सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल मंदिर बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:24 IST2021-07-20T04:24:35+5:302021-07-20T04:24:35+5:30
आषाढी एकादशीचे औचित्य साधून दरवर्षी मालेगाव रोडवरील दसेरा मैदानजवळ असलेल्या विठ्ठल मंदिरात पूजाअर्चेसह छोटेखानी यात्राच भरते. त्यामुळे शहरासह पंचक्रोशीतून ...

सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल मंदिर बंदच
आषाढी एकादशीचे औचित्य साधून दरवर्षी मालेगाव रोडवरील दसेरा मैदानजवळ असलेल्या विठ्ठल मंदिरात पूजाअर्चेसह छोटेखानी यात्राच भरते. त्यामुळे शहरासह पंचक्रोशीतून हजारो भाविक विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी येतात. दिवसभर भाविकांची मंदिरात वर्दळ असते. वाढणारी गर्दी लक्षात घेता सर्वांना दर्शन मिळावे यासाठी महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शनासाठी व्यवस्था केलेली असते. लहान मुलांसाठी पाळणे, झाेके तर खवय्यांसाठी खाण्याच्या पदार्थांचे स्टॉल या भागात दिवसभर लावलेले असतात. वाढणारी गर्दी लक्षात घेता दैनंदिन वाहतुकीसाठी मंदिर परिसरातील रस्ता बंद केलेला असतो. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेत पोलिसांचादेखील बंदोबस्त या ठिकाणी लावलेला असतो.
यंदाच्या वर्षी मागील वर्षीप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाचे मंदिर बंदच ठेवण्यात आलेले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आणि पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार मंदिर बंदबाबत अंमलबजावणी केलेली आहे. केवळ पहाटे ५ वाजता पंचामृताने अभिषेक केला जाईल. दिवसभर मंदिर बंद असणार आहे. भाविकांनी आपापल्या घरूनच दर्शन घ्यावे, तसेच मंदिर आवारात कोणी आल्यास त्यांना रस्त्यावरूनच दर्शन घेता येईल. असे असले तरी स्थानिक पोलिसांचा मात्र बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, अशी माहिती मंदिराचे मालक कौशिक गानू यांनी दिली.