मतदारांनी मातब्बरांना दिला पराभवाचा धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 23:09 IST2021-01-18T23:09:13+5:302021-01-18T23:09:48+5:30
जिल्ह्यातील १८२ ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर, सर्वच पक्षांनी केेलेल्या दावे-प्रतिदाव्यांमुळे चुरस निर्माण झाली

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यातील १८२ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सोमवारी झाली. यात अनेक ठिकाणी मतदारांनी मातब्बरांच्या पॅनलला पराभवाचा धक्का देत सत्ता परिवर्तन घडवून आणले आहे. सर्वच पक्षांनी ग्रामपंचायतींवर दावे केल्याने, चुरस निर्माण झाली असून, आता सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष लागून राहिले आहे.
सोमवारी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ झाला. धुळे तालुक्यात भाजपाच्या अनेक मातब्बरांच्या पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला. नेर येथे भाजपचे सरपंच शंकरराव खलाणे, बोरीस ग्रामपंचायतीत भाजपचे नेते सुभाष देवरे, शिरूडमध्ये भाजपचे नेते गजानन पाटील यांच्या कालिका विकास पॅनलचा पराभव करीत काॅंग्रेसने सत्ता परिवर्तन घडवून आणले.
शिंदखेडा तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले. यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व असले तरी तालुक्यात भाजपने ५१ ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविल्याचा दावा करण्यात येत आहे. तर कॅांग्रेस १७, शिवसेना १०, व राष्ट्रवादीने ११ जागा मिळविल्याचा दावा करण्यात येत आहे.
शिरपूर तालुक्यातील ३४ पैकी ६ ग्रामपंचायतीं माघारीपूर्वीच बिनविरोध झाल्याने, २८ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशीराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने आपले वर्चस्व कायम राखले आहे. मात्र राष्ट्रवादीनेही नऊ जागा जिंकल्याचा दावा केलेला आहे.
साक्री तालुक्यात ग्रामपंचायतीचे निकाल संमिश्र लागले आहेत. साक्री तालुक्यातील मालपूर ग्रामपंचायत निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री डाॅ. सुभाष भामरे यांचे बंधू भाजपचे प्रांतिक सदस्य सुरेश रामराव पाटील यांनी ११ पैकी ८ जागांवर विजय मिळवीत पुन्हा सत्ता काबीज केली. तालुक्यातील आदिवासी पट्यात कॅांग्रेसने आपले वर्चस्व कायम राखल्याचा दावा करण्यात आलेला आहे.