्यामुळे परिसरात साथीचे आजार पसरण्याची भीती असल्याने गुरुवारी संतप्त ग्रामस्थांनी महिला ग्रामसेविकेला घेराव घातला.
गावातील आदिवासी वस्तीतील भूमीगत गटार तुंबल्यामुळे त्याचे पाणी रस्त्यावरुन वाहते तसेच परिसरात ठिकठिकाणी घाण पाण्याचे डबके साचले आहे. साचलेल्या घाण पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होत आहे. त्यातून डेंग्यू सारखे साथीचे आजार पसरण्याची भीती आहे. यासंदर्भात वारंवार तक्रार करुनही लक्ष दिले जात नसल्याने संतप्त ग्रामस्थ गुरुवारी ग्रामपंचायतीवर पोहचले. त्यांनी ग्रामसेविका सारिका परदेशी यांना घेराव घातला. तसेच गटार तुंबल्याने निर्माण झालेली परिस्थिती पाहण्यासाठी आदिवासी वस्तीमध्ये यावे, अशी मागणी केली. तेव्हा ग्रामसेविका त्याठिकाणी गेल्या.
गावातील आदिवासी वस्तीमध्ये ठक्कर बाप्पा योजनेतून १२ लाख रुपये खर्चुन भुमिगत गटार बनविण्यात आली आहे. मात्र गटारीच्या पाईपलाईनचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. तसेच गटारीचे चेंबरसुद्धा चुकीचे बनविण्यात आले आहे. त्यामुळे गटारीतील पाण्याचा निचराबरोबर होत नसल्याने चेंबरमधून पाणी वाहत नाही ते तेथेच तुंबते. चेंबरचे पाणी रस्त्यावरुन वाहते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. तसेच ठिकठिकाणी घाण पाण्याचे डबके साचले आहेत. आदिवसी वस्तीतील घरासमोरील अंगणात पाणी तुंबता असल्यामुळे डबके साचून दुर्गंधी येत असते. या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होत असून त्यातून गावात डेंग्यू,थंडी ताप यासारखे साथीचे आजारांना ग्रामस्थांना तोंड दयावे लागत आहे. अगोदरच मनात कोरोनाची भिती आहे. त्यामुळे संतप्त आदिवासी महिला व पुरुष यांनी ग्रामपंचायत कार्यालयावर गुरुवारी सकाळी धडक मारली व तेथे ग्रामसेविका सारिका परदेशी यांना थेट आदिवासी वस्तीमध्ये घेऊन गेले. ग्रामसेविका यांनी परिसराची पाहणी केल्यानंतर भूमीगत गटार दुरुस्तीचे काम लगेच करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मोठ्यासंख्येने परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Wadjai angry villagers surround female gram sevike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे