Voting in Sakri and Dhule Rural till 5 pm | साक्री व धुळे ग्रामीणमध्ये रात्री ८ वाजेपर्यंत मतदान

dhule

धुळे : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात सोमवारी काही किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान झाले. शिरपूर मतदारसंघात सर्वाधिक ७० टक्के तर धुळे शहरात सर्वात कमी ५०.२० टक्के मतदान झाले आहे. साक्री तालुक्यातील बोडकीखडी येथे रात्री साडे सात वाजेपर्यंत तर धुळे ग्रामीण मध्ये कापडणे आणि तिसगाव ढंढाणे येथे रात्री आठ वाजेपर्यंत मतदान झाले. एकूणच यंदा शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मतदानाचा टक्का वाढला.
जिल्ह्यात पाचही मतदारसंघात सोमवारी सकाळी सात वाजेपासून मतदानास सुरुवात झाली होती.
जिल्ह्यातील पाचपैकी सर्वाधिक मतदान शिरपूर मतदारसंघात ७० टक्के त्याखालोखाल धुळे ग्रामीणमध्ये ६४.२० टक्के, साक्रीत ६२.२० टक्के, शिंदखेडा ६२.२० टक्के तर सर्वात कमी मतदान धुळे शहर विधानसभा मतदारसंघात ५०.२० टक्के मतदान झाले.
धुळे शहरात ईव्हीएम बंद
धुळे शहर मतदारसंघातील भंगार बाजार, चितोड रोडवरील मनपा शाळेतील सकाळी काही काळ ईव्हीएम मशिन बंद पडले होते. त्यानंतर भंगार बाजार आणि चितोडरोडवरील मशिन सुमारे २० मिनिटांनी सुरु झाले.
फागणेत तासभर बंद
धुळे ग्रामीण मतदारसंघातील फागणे येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील मतदान केंद्रावर एका खोलीतील सकाळी दोन वेळा ईव्हीएम मशिन बदलण्यात आले. तर दुसऱ्या खोलीतील व्हीव्हीपॅड मशिन देखील बंद पडले होते.
वडजाई येथे दोन मशिन बदलले
धुळे ग्रामीण मतदार संघातील वडजाई येथील मतदान केंद्रावर मतदान सुरु झाल्यानंतर ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याने ते दोनदा बदलण्यात आले.दुसऱ्यांदा बदलल्यानंतर ते मशिन व्यवस्थित सुरु झाले होते.
सकाळी मतदान प्रक्रिया सुरु झाल्यानंतर दुपारपर्यंत धीम्या गतीने मतदान झाले. मात्र दुपारी एक वाजेनंतर मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली.
अनिल गोटेंचा आरोप
धुळे शहर मतदारसंघात दुपारी दीड वाजेच्या सुमारास माजी आमदार अनिल गोटे यांनी देवपुरातील नेहरु नगरात शनि मंदिर परिसरातील एका ठिकाणी कॉम्प्लेक्समध्ये पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला. तसेच स्वत: त्याठिकाणी भेट दिली. त्यानंतर डीवायएसपी सचिन हिरे देखील त्याठिकाणी आले. त्यांनी गोटे यांनी सांगितलेल्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून त्याठिकाणी ठेवलेली ५० हजाराची रोकड आणि बनावट पिस्तुल जप्त केले. ते त्यांनी तपासासाठी भरारी पथकाच्या ताब्यात दिले. तपासअंती ती बनावट पिस्तुल नसून लायटर असल्याचे पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी सांगितले. यासंदर्भात पोलिसात कुठलीही नोंद झालेली नव्हती.
धुळे ग्रामीण मतदारसंघात चुरस
धुळे ग्रामीण मतदारसंघात सरळ लढत असल्याने याठिकाणी मतदान केंद्रावर प्रचंड चुरस दिसून आली. मतदारसंघातील प्रमुख गावे कुसुंबा, बोरीस, लामकानी, कापडणे, शिरुड, न्याहळोद, फागणे, मुकटी, नेर, खेडे या ठिकाणी मतदान केंद्राबाहेर लावण्यात आलेल्या काँग्रेस आणि भाजपच्या बुथवर मोठी गर्दी दिसून आली. मतदान केंद्रावर जास्तीत जास्त मतदारांना पोहचविण्यासाठी काँग्रेस - भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड चुरस दिसून आली.
मुस्लिम भागात जास्त उत्साह
धुळे शहरातील मुस्लिम भागात जास्त उत्साह दिसून आला. सकाळपासून मुस्लिम परिसरातील मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्यात. शहरात देवपुरातील एल.एम.सरदार येथील मतदान केंद्रावर तर सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान सुरु होते.

Web Title: Voting in Sakri and Dhule Rural till 5 pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.