व्हायरल सर्दी-तापाचे संकट; रुग्णालयांमध्ये वाढली मुलांची गर्दी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:43 IST2021-09-09T04:43:38+5:302021-09-09T04:43:38+5:30

सुनील बैसाणे धुळे : कोरोनाचे संकट कायम असतानाच मुलांमध्ये व्हायरल तापाची साथ वाढली आहे. त्यामुळे रुग्णालयांमधील ओपीडी देखील वाढली ...

Viral cold-fever crisis; Increased crowd of children in hospitals! | व्हायरल सर्दी-तापाचे संकट; रुग्णालयांमध्ये वाढली मुलांची गर्दी!

व्हायरल सर्दी-तापाचे संकट; रुग्णालयांमध्ये वाढली मुलांची गर्दी!

सुनील बैसाणे

धुळे : कोरोनाचे संकट कायम असतानाच मुलांमध्ये व्हायरल तापाची साथ वाढली आहे. त्यामुळे रुग्णालयांमधील ओपीडी देखील वाढली आहे. त्यामुळे मुलांची योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचा सल्ला तज्ज्ञ डाॅक्टरांनी दिला आहे.

हिरे रुग्णालयाच्या बालरोग विभागात ओपीडी आणि भरती देखील वाढली आहे. तसेच लहान मुलांच्या खासगी रुग्णालयांमध्ये देखील गर्दी आहे. ओपीडी १०० पेक्षा अधिक आहे, तर प्रत्येक रुग्णालयात सरासरी २० पेक्षा अधिक मुले दाखल आहेत.

कुटुंबात एका व्यक्तीला व्हायरल इन्फेक्शन झाले, तर अन्य व्यक्तींना, लहान मुलांना देखील संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे लहान मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे. ताप आल्यास त्वरित डाॅक्टरांना दाखवून उपचार करावा. तसेच नियमांचे पालन केले, तर कोरोना तसेच इतर संसर्गजन्य आजारांपासून बचाव होतो, असा सल्ला देखील डाॅक्टरांनी दिला आहे.

हिरे रुग्णालयातच ४५ मुले भरती

धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या बालरोग विभागात सध्या ४५ मुलांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णालयात दररोजच्या ओपीडीचे सरासरी प्रमाण १५० पेक्षा अधिक आहे. गेल्या जून महिन्यापासून ही परिस्थिती असल्याचे येथील डाॅक्टरांनी सांगितले.

कोरोनाच नाही, डेंग्यूचेही संकट वाढले

कोरोनाची दुसरी लाट नुकतीच आटोक्यात आली आहे. असे असले तरी कोरोनाचे संकट कायम असून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच डेंग्यूचे रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

ही घ्या काळजी...

सध्या विषाणूजन्य आजाराची साथ आहे. पाच वर्षांवरील मुले बाहेर खेळण्यासाठी एकत्र येतात. अशावेळी मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. लहान मुलांना थंड पदार्थ, रस्त्यावरचे अन्न खाण्यापासून रोखावे. सकस आहार खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच पाणी उकळून प्यावे. डासांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच डासांपासून मुलांचे संरक्षण करावे. त्यासाठी मच्छरदाणीचा वापर करावा. मुलांना अंगभर कपडे घालावेत. साथीचे आजार असल्याने घरात एखाद्या मुलाला ताप आला असेल, तर इतर मुलांना त्यापासून दूर ठेवावे. हात स्वच्छ धुवावेत. ही काळजी घेतली, तर कोरोना आणि इतर आजारांपासून मुलांचे संरक्षण होते.

- डाॅ. नीता हटकर, बालरोग विभागप्रमुख

Web Title: Viral cold-fever crisis; Increased crowd of children in hospitals!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.